डांबर स्वतःला लागणार नाही हे बघा - देवदत्त सामंत

डांबर स्वतःला लागणार नाही हे बघा - देवदत्त सामंत

मालवण - महामार्ग दुरुस्तीचे काम रोखणाऱ्या आमदार वैभव नाईक यांच्या भावाने मालवण कसाल रस्त्याचे केलेले काम पडलेल्या खड्ड्यांमुळे निकृष्ट दर्जाचे झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे महामार्गाची दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराच्या तोंडाला डांबर फासण्यापूर्वी तेच डांबर स्वतःच्या तोंडाला लागू नये याची काळजी आमदार वैभव नाईक यांनी घ्यावी, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत यांनी  येथे पत्रकार परिषदेत लगावला. 

दरम्यान, आयत्या बिळावर नागोबा बनून आमदार बनलेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी (कै.) आप्पासाहेब गोगटे यांच्या वारशाला कािळमा फासण्याचे काम केले असल्याची टीकाही त्यांनी केली. कुंभारमाठ येथे पत्रकार परिषद झाली. 

सामंत म्हणाले,‘‘आमदार नाईक यांनी काल महामार्ग दुरुस्तीचे काम रोखताना ठेकेदारास धारेवर धरले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये सहभागी झाल्याने येत्या १६ तारखेनंतर महामार्ग खड्डामुक्त दिसेल असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जाहीर केले. त्यामुळे या रस्त्याचे काम झाल्यास त्याचे श्रेय राणेंना मिळेल या भीतीपोटीच आमदार नाईक यांनी काल महामार्ग दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदारास धारेवर धरण्याचे काम केले आहे. आमदार, खासदार, पालकमंत्री शिवसेनेचा असतानाही जिल्हा विकासापासून अद्यापही वंचित आहे. आरोग्य, शैक्षणिक तसेच अन्य समस्यांनी सर्वजण हैराण झाले आहेत.’’ 

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीची निविदा चतुर्थीपूर्वी निघाली होती. यात ज्या अटी घालण्यात आल्या त्यानुसार रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हे संबंधित ठेकेदाराने करायचे आहे; मात्र याची माहिती आमदार नाईकांना सहा महिन्यानंतर मिळते हे दुर्दैव आहे. चतुर्थीपूर्वी महामार्ग दुरुस्तीच्या कामासाठी आपण साडेतीन कोटी रुपये आणल्याचे आमदार नाईकांनी जाहीर केले होते. आता ते पैसे गेले कुठे हे आमदारांनी जाहीर करावे.’’

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी १६ ऑक्‍टोबरनंतर रस्ता खड्डेमुक्त केला जाईल, अशी घोषणा केल्यानंतर याचे श्रेय राणेंना मिळेल या भीतीपोटीच जनतेची दिशाभूल करण्यासाठीच आमदार नाईकांना हे आंदोलन केल्याची टीकाही सामंत यांनी केली. 

सामंत म्हणाले,‘‘भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे जिल्ह्यात १०० ग्रामपंचायतीत भाजपचे सदस्य बिनविरोध निवडून आले असून, काही ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या असल्याचे सांगत आहेत. त्याचबरोबर ३२५ ग्रामपंचायतींपैकी १७१ ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असेल असेही त्यांनी जाहीर केले आहे. एकीकडे त्यांच्याच पक्षाचे राजन तेली हे वेगळी  माहिती देत आहेत तर दुसरीकडे जिल्हाध्यक्ष जठार हे वेगळी माहिती देत आहेत. आठ दिवसापूर्वी महाराष्ट्र स्वाभीमान पक्ष एनडीएमध्ये सहभागी झाला असताना जठार हे शिवसेनेबरोबर स्वाभीमान पक्षावरही टीका करत आहेत. देशासह राज्यात मोदींची लाट असताना ज्याठिकाणी मोंदीच्या प्रचारसभा झाल्या त्याठिकाणचे आमदार, खासदार निवडून आले. देवगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारालाही नरेंद्र मोदी आले; मात्र जठारांच्या दुटप्पी भूमिकेमुळेच त्यांना पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे जठारांनी याचे आत्मपरीक्षण करावे.’’ 
भाजपचे जिल्हाध्यक्ष सर्वांची दिशाभूल करताना स्वतःचे हसे करून घेत आहेत. १७ तारखेला ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यानंतर ग्रामपंचायतीवर वर्चस्व कोणाचे आहे हे स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील जनता नारायण राणे यांच्या पाठीशी असल्याने जिल्ह्यातील ९० टक्के ग्रामपंचायतीवर समर्थ पॅनेलचे सरपंच, सदस्य निवडून येतील असा दावा सामंत यांनी केला. 

स्वागत जठारच करतील...
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना नारायण राणे यांनी नुकतीच केली. हा पक्ष आता एनडीएमध्ये सहभागी झाला आहे. नारायण राणे यांच्या माध्यमातूनच जिल्ह्याचा विकास होऊ शकतो, हे जिल्ह्यातील जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे राणेंची मंत्री पदी वर्णी लागणार हे निश्‍चित आहे. यात मंत्री म्हणून जिल्ह्यात दाखल झाल्यावर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी राणेंचे पहिले स्वागत करणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हेच असतील, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com