आंबोलीची बदनामी का ?

अनिल चव्हाण
सोमवार, 18 डिसेंबर 2017

बदनामीमुळे आंबोलीचे पर्यटन अस्वस्थतेच्या कड्यावर उभे आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारी कृत्यांचा संबंध या शांत सुंदर गावाशी जोडला जाऊ नये अशी रास्त अपेक्षा इथल्या रहिवाशांची आहे.

अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरणानंतर सुंदर आंबोलीची कोणताही दोष नसताना बदनामी केली गेली. गुन्हेगारी कृत्य कोणाचे आणि शिक्षा कोणाला असे म्हणण्याची वेळ आंबोलीवासीय आणि आंबोलीप्रेमींवर आली आहे. या बदनामीची दुसरी वास्तव बाजू मांडण्याचा हा प्रयत्न आहे. या बदनामीमुळे आंबोलीचे पर्यटन अस्वस्थतेच्या कड्यावर उभे आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारी कृत्यांचा संबंध या शांत सुंदर गावाशी जोडला जाऊ नये अशी रास्त अपेक्षा इथल्या रहिवाशांची आहे.

आंबोलीचे देखणेपण
आंबोलीची ओळख राज्यात पर्यटनस्थळ म्हणून आहे. राज्यातील सर्वाधिक पाऊस पडणारे हे ठिकाण. सातासमुद्रापार असलेल्या इंग्लंडमधून आलेल्या ब्रिटिशांनाही भुरळ पाडणारे ठरले होते. त्यांनी आंबोलीला हिल स्टेशनचा दर्जा दिला. सावंतवाडी संस्थानचा देखणा राजवाडा या आंबोलीत आजही आहे. संस्थानची ही हिवाळ्यातली राजधानी. येथील पर्यटन महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करणारे ठरले आहे. निसर्गसंपन्न परिसर, जैवविविधता, भरपूर पाऊस आदी अनेक बाबी आंबोलीत येणाऱ्यांना भुरळ पाडतात; पण गेल्या काही वर्षांत आंबोलीबाहेरील लोकांकडून होणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांचे खापर या गावावर फोडले जात आहे. यातून शेकडो वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या आंबोलीला बदनाम करणे योग्य ठरणार नाही.

नियंत्रणशून्य हिडीस प्रकार
वर्षा पर्यटन काळात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची संख्या वाढली. कठड्यावर उभे राहून फोटो काढणे, दारू पिऊन झिंगलेल्या स्थितीत इतरांना त्रास देणे, मारामाऱ्या अशा घटना होऊ लागल्या. आंबोलीवासीय मात्र या प्रकारांकडे हतबलतेने पाहण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते. यातून इथल्या पर्यटनाची अप्रत्यक्षरीत्या बदनामी सुरू झाली. यातही असे हिडीस प्रकार करणारे आंबोलीबाहेरचे होते; पण बदनामी आंबोलीची होत होती. आजही प्रशासनाला असे प्रकार पूर्णतः थांबविण्यात फारसे यश आलेले नाही.

पर्यटन वाढले; पण...
ब्रिटिश आंबोलीला विश्रांतीचे ठिकाण म्हणून पाहायचे. नंतरच्या काळात येथे किरकोळ प्रमाणात पर्यटक यायचे. अगदी १९८० पासून पर्यटक येथे येत असल्याचे संदर्भ मिळतात. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यानंतर आंबोली हे पर्यटन विकासाचे प्रमुख केंद्र बनले. १९९७-९८ पासून येथे वर्षा पर्यटनाची क्रेझ सुरू झाली. सुरुवातीला कुटुंबवत्सल पर्यटक यायचे. गोवा-मुंबईतील पर्यटकांची संख्या जास्त असायची. २००५-०६ नंतर मात्र येथे हुल्लडबाजी करणाऱ्यांच्या झुंडी वर्षा पर्यटनासाठी दाखल होऊ लागल्या आणि कुटुंबवत्सल पर्यटकांची संख्या घटू लागली.

