दर महिन्याला होणार आता दप्तराचे वजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

शिक्षण विभागाचे आदेश - ओझे कमी होणार कधी?

सिंधुदुर्गनगरी - शाळकरी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठीच्या उपाययोजना करण्याबाबतचे शासन आदेश असूनही अद्यापही शालेय विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याखाली वावरतांना दिसत आहेत. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला दप्तराचे वजन करण्याची सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

शिक्षण विभागाचे आदेश - ओझे कमी होणार कधी?

सिंधुदुर्गनगरी - शाळकरी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठीच्या उपाययोजना करण्याबाबतचे शासन आदेश असूनही अद्यापही शालेय विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याखाली वावरतांना दिसत आहेत. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला दप्तराचे वजन करण्याची सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

विद्यार्थ्याच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी करण्यासाठी शासनाने उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गतवर्षीपासून काही शाळांमध्ये दप्तराचे ओझे कमी करण्याचे नियोजन केले; मात्र, अद्यापही काही विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याखाली वावरतांना दिसून येत आहेत. याची दखल घेत येत्या शैक्षणिक वर्षापासून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला दप्तराचे वजन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना केल्या आहेत. 

या निर्णयाचे स्वागत पालकांकडून करण्यात येत असले तरी याबाबतची संपूर्ण जबाबदारी ही मुख्याध्यापकांच्या खांद्यावर टाकण्यात आल्याने मुख्याध्यापकांमध्ये नाराजी पसरली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरु आहे. त्यानंतर शिक्षण विभागानेही याबाबत उपाययोजना राबविण्याबाबत आदेश जारी केला होता. त्यानंतरही विद्यार्थ्याच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी झालेले नाही. याची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने शैक्षणिक सत्र २०१७-१८ च्या प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या दप्तराची तपासणी करावी. त्याचा चअहवाल शिक्षक संचालक पुणे कार्यालयाला सादर करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना केल्या आहेत.

दप्तराच्या ओझ्यातून विद्यार्थ्याची सुटका करण्यासाठी शाळा स्तरावरुन सर्वंकष प्रयत्न करण्यात यावेत यामध्ये कसुर झाल्यास मुख्याध्यापक आणि संबंधीत संचालक यांना जबाबदार धरण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. 

पालकांचीही जबाबदारी...
विद्यार्थ्याच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी असावे यासाठी शाळा स्तरावरुन आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. विद्यार्थ्याच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे ही जशी शिक्षकांची जबाबदारी आहे तशी पालकांचीही जबाबदारी महत्त्वाची आहे.

वजनात अडसर...
विद्यार्थ्याच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तके, वह्या व आवश्‍यक साहित्य शाळेत ठेवण्याची व्यवस्था काही शाळांमध्ये उपाययोजना म्हणून करण्यात आल्या असल्यातरी जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, नळ आहेत पण पाणी नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे ओझे वाहण्याची वेळ येत आहे. पाणीटंचाईचा अडसर दप्तराचे ओझे कमी करण्यावर येत असल्याचे स्पष्ट होत आहे.