सिंधुदुर्ग पशुसंवर्धनचे काम सर्वात बोगस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

पशुसंवर्धन मंत्र्यांचा शिक्का - काम करा नाहीतर गडचिरोलीला बदलीचा दिला इशारा

पशुसंवर्धन मंत्र्यांचा शिक्का - काम करा नाहीतर गडचिरोलीला बदलीचा दिला इशारा

वैभववाडी - शेतकऱ्यांना किती योजनांचा लाभ दिला, किती जनावरांवर शस्त्रक्रिया केल्या, इमारतीची गळती का काढली नाही, दवाखान्यात यायला रस्ता का नाही अशा प्रश्‍नांची सरबत्ती करीत दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आज येथे पशुसंवर्धनच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. त्यांच्या एकाही प्रश्‍नाचे अधिकारी समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत. यामुळे श्री. जानकर यांनी तीव्र संताप व्यक्त करत सिंधुदुर्गाचा पशुसंवर्धन विभाग राज्यात सगळ्यात बोगस असल्याचा शेराही मारला. आता तरी कारभारात सुधारणा करा अन्यथा गडचिरोलीला जावे लागेल, अशी तंबी देण्यास ते विसरले नाहीत.

राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री श्री. जानकर आज येथे दौऱ्यावर आले होते. त्यांनी वैभववाडीत आल्यानंतर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत सभापती लक्ष्मण रावराणे, प्रमोद रावराणे, सुधीर नकाशे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. पठाण आदी उपस्थित होते.
दवाखान्यात गेल्याबरोबर मंत्री श्री. जानकर यांनी पाहुणचाराच्या भानगडीत न पडता थेट आढावा घेण्यास सुरवात केली. दवाखान्याकडे जाणारा रस्ता अद्याप का झाला नाही, असा प्रश्‍न त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यांच्याकडुन काहीच उत्तर मिळत नसल्यामुळे त्यांनी थेट ‘तुम्ही इथे किती वर्षे आहात’ असा प्रश्‍न केला. यावेळी एका अधिकाऱ्याने बारा वर्षे असल्याचे सांगितले. श्री. जानकर यांनी ‘तुमची पहिली येथून बदली गडचिरोलीला केली पाहिजे. इतकी वर्षे राहून दवाखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुध्दा तुम्हाला पुर्ण करता येत नाही का?’ असा सवाल करीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यास सुरूवात केली. किती जनावरांवर या वर्षात शस्त्रक्रिया करण्यात आल्या असा प्रश्‍न त्यांनी शस्त्रक्रिया करणाऱ्या एका अधिकाऱ्यांला विचारला असता त्याने अद्याप एकही नाही असे सांगितले. यावर श्री. जानकर चक्रावुन गेले. गेल्यावर्षी किती केल्या, तीन वर्षात किती केल्या, नोकरीला लागल्यापासुन किती शस्त्रक्रिया केल्या अशा एका पाठोपाठ अनेक प्रश्‍न विचारले; मात्र अधिकाऱ्यांकडून मिळत असलेली उत्तरे पाहुन मंत्री श्री. जानकर संतप्त झाले. तुम्ही शासनाचा पगार घेता मग काम का करीत नाही. तुमची बदली गडचिरोलीला केली पाहिजे अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. तुम्ही एकाही परीक्षेत पास झालेले नाहीत आहात त्यामुळे आपण नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दवाखान्याची गळती का काढलेली नाही असे विचारले असता पशुसंवर्धनच्या अधिकाऱ्यांनी निधी नसल्याचे सांगितले.

यावेळी श्री. जानकर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. दहा पाच हजाराच्या कामाकरीता कसले प्रस्ताव पाठविता, लोकवर्गणीतुन एवढे सुध्दा काम करता येत नाही का, हे काम आठ दिवसात व्हायला हवे असा सज्जड दम त्यांनी दिला. जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाचा कारभार अतिशय बेजबाबदरपणाचा आहे. राज्यात इतका बोगस कारभार अन्य कोणत्याही जिल्ह्यात नाही अशी टिप्पणी त्यांनी केली. आपल्याला सुधारणा करण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी देत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मात्र कुणाची गय करणार नाही असा इशारा सुध्दा त्यांनी दिला.

दोन वर्षाचे काम दोन महिन्यात करा
जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाचे काम धिम्यागतीने सुरू आहे. या कामाची गती आता वाढविणे आवश्‍यक आहे. दोन वर्षाचे काम अधिकाऱ्यांनी दोन महिन्यात करून दाखविले पाहिजे. त्याकरीता काहीही कमी पडू दिले जाणार नाही असे आश्‍वासन मंत्री जानकर यांनी दिले.
 

दिल लगाके काम करना
शासनाचा पगार घेता मग प्रामाणिकपणे काम केलेच पाहिजे. एखाद्या शेतकऱ्यांची गाय किंवा म्हैस आजारी पडते त्यावेळी त्याच्या मदतीला धावुन गेले पाहिजे, अशी सुचना करतानाच ‘दिल लगाके काम करना’ असा सल्ला देण्यास ते अजिबात विसरले नाहीत.