गुन्हेगारीचा डाग
आंबोलीच्या दरीत शेकडो मृतदेह टाकल्याचे चित्र आज रंगवले जाते; पण ही अतिशयोक्ती आहे. पूर्वी काही अपघात वगळता असे प्रकार आंबोलीत अभावानेच घडत. वर्षा पर्यटनाच्या वाढत्या प्रसारानंतर काही गुन्हेगारांनाही कदाचित येथील दुर्गम भागाचा गैरफायदा घेण्याची बुद्धी झाली असावी. त्यातूनच गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी आंबोलीचा वापर सुरू झाला. स्थानिकांनी आपल्या परीने कृतीतून याला विरोध कायम ठेवला. येथे अपघातही घडायचे. एखादा दरीत पडला तर बचावासाठी पोलिसांच्या आधी स्थानिक पोचायचे. २००३ मध्ये घाटात अर्भक फेकल्याचा प्रकार घडला होता. स्थानिकांनी त्याला वाचविले होते. पुढे या मुलीचे नाव आंबोलीवरून अबोली ठेवले. याशिवाय बऱ्याच जणांना स्थानिकांनी मृत्यूच्या दाढेतून परत आणल्याच्या घटना ताज्या आहेत. येथील सामाजिक कार्यकर्ते कोजमा डिसोजा सांगतात, १९७३ पासून घाटात पडलेल्यांना - अपघातग्रस्तांना मदतीचे काम आम्ही करीत आहोत. गेल्या पाच-सहा वर्षांत कावळेसादच्या दरीत मृतदेह टाकण्याचे प्रकार घडत आहेत.

नांगरतासचा गैरवापर
काही वर्षापूर्वी आंबोलीतील नांगरतासचा धबधबा आणि तेथील दाट जंगलात मृतदेह टाकण्याचे प्रकार घडायचे. या धबधब्याची रचना दुर्गम आहे. यामुळे आत मृतदेह टाकल्यास तो शोधणे कठीण जाते. २००३ मध्ये गडहिंग्लज बामणवाडीमधील बाळासाहेब धोनुक्षे यांच्या पत्नीची हत्या करून मृतदेह येथे टाकण्यात आला होता. तत्कालीन पोलिस अधीक्षक संतोषकुमार रस्तोगींनी हे प्रकरण तातडीने उघडकीस आणले. त्यानंतर तेथे तीन-चार मृतदेह आढळले. सहा वर्षांपूर्वी नांगरतास येथे देवाचे मंदिर व पुतळा बसविला गेला. धबधब्याच्या ठिकाणी गॅलरी बांधण्यात आली. त्यानंतर येथील गैरकृत्यांना आळा बसला.

ते तर अपघातच...
आंबोली घाटमार्गात मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. शिवाय पर्यटनामुळे या घाटात अनेकांचा वावर असतो. यामुळे अपघात होणे साहजिकच आहे. आंबोली पोलिसांच्या रेकॉर्डनुसार २००८ पासून १४ ते १५ मृतदेह आंबोलीत आढळले. २००७ मध्ये सांगेलीतून आंबोलीत परतणाऱ्या वऱ्हाडाच्या टेम्पोला घाटात अपघात झाला होता. त्यात दोन महिलांचा मृत्यू तर सहाजण जखमी झाले होते. यावर्षी घाटात पडलेल्या एकाला येथील पोलिस गजानन देसाई यांनी वाचविले होते. २०१० मध्ये चंदगडमधील एकजण कावळेसाद दरीत कोसळला होता. त्याला राकेश अमरुसकर व सैनिक स्कूलच्या टीमने वाचविले होते. २०१३ मध्ये घाटात सुमो कोसळून चालक जखमी झाला होता. महादेवगड येथे कोल्हापूरच्या बांधकाम अधिकाऱ्याची गाडी रहस्यमयरीत्या खाली गेल्याचा प्रकार घडला होता. पण हे सगळे अपघातच.

