आंबोली धबधबा पारपोलीचाच

आंबोली धबधबा पारपोलीचाच

सावंतवाडी - आंबोली धबधब्यापासुन मिळणारे उत्पन्न पारपोली ग्रामपंचायतीला देण्यावर वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे धबधब्याच्या नामकरणाचा वाद आणखी चिघळण्याची शक्‍यता आहे. आम्ही धबधब्याचे नाव बदलूू देणार नाही. धबधब्यापासून मिळणारे उत्पन्न तिन्ही गावांना वाटून देण्यात यावे, अशी भूमिका प्रशासनाने याआधी जाहीर केली होती. त्यात सातत्य ठेवावे, अन्यथा आमची आंदोलनाची भूूमिका राहील, असे जिल्हा परिषद सदस्या रोहीणी गावडे यांनी स्पष्ट केले आहे.

तालुक्‍यातील आंबोली घाटातील धबधबा आता वादात सापडला आहे. पर्यटन कर म्हणून या वर्षीपासून घेण्यात आलेला निधी दहा लाखांच्या वर जमल्याने वादाला तोंड फुटले. या परिस्थितीत गोपनीय बैठका घेऊन घाटाचे आणि धबधब्याचे नाव बदलण्यात यावे, अशी व्यूहरचना पारपोली ग्रामस्थांकडून सुरू आहे. याबाबत दोन ते तीन बैठका सुद्धा घेण्यात आल्या आहेत; मात्र कोणी पुढे येवून बोलण्यास तयार नाही. या धबधब्याचे नाव बदलून शिवतीर्थ धबधबा-पारपोली, असे करण्याचा त्यांचा मानस आहे. याबाबत वनविभागाने सुध्दा पारपोली ग्रामस्थांच्याबाजूने आपला कौल देण्याचा निर्णय घेतला आहे.

वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘आंबोली धबधब्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही; मात्र त्या धबधब्याची हद्द ही पारपोली गावात येत असल्यामुळे त्या धबधब्यापासुन मिळणारे उत्पन्न हे त्याच ग्रामपंचायतीला देण्यात येणार आहे आणि यापूर्वीच तसा निर्णय घेण्यात आला होता. दहा लाख रुपये यावर्षी जमा झाले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा गावच्या विकासासाठी करण्यात येणार आहे.

आंबोली येथे महादेवगड पॉईट तसेच अन्य काही पॉईट आहेत. त्याठिकाणी कर लावण्यात येणार आहे. चौकुळमधील पॉईंटना वेगळा कर लावण्यात येणार आहे. आणि त्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहे. त्यामुळे वादाचा प्रश्‍नच उरत नाही.’’

या भूमिकेमुळे कराच्या पैशावरून वाद होण्याची शक्‍यता आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या निर्णयानुसार हे पैसे तिन्ही ग्रामपंचायतींना वाटून देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; मात्र अद्यापपर्यत तसा कोणताही प्रयत्न झालेला नाही.

धबधबा आंबोलीचाच 
याबाबत जिल्हा परिषद सदस्या रोहीणी गावडे यांनी आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, ‘‘इंग्रजांच्या काळापासून आंबोली घाटाला आणि धबधब्याला आंबोलीचे नाव पडले आहे. ते कोणी बदलण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते चुकीचे आहे. अशी अनेक पर्यटन स्थळे तालुक्‍याच्या किंवा मुख्य गावाच्या नावाने ओळखली जातात. राहीला मुद्दा कराचा तर आंबोली, चौकुळ आणि पारपोली या तिन्ही ग्रामपंचायतींच्या विकासासाठी करापोटी येणारी रक्कम देण्यात यावी, असा निर्णय कर लावण्याचा निर्णय घेताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला होता. जिल्हा प्रशासनानेही सकारात्मक भूमिका घेतली होती. त्या निर्णयानुसार पुढील निर्णय होणे अपेक्षित आहे.’’

धबधबा आमचाच; महसूल दरबारी नोंद
याबाबत पारपोली गावचे उपसरपंच संदेश गुरव यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले, ‘‘हा वाद काही राजकीय लोकांकडून निर्माण केला जात असून, तीन गावांत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. धबधब्याची मालकी आमच्याच गावची आहे, तशी सातबारा नोंद आहे. त्यामुळे आम्ही आमची मालकी सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्यास त्यात वाईट काय? धबधब्याचे नाव बदलण्याचा निर्णय हा फार पूर्वीच घेण्यात आला आहे. हा मुद्दा आता पुढे आला आहे; मात्र गेली अनेक वर्षे आंबोलीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. त्या तुलनेत पारपोली गाव दुर्लक्षीत राहिले ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता आम्ही धबधब्याच्या करावर आमचा हक्क सांगितला तर कोठे बिघडले.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com