शिवसेना स्वबळावर पूर्ण ताकदीने लढणार - अरुण दुधवडकर

शिवसेना स्वबळावर पूर्ण ताकदीने लढणार -  अरुण दुधवडकर

देवगड -  आगामी विधानसभा निवडणूक कणकवली मतदारसंघातून शिवसेना स्वबळावर पूर्ण ताकदीने लढवण्याची तयारी करीत आहे. वरिष्ठांच्या आदेशाने पक्षाचा उमेदवार त्यावेळी ठरेल. परंतु त्यासाठी पक्ष म्हणून तालुक्‍याच्या संघटना बांधणी लक्ष देणार आहे. त्याअनुषंगाने तालुक्‍यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

तालुक्‍यातील ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना स्थानिकांसोबत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तालुक्‍यात होत असलेल्या सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दुधवडकर येथे आले होते. त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख मिलिंद साटम, शैलेश भोगले, वर्षा पवार, लक्ष्मण तारी, संतोष तारी उपस्थित होते. 

श्री. दुधवडकर म्हणाले, ‘‘तालुक्‍यात होत असलेल्या सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला अधिकाधिक यश मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांची प्रचार यंत्रणा राबवली जाणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये पक्षाला निश्‍चितच मोठे यश मिळेल हा विश्‍वास आहे. आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणाला यश मिळवून देण्यासाठी पक्ष वाढीकडे लक्ष राहणार आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातून पक्षाचा उमेदवार कोण असेल हे आता सांगता येणार नसले तरी संघटना बांधणीकडे आपण लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या तरी धनुष्यबाण हाच उमेदवार मानून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.’’

ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत ते म्हणाले, ‘‘तालुक्‍यात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध राहील. या प्रकल्पामुळे स्थानिकांचे नुकसान होणार असेल तर स्थानिक घेतील त्या भुमिकेला शिवसेनेचे समर्थन राहून पक्ष त्यांच्यासोबत असेल. उद्योगमंत्री शिवसेनेचे असले तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतात. त्यांनी याबाबत लगेच निर्णय घेतला; मात्र अजून अन्य जिल्ह्यात गरजेच्या असलेल्या विशेष कार्यकारी अधिकारीपदाच्या निवडीचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रकल्पाबाबत शिवसेना स्थानिकांसोबत राहणार आहे. पदवीधर मतदार नोंदणीमधील अडचणी प्रशासनाशी बोलून दूर करण्यात येतील.’’

नुकत्याच झालेल्या अरबी समुद्रातील ‘ओखी’ वादळात नुकसानग्रस्त झालेल्या तालुक्‍यातील मच्छीमारांना मदत मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न राहतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संघटना वाढीवर भर...
आगामी काळात तालुक्‍यातील पंचायत समिती मतदारसंघनिहाय दौरा करून शाखा प्रमुखांच्या बैठका घेतल्या जातील. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन गावपातळीवरील संघटना वाढीकडे लक्ष दिले जाणार असल्याचे श्री. दुधवडकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com