गुन्हेगारांची नजर कावळेसादकडे 
नांगरतासमधील प्रकार थांबल्यानंतर गुन्हेगारी कृत्त्यांची कावळेसादची दरी जोडली गेली. २०१३ मध्ये बैलहोंगल येथील एका डॉक्‍टरची त्याच्याच पत्नीने हत्या करवली. हा प्रकार कावळेसाद येथे घडला. तत्कालीन पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी अवघ्या ३८ तासांत त्याच्या गुन्हेगारांना शोधले. कावळेसादमध्ये मृतदेह टाकण्याची उघड झालेली ही पहिलीच घटना. त्यानंतर येथे काहींनी आत्महत्या केली; तर काही मृतदेह सापडले. दारूच्या नशेत दोघे दरीत पडल्याचा प्रकार राज्यभर गाजला. यानंतर अनिकेत कोथळे प्रकरणाने आंबोली 
बदनाम झाली.

अतिशयोक्तीपूर्ण बदनामी
आंबोलीत आतापर्यंत २० ते २५ मृतदेह सापडले आहेत; मात्र शेकडो मृतदेह दरीत असल्याचा आभास निर्माण केला जातोय. रामघाट, भुईबावडा, करूळ अशा घाटांमध्येही असे प्रकार याआधी उघड झाले आहेत; मात्र सर्वाधिक बदनामी आंबोलीचीच झाली. याचा परिणाम इथल्या पर्यटनावर होत आहे. खरे तर आंबोलीतील ८ ते १० टक्केच लोक थेट पर्यटनावर अवलंबून आहेत; पण धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांचा त्रास सगळ्यांनाच होतोय. वाहतूक कोंडी अशा गुन्हेगारी कृत्यांमुळे इथले लोकजीवनच कोलमडून जाते. त्यामुळे असे प्रकार होणारच नाही यासाठी उपाय योजणे आवश्‍यक आहे. आंबोलीची बदनामी थांबवायला हवी, अशी अपेक्षाही इथल्या रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.

आंबोलीत कोणतीही घटना घडल्यास तत्काळ मदत पोहोचावी यासाठी टीमला प्रशिक्षण दिले आहे. आमच्या टीमनेही मृतदेह काढले आहेत. तसेच कोणताही अपघात किंवा घटना घडल्यास तत्काळ मदतीसाठी हजर असतो. पावसाळ्यात देखील आमची टीम मदतीसाठी तत्पर असते. आंबोलीत पर्यटकांना अडचणीच्यावेळी मदत पुरविण्यासाठी स्थानिकांच्या मदतीने टीम कार्यरत आहे.
- संतोष पालेकर,
ग्रामपंचायत सदस्य व आंबोली बचाव पथक टीम सदस्य

आंबोलीत सहानंतर पर्यटनबंदीचा वनविभागाचा निर्णय योग्य आहे. स्थानिकांचेही तेच मत आहे. येथील वातावरण व शांतता बिघडू नये, स्थानिकांना त्रास होऊ नये व मृतदेह टाकण्याच्या घटना घडू नयेत यासाठी स्थानिक पत्रकार व गावच्या वतीने आम्ही वनविभागाकडे महादेवगड व कावळेसाद येथे गेट बसवण्याची मागणी केली आहे. वनविभागाने यावर तातडीने अंमलबजावणी करावी. पर्यटकाला शिस्त आणणे गरजेचे आहे. इतर ठिकाणी असे नियम असतात. आंबोलीत बाहेरच्या नेत्यांनी ठरवू नये. ६ नंतर पर्यटन बंदी योग्यच आहे. प्रशासनाने स्थानिकांचे म्हणणे ऐकावे. धिंगाणा घालणाऱ्या अशा पर्यटकांचा त्रास इतर ८० ते ९० टक्के लोकांना होतो. यातून येथील पर्यटनाची बदनामी होत आहे.
- शशिकांत गावडे,
माजी सरपंच, आंबोली

आंबोलीत तसेच घाटात अपघात होतात. त्यावेळी पोलिसांबरोबर स्थानिक लोक मदतकार्यात नेहमी पुढे असतात. आंबोलीत धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना रोखावे तसेच या घटनांना रोखावे. यासाठी स्थानिक व लोकप्रतिनिधी म्हणून मी दोन वर्षांपासून उपाययोजना करण्याची मागणी करत आहे. या घटनांचा पर्यटनावर परिणाम झाला आहे. आता येथील लोकही जागृत झाले आहेत. प्रशासनाने अशा घटनांमुळे आंबोलीचा गैरवापर होऊ नये यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. रात्रीची गस्त सुरू केली आहे. पर्यटनाच्या नावाखाली आंबोलीत बेशिस्त व धिंगाण्याचे प्रकार वाढू नयेत यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- सौ. रोहिणी विद्यासागर गावडे,
जिल्हा परिषद सदस्या, आंबोली

आंबोलीत मृतदेह काढण्याचे काम पोलिसांबरोबर मी १९७४ पासून करत आलोय. कावळेसाद पॉईंटला मृतदेह टाकण्याचे प्रकार हे अलीकडच्या ४ ते ५ वर्षांतील आहेत. पूर्वी नांगरतास धबधबा परिसरात मृतदेह आढळायचे. आंबोली पोलिसांसोबत मी भर पावसात नांगरतास धबधब्यात दोरीने उतरलो आहे. माझ्याबरोबर आंबोलीतील स्थानिकही मदतकार्यात सहभागी असायचे.
- कोजमा डिसोजा,
सामाजिक कार्यकर्ते, आंबोली

उघड झालेले गुन्हे

 •  ८ जुलै २०११- नांगरतास धबधब्यात पडून किरण कावळे (रा. बेळगाव) याचा मृत्यू

 •  जानेवारी २०१३- सातार्ड्यातील नाईक यांचा खून करून मृतदेह पूर्वीचा वसजवळील दरीत टाकला.

 •  १६ एप्रिल २०१३- कावळेसादच्या दरीत अज्ञात मृतदेह.

 •  २०१४- महादेवगड येथे दरीत अज्ञाताची हाडे सापडली.

 •  २०१५- महादेवगड पॉईंट येथे अज्ञाताची आत्महत्या

 •  २३ जुलै २०१६- रुद्राप्पा बजेटी (रा. बैलहोंगल) यांचा खून

 •  १७ ऑगस्ट २०१६ - पवन चौगले (रा. तुर्केवाडी चंदगड) यांचा दरीत पडून मृत्यू

 •  १५ जानेवारी २०१७ - सुधाकर राऊत (शिरशिंगे) यांचा दरीत पडून मृत्यू

 •   मार्च २०१७ - बेळगावातील ट्रकचालकाचा दरीत पडून मृत्यू

 •  २८ मे २०१७ - मुख्य दरडीसमोर अज्ञात स्त्रीचा मृतदेह

 •  ३१ जुलै २०१७ - कावळेसाद येथे प्रताप उत्तगरे आणि इम्रान गारदी यांचा दरीत पडून मृत्यू

 •  ८ नोव्हेंबर २०१७ - अनिकेत कोथळेचा मृतदेह महादेवगडजवळ जाळला.

 •  ११ नोव्हेंबर २०१७ - शिक्षक विजयकुमार गुरव यांचा मृतदेह दरीत टाकला.

 •  १६ नोव्हेंबर २०१७ - श्रीधर मोरे व नैना मोरे यांचे मृतदेह दरीत सापडले.

Web Title: Sindhudurg News Amboli Tourism Issue