सिंधुदुर्गनगरीतील ‘त्या’ झाडाचे खोड गायब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

सिंधुदुर्गनगरी - पावसाळ्याच्या सुरवातीलाच जिल्हा परिषद भवन आणि जिल्हाधिकारी भवनाच्या मध्ये रहदारीच्या रस्त्यावर पावसामुळे उन्मळून पडलेल्या झाडाच्या फांद्या अद्यापही जागेवरच सडत आहेत; मात्र त्या झाडाचा किमती बुंधा (खोड) मात्र तेथून गायब झाला आहे.

पावसाळा सुरवात झाल्यावर जिल्हाधिकारी शासकीय संकुलातील आकेशीचे मोठे झाड रहदारीच्या रस्त्यावर पडले होते. त्यामुळे दिवसभर रहदारीचा मार्ग बंद झाला होता. त्यानंतर प्रशासनाच्यावतीने त्या झाडाच्या फांद्या छाटून रहदारीचा रस्ताही मोकळा केला; मात्र या घटनेला आता पंधरा दिवस उलटले तरी त्या झाडाच्या फांद्या तेथेच सडत आहेत. स्वच्छ जिल्हा म्हणून नावलौकीक मिळविलेल्या जिल्ह्याच्या राजधानी असलेल्या शासकीय संकुलातील पंधरा दिवसापूर्वी पडलेल्या झाडाच्या फांद्या अद्यापही उचलल्या जात नाहीत; मात्र त्याच झाडाचा किमती बुंधा (खोड) मात्र तेथून गायब झाल्याचे दिसत आहे. बुंधा उचलला पण फांद्या कोण उचलणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम यासारखे उपक्रम राबविले जात असतांना पंधरा दिवसांपूर्वी शासकीय कार्यालय आवारात पडलेल्या झाडाच्या फांद्या उचलण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी झाडाच्या फांद्या सडून घाणीचे साम्राज्य बनले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.