ओडिशातील कुटुंब गावच्या वस्तीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

दोडामार्ग - दोडामार्ग तिलारी मार्गावर रस्त्यालगत निराधार अवस्थेत राहणारे ओडिशातील ते कुटुंब आज गावकुसाबाहेरून माणसांच्या वस्तीत आले. येथील ‘भारतमाता की जय’ या संघटनेने ती दोन मुले आणि त्यांच्या आईला गावकुसाबाहेरून गावात आणले.

दोडामार्ग - दोडामार्ग तिलारी मार्गावर रस्त्यालगत निराधार अवस्थेत राहणारे ओडिशातील ते कुटुंब आज गावकुसाबाहेरून माणसांच्या वस्तीत आले. येथील ‘भारतमाता की जय’ या संघटनेने ती दोन मुले आणि त्यांच्या आईला गावकुसाबाहेरून गावात आणले.

मुलांना शिक्षणाची, राहण्याची, जेवणाखाण्याची आणि आरोग्यसेवा पुरविण्याची जबाबदारी त्या संघटनेने घेतली. माणुसकीच्या शोधात असलेल्या त्या कुटुंबाचे दुःख पाहून संवेदनशील माणसेच त्यांच्या मदतीला धावल. वीज, पाणी, घर आणि नव्याने का असेना मायेची माणसे मिळाली म्हणून ती माऊली आणि तिची दोन्ही मुले हरखून गेली होती. येथील ग्रामीण रुग्णालयाजवळच्या सुदेश तथा बाबु मळीक यांच्या शेतघरात आजपासून राहायला आली.

दोडामार्ग शहरापासून साधारणपणे एक किलोमीटरवर ते कुटुंब हलाखीत जगत होते. जवळच्या नाल्यातील उष्टे खरकटे नाहीतर शिळेपाके, कुजके नासके काहीबाही खाऊन ते कुटुंब जगायचे. आईसोबत आठ दहा वयोगटातील दोन मुले. मुलगा, मुलगी. अन्न, वस्त्र, निवाऱ्याची भ्रांत आणि शिक्षणाचा थांगपत्ता नाही अशी सगळी स्थिती. तालुक्‍यातील पत्रकारांनी  जीवनावश्‍यक वस्तू आणि काही पैसे त्या माऊलीला दिले. त्यानंतर ‘सकाळ’ ने त्या कुटुंबाच्या दुःखाला वाचा फोडली. ओडिशातील कुटुंब ‘माणुसकीच्या शोधात’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले आणि अनेकांचे हात मदतीसाठी पुढे सरसावले. येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या नविता बोडेकर हिने वाढदिवसानिमित्त मैत्रिणींसोबत त्या कुटुंबाला जीवनावश्‍यक वस्तू भेट दिल्या. येथील वेलकम सुपर मार्केटचे संचालक राजू भोसले यांनीही जीवनावश्‍यक वस्तू दिल्या.

प्राथमिक शिक्षिका सुमन कासार, संपदा बागी, मेदिनी सावईकर, शिक्षक जनार्दन पाटील, दोडामार्ग युथ हेल्पलाईनचे अध्यक्ष वैभव इनामदार, शेर्ले येथील डॉ. हेरेकर यांनी जीवनावश्‍यक वस्तू, रोख रक्कम आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली. कोंडुरा येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कदम, बांद्यातील मनोज सावंत, झोळंबेतील शिवाजी गवस- गोडसे यांच्यासह अनेकांनी त्या कुटुंबाच्या पालनपोषणाची आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली. येथील गटसाधन केंद्रातील विषयतज्ज्ञ जयवंत सावंत आणि समीर कांबळी यांनीही मुलांना शाळेत दाखल करुन घेण्याची तयारी दाखवली.

शिवाय ‘भारत माता की जय’ संघटनेचे गणेश गावडे यांनीही काल संपर्क साधून संघटनेच्यावतीने त्या कुटुंबाची सर्व जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविली. पत्रकार विजय पालकर, संदेश देसाई, रजनीकांत कदम आणि पोलिस कृष्णा जंगले, संजय भाईप यांनीही सहकार्याची तयारी दाखवली. दरम्यान, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि स्नेह रेसिडेन्सीचे मालक संतोषकुमार दळवी यांनी त्या कुटुंबाला स्वखर्चाने घर बांधून देण्याची तयारी दाखविली आहे. त्यासाठी ते जागेचा शोध घेत आहेत. कुणी जागा देण्यास इच्छुक असेल तर त्याने पुढे येण्याची गरज आहे.

Web Title: Sindhudurg News Bharat Mata Ki Jay organisation social work