अनधिकृत गौण खनिजाविरुद्ध मोहीम

अनधिकृत गौण खनिजाविरुद्ध मोहीम

मालवण - तालुक्‍यात अनधिकृतरीत्या वाळू वाहतूक, गौण खनिज वाहतूक तसेच वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या होड्यांवर महसूल प्रशासनाने धडक मोहीम हाती घेत जप्तीची कारवाई केली आहे. त्यामुळे अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. यात पळसंब येथे विनापरवाना वाळू वाहतूक करणारे तीन डंपर पकडण्यात आले; तर कालावल, देवली येथील नऊ वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या होड्यांवर कारवाई करण्यात आली. शासनाच्या नव्या आदेशानुसार डंपर तसेच होड्यांवर मिळून सुमारे ५५ लाखांहून अधिक दंडात्मक कारवाईच्या नोटिसा संबंधितांना बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार समीर घारे यांनी दिली.

दरम्यान, आज सायंकाळी तहसीलदार समीर घारे यांनी तालुक्‍यातील वाळू, चिरे व्यावसायिकांची बैठक घेत शासनाच्या नव्या आदेशाची माहिती दिली. वाळू, गौण खनिज व्यावसायिकांनी बेकायदेशीररीत्या व्यवसाय पूर्णपणे बंद करावा, अशा सूचना दिल्या आहेत.

तहसीलदार घारे यांनी तालुक्‍यातील अनधिकृत वाळू उपसा, वाहतूक, गौण खनिज वाहतुकीविरोधात धडक मोहीम हाती घेत कारवाई करण्यास सुरवात केली आहे. यात कालावल खाडीपात्रात अनधिकृतरीत्या वाळू उपसा करणाऱ्या तीन होड्या ‘सील’ करण्यात आल्या. या होड्यांमध्ये वाळूही आढळून आली होती. यात यशवंत महादेव हिंदळेकर (रा. मसुरे) यांना पाच लाख ३४ हजार १८२ रुपये, नीलेश जगन्नाथ खोत (रा. मसुरे) यांना पाच लाख ३४ हजार १८२ रुपये, ओंकार अनंत वायंगणकर (रा. कालावळ वायंगणी) यांना पाच लाख ६८ हजार ३६४ रुपये एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. होड्यांच्या केलेल्या तपासणीत वाळू उपशासाठी या होड्यांची नोंदणीच केली नसल्याचे आढळून आले.

देवली येथे काल (ता. २२) करण्यात आलेल्या कारवाईत दीपक सोमा चव्हाण, गुरुनाथ यशवंत पाटकर, विक्रांत रमेश नाईक, दत्ताराम लक्ष्मण चव्हाण यांच्यासह अन्य दोन जणांच्या अशा सहा होड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांना प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

पळसंब येथे विनापरवाना वाळूची वाहतूक करणारे तीन डंपर पकडण्यात आले. यात हेमंत संभाजी पडवळ याचा डंपर (एमएच ०७ एस- ६६९६), मल्लिकार्जुन राजप्पा काळे याचा डंपर (एमएच ०७ सी- ६०६४), राहुल घनश्‍याम भिसळे याचा डंपर (एमएच ०१- ०१२४) या तीन डंपरवर कारवाई करण्यात आली. या तिन्ही डंपर मालक व चालकांना सुमारे आठ लाखांहून अधिक रकमेच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. 

श्री. घारे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार सुहास खडपकर, साईनाथ गोसावी, मंडल अधिकारी मंगेश तपकीरकर, तलाठी दिनेश तेली, डी. सी. सिंगनाथ, डी. आर. परब, श्री. गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

तहसील कार्यालयात सायंकाळी तालुक्‍यातील वाळू व चिरेखाण व्यावसायिकांची तातडीची बैठक घेत तहसीलदार घारे यांनी व्यावसायिकांना शासनाच्या नवीन कायद्याची माहिती दिली. परवानाधारक व्यावसायिकांनी पासशिवाय वाळू, गौणखनिजाची वाहतूक करू नये, असे आढळून आल्यास संबंधितांचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल. तालुक्‍यात काही ठिकाणी महसूलचे पथक कारवाईसाठी येत आहे का, याची माहिती मिळविण्यासाठी काही व्यावसायिक प्रमुख रस्त्यांवर काही मुलांना उभे करून ठेवत असल्याचे आढळून आले आहे. यापुढे अशा व्यक्ती आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही श्री. घारे यांनी या बैठकीत व्यावसायिकांना दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com