उगारलेला हातच शिल्लक राहिला नसता - राजन तेली

उगारलेला हातच शिल्लक राहिला नसता - राजन तेली

कणकवली - मुंबईत माझ्यावर हात उगारला गेला अशी चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे. तसे काहीच झालेले नाही; परंतु तसे झालेच असते तर माझ्यावर उगारलेला हातच शिल्लक राहिला नसता, असे स्पष्टीकरण भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी येथे दिले.

येथील आपल्या कार्यालयात बोलताना तेली म्हणाले, ‘‘मुंबईतील मंत्रालयात भाजप पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आणि महामार्ग बाधित व्यापारी बांधव प्रश्‍न मांडण्यासाठी गेलो होतो. तेथे आमच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलाही हाणामारी, हमरातुमरीचा प्रकार झालेला नाही; पण माझी सतत बदनामी करणारी काही मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून उगाचच वावड्या उठवत आहेत.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘मी गेली ३८ वर्षे राजकारणात आहे. या कारकिर्दीत माझ्यावर हात उगारणे कुणालाच शक्‍य झालेले नाही. त्यामुळे मुंबईत तसा प्रकार झाला असता तर त्या व्यक्‍तीचा हात शिल्लकच राहिला नसता. ती व्यक्‍ती स्वतःच्या पायाने चालत देखील येऊ शकली नसती. मला आजवर अनेकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला; पण मी सर्वांना पुरून उरलो आहे.’’

मुंबई येथील प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर, आपले जुने सहकारी काका कुडाळकर, धोंडी चिंदरकर आणि आपला मुलगा देखील उपस्थित होता. या सर्वांच्या उपस्थितीत कुठलाही हाणामारी तत्सम प्रकार झालेला नाही. तसेच माझे मुंबईतील कनेक्‍शन सर्वश्रृत आहे. त्यामुळे माझ्यावर हात उगारण्याची कुणी हिंमत करणार का? चुकून तसा प्रकार झालाच तर तो स्वतःचा पायाने चालत जाऊ शकतो का? असाही प्रश्‍न तेली यांनी उपस्थित केला. माझ्यावर आणि माझ्या मुलावर यापूर्वी हल्ला करण्याचे अनेक प्रकार झाले. माझ्यावर सतत पाळत ठेवली गेली,

कणकवलीतील घराची रेकीही करण्यात आली होती; पण आत यायचे अद्याप कुणाचे धाडस झालेले नाही. माझ्या वाटेला कुणी आला तर त्याला धडा शिकवल्याखेरीज राहणार नाही, असा इशारा देखील तेली यांनी दिला.

सिंधुदुर्ग एसटी भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय झाला आहे. खुल्या प्रवर्गासाठी २१८ जागा होत्या. त्यातील ९० जागांवर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना स्थान देण्यात आले. दुसरीकडे मागास प्रवर्गातील जागा रिक्‍त राहिल्या. यामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवार नोकरीपासून वंचित राहिले. ही चूक सुधारण्यासाठी मागास प्रवर्गातील ९० उमेदवारांची निवड आरक्षित प्रवर्गातून केली जावी. त्यानंतर रिक्‍त होणाऱ्या जागांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची भरती करावी, अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे केली असल्याचे तेली म्हणाले.

भुजबळ आता कुठे आहेत ?
या वेळी तेली म्हणाले, ‘‘काही वर्षांपूर्वी मला सत्यविजय भिसे हत्या प्रकरणात नाहक गोवण्यात आले. यामध्ये छगन भुजबळ आणि इतर काही मंडळी होती. यातील श्री. भुजबळ आता कोठे आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. इतरांचे काय करायचे हे नियतीच ठरवणार आहे. मी फक्‍त परमेश्‍वराला घाबरतो इतर कुणालाही नाही.’’

सावंतवाडीपुरताच मर्यादित नाही
भाजप पक्षाने मला प्रदेशचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. संपूर्ण राज्यात मला पक्षाच्या बांधणीचा अधिकार आहे. त्यामुळे मी सावंतवाडी पुरताच मर्यादित नाही. कणकवली शहर आणि येथील मतदारसंघाचीही मी बांधणी करणार आहे. सध्या मी सावंतवाडी मतदारसंघाला प्राधान्य दिले आहे. तर काही दिवसांनी कणकवली मतदारसंघाचीही पुनर्बांधणी करणार असल्याचे तेली म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com