गोवा ते मुंबई दरम्यान कंटेनरची वाहतूक रेल्वेने शक्‍य

गोवा ते मुंबई दरम्यान कंटेनरची वाहतूक रेल्वेने शक्‍य

बाळ्ळी - मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. कोकण रेल्वे येथे उभारत असलेल्या सुविधा केंद्र प्रकल्पामुळे (लॉजिस्टिक बार) हे शक्‍य होणार आहे. येत्या एप्रिलपासून सुरू होणाऱ्या प्रकल्पानंतर गोवा ते मुंबईदरम्यान कंटेनरची वाहतूक रेल्वेने करता येणे शक्‍य होणार आहे.

महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात कंटेनरची वाहतूक चालते. याचा इतर वाहतुकीवर परिणाम होतो. मुंबई ते गोवादरम्यान होणारी वाहतूक औषध कंपन्यांसह विविध मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांशी संबंधित असते. कोकण रेल्वेच्या बाळ्ळी येथे साकारत असलेल्या सुविधा केंद्रामुळे हा वाहतुकीचा ताण बऱ्यापैकी कमी होणार आहे. याआधी कोकण रेल्वेने रोरो वाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेतून ट्रकची ने-आण सुरू केली आहे. याच धर्तीवर आता मोठ्या कंटेनरचीही वाहतूक केली जाणार आहे.

प्रकल्प एप्रिलमध्ये पूर्ण होणार
हा प्रकल्प ८१ हजार ३०० चौरस मीटर क्षेत्रात आणि ४० कोटी रुपयांची गुंतवणूक करून साकारला जात आहे. तो एप्रिलमध्ये पूर्ण होणार आहे. या ठिकाणी कंटेनर साठवणुकीची व्यवस्था असणार आहे.

या केंद्राचे काम गतीने सुरू झाले आहे. कोकण रेल्वे महामंडळाच्या महसुलात किमान पन्नास टक्के वाढ या प्रकल्पातून अपेक्षित धरण्यात आली आहे. साहित्य वाहून नेणाऱ्या मोठ्या कंटेनरची साठवणूक आणि कंटेनर रेल्वेवर चढवण्याची सारी व्यवस्था या केंद्रात करण्यात येत आहे. बाळ्ळी रेल्वे स्थानक ते हे केंद्र असे रूळ घालण्यात येत आहेत. कोकण रेल्वेने आयोजित केलेल्या पत्रकारांसाठीच्या पाहणी दौऱ्यात या केंद्राच्या कामाची प्रगती पाहता आली.

झुआरी कंपनी, सेसा गोवा, नेस्ले, कोलगेट, सिमेन्स, रेनबॅक्‍सी, एमआरएफ टायर, आयएफबी इंडस्ट्री, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, मुलखावर स्टील, हिंदुस्थान केबल्स, फिनोलेक्‍स केबल्स, चौगुले इंडस्ट्री, सिप्ला, ग्रेनमार्क फार्मा, लुपिन फार्मा आदी कंपन्या गोव्यात आहेत. गोव्यातील मोरगाव बंदरात निर्यातीची व्यवस्था नाही. यामुळे गोव्यात तयार होणारा माल निर्यात करण्यासाठी मुंबईतील बंदराचा वापर करावा लागतो. साहजिकच ही वाहतूक कंटेनरमधून महामार्गाने होते. ती सर्व रेल्वेकडे वळवता येणार आहे. यात वेळेची आणि काही प्रमाणात आर्थिक बचत होणार असल्याने कंपन्यांचाही याला चांगला प्रतिसाद अपेक्षित आहे. तसे झाल्यास महामार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com