सावंतवाडी पुन्हा घडविणार स्वच्छतेचा इतिहास

सावंतवाडी पुन्हा घडविणार स्वच्छतेचा इतिहास

सावंतवाडी -  सुंदर आणि स्वच्छ सावंतवाडी शहर करण्याबरोबर स्वच्छता अभियानात पुन्हा एकदा इतिहास घडविण्यासाठी सावंतवाडी सज्ज होत आहे. स्वच्छता मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा असलेले अभियान पालिकेच्या माध्यमातून शनिवारी (ता. ४) होत आहे. पालिकेने हाती घेतलेल्या स्वच्छता अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत या उपक्रमालाही नेहमीप्रमाणे समर्थ साथ द्यावी. विशेषतः प्लास्टिक मुक्तीच्या उद्दिष्टपूर्ततेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन येथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे नागरिकांना केले. 

सावंतवाडी शहराने आपले सुसंस्कृत आणि स्वच्छ, सुंदरतेसाठी जिल्ह्यातच नाही तर राज्यात वेगळे स्थान निर्माण केले आहे. या आधी पालिकेने राज्यस्तरीय नागरी स्वच्छता अभियानात अव्वल स्थान मिळविले होते. पुन्हा एकदा सुंदरवाडी स्वच्छतेचा इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘सकाळ’ही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहे. अभियानाची सुरवात सकाळी सात वाजता येथील शिवरामराजे पुतळ्याकडून होत आहे. अभियानामागची भूमिका ‘सकाळ’ने नगराध्यक्ष साळगावकर यांच्याकडून जाणून घेतली.

श्री. साळगावकर म्हणाले, ‘‘सावंतवाडी शहराला संस्थानकालीन इतिहास आहे. शहराचे नाव पूर्वी सुंदरवाडी असे होते. त्यात सुंदर मोती तलाव आणि बाजूला असलेला नरेंद्र डोंगर यामुळे सौंदर्यात भर पडली आहे. त्यामुळे सुंदरवाडी नावाप्रमाणे अधिकच सुंदर दिसत आहे. जिल्ह्यात आणि राज्यात सावंतवाडी स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून नावारुपास आले आहे. तब्बल दोन वेळा राज्यात पालिकेने स्वच्छतेसाठी क्रमांक प्राप्त केले आहेत. अशा या शहरात आता प्लास्टिक मुक्ती आणि शून्य कचरा संकल्पना घेऊन पालिकेने वाटचाल सुरू केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ४ पासून पुन्हा एकदा मोहीम राबविण्यात येणार आहे. अभियानाचा प्रारंभ येथील शिवराम राजे पुतळ्यापासून होईल. त्यानंतर सर्व नागरिकांच्या सहकार्यातून मोती तलावाच्या काठचा परिसर आणि आतील भाग स्वच्छ करण्यात येईल. टप्प्याटप्प्याने शहरातील अंतर्गत भागातसुद्धा ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

मोकाट जनावरे, भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त
श्री. साळगावकर म्हणाले, ‘‘शहरात मोठ्या प्रमाणात भटके कुत्रे आणि मोकाट जनावरांचा प्रश्‍न भेडसावतो आहे. त्यातून अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पालिकेने गंभीर दखल घेतली असून कारवाईस सुरवात झाली असून त्यात सातत्य ठेवले जाईल.’’

प्लास्टिकला मूठमाती देण्याचे स्वप्न 
शहरात प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न आहे. त्यादृष्टीने व्यापाऱ्यांनी प्लास्टिकच्या पिशव्या देऊच नयेत, असे आवाहन त्यांना केले आहे. त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. नागरिकसुध्दा पालिकेच्या प्रयत्नांना निश्‍चित्त प्रतिसाद देतील, असा विश्‍वास श्री. साळगावकर यांनी व्यक्त केला.

कशी असणार मोहीम?
मोहिमेत सामाजिक संघटना, रोटरी क्‍लब, लायन्स क्‍लब, व्यापारी, रिक्षा चालक, डॉक्‍टर, वकील, इंजिनिअर यांच्यासह विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, स्काऊटचे कॅडेट सहभागी होतील. संघटनांची वेगवेगळी पथके नेमून त्यांच्या साहाय्याने मोती तलावाभोवती तसेच मुख्य रस्त्यावर स्वच्छता केली जाईल. 

‘सकाळ’चा हातभार
‘सकाळ’ने जिल्ह्यासह शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय सहभाग घेतला. शहरात स्वच्छतेविषयीच्या अनेक उपक्रमांत पुढे राहून जागृतीचे काम केले. शहर स्वच्छता, भटक्‍या जनावरांचा प्रश्‍न, मोती तलावाचे सौंदर्य टिकविण्यासाठीची जागृती आदींविषयी नेहमीच आवाज उठविला. शहरातील अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांविषयी जागृतीसाठी फेरी काढून प्रबोधन केले. वनविभाग आणि पालिकेच्या सहकार्याने नरेंद्र डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवली. आता शहरातील प्लास्टिकमुक्ती आणि स्वच्छतेसाठी पालिकेने घेतलेल्या निर्णयालाही ‘सकाळ’चे पाठबळ आहे. या सुंदरवाडीचे सौंदर्य आणखी खुलविणाऱ्या उपक्रमांत आपणही सहभाग घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com