सावंतवाडीत बायोमेडिकल कचरा खड्ड्यात टाकण्याची वेळ

सावंतवाडीत बायोमेडिकल कचरा खड्ड्यात टाकण्याची वेळ

सावंतवाडी - येथील कुटीर रुग्णालयात प्रसूतीपासून इतर वैद्यकीय बायोमेडिकल कचरा नष्ट करण्यासाठी निधीच नसल्याने तो खड्ड्यात टाकण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. परिणामी, रुग्णालयाच्या परिसरासह मोती तलावाच्या काही भागात दुर्गंधी पसरली आहे. हा प्रकार गेले दोन ते अडीच महिने सुरू आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर तो उघड झाला.

निधीच उपलब्ध नसल्याने कचरा नेणारी एजन्सी यायची बंद झाली आहे. त्यामुळे दिवसागणिक निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो खड्ड्यात टाकण्याची वेळ आली आहे, असे रुग्णालयाचे अधीक्षक उत्तम पाटील यांचे म्हणणे आहे.

सावंतवाडी स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न 
सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे सर्वाधिक प्रसूती शस्त्रक्रियांचे प्रमाण असलेल्या उपजिल्हा दर्जाच्या येथील रुग्णालयाला कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे. याठिकाणी अनेक समस्या आहेत. मात्र, नागरिकांच्या जागरूकतेमुळे नवीन समस्या उघड झाली आहे. रुग्णालयात दिवसाकाठी दहा ते बारा मातांची प्रसूती होते. प्रसूतीनंतर निर्माण होणारा बायोमॅट्रीक कचरा निर्मूलन करण्यासाठी सद्यस्थितीत तरी रुग्णालयाकडे व्यवस्था नाही. त्यामुळे निर्माण होणारा कचरा रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या खड्ड्यात टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
त्यामुळे गेले तीनहून अधिक महिने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे बाजूला येथील तहसीलदारांच्या निवासस्थानासह मोठी वस्ती आहे. त्याचबरोबर सायंकाळच्या वेळी तलावाच्या काठावर बसणाऱ्या लोकांनाही या दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.

पालिकेच्या स्वच्छता विभागाचे अधिकारी विनोद सावंत यांच्याकडे ‘सकाळ’च्या माध्यमातून तक्रार दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर ही माहिती दिली. तसेच, दुर्गंधी लक्षात घेता त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात यावी, अशा सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘असा प्रकार असेल तर तो चुकीचा आहे. नागरिकांच्या दृष्टीने हानीकारक आहे. त्यामुळे त्यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी तत्काळ प्रयत्न केले जातील.’’

निधी नसल्याने खड्ड्याचा आश्रय
याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. ते म्हणाले, ‘‘बायोमॅट्रीक कचरा निर्मूलन करण्यासाठी शासनाकडून निधी दिला जातो. मात्र, गेले चार महिने हा निधी उपलब्ध झाला नसल्याने आता खड्ड्यात नाळ, रक्त तसेच अन्य अवशेष टाकावे लागत आहेत, ही परिस्थिती भयानक आहे. निधी मिळण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आज तक्रार आहे, असे कळल्यानंतर कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी तात्पुरते माती आणि चुना घालण्यास सांगितले आहे. मात्र, निधी मिळणे गरजेचे आहे.’’

जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांत दुरवस्था
बायोमेट्रीक कचरा निर्मूलन करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील एका एजन्सीला देण्यात आली होती. त्यांच्याकडून मालवण येथे तो कचरा नष्ट केला जात होता; परंतु गेले काही दिवस निधीच न मिळाल्याने जिल्ह्यातील सर्वच हॉस्पिटलमध्ये हा कचरा नष्ट करण्यावरून वादविवाद सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com