सिंधुदुर्गात सुपारीचे उत्पन्न घटल्‍याने धोका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

कोलझर - वातावरणातील बदलामुळे सुपारीच्या उत्पन्नात यंदा निम्म्याहून जास्त घट झाली आहे. यामुळे या पिकावर अवलंबून बागायतदार आर्थिक अडचणीत आले आहेत. खत व्यवस्थापन, देखरेख नीट करूनही उत्पन्नात झालेली घट आणि शासन, प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष यामुळे जिल्ह्यातील शेकडो बागायतदार हतबल झाले आहेत.

कोलझर - वातावरणातील बदलामुळे सुपारीच्या उत्पन्नात यंदा निम्म्याहून जास्त घट झाली आहे. यामुळे या पिकावर अवलंबून बागायतदार आर्थिक अडचणीत आले आहेत. खत व्यवस्थापन, देखरेख नीट करूनही उत्पन्नात झालेली घट आणि शासन, प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष यामुळे जिल्ह्यातील शेकडो बागायतदार हतबल झाले आहेत.

जिल्ह्यात आंबा, काजू पाठोपाठ सुपारी हे प्रमुख पीक आहे. दोडामार्ग, वेंगुर्ले, मालवणचा काही भाग आणि कुडाळ या तालुक्‍यांमध्ये केवळ सुपारी बागांवर अवलंबून शेकडो बागायतदार आहेत. नारळ आणि सुपारी ही दोन्ही पिके एकत्र घेतली जातात, मात्र शासन दरबारी सुपारी पीक तसे बेदखल आहे. यावर फारसे संशोधनही झालेले नाही आणि असलेला अभ्यास बागायतदारांपर्यंत पोचविण्यासाठी कोणतेच प्रोत्साहन दिले जात नाही. सुपारीची विक्रीही गोव्याच्या मेहरबानीवर अवलंबून आहे. सुपारी खरेदीची यंत्रणा जिल्ह्यात नाही. जिल्ह्यात खरेदी केलेली सुपारीसुद्धा गोव्यात पाठविली जाते. यातच आता उत्पन्नात घट होण्याचे नवे संकट बागायतदारांसमोर उभे राहिले आहे.

गेल्या काही वर्षांपासून सुपारीची गळ होण्याचे प्रमाण वाढले होते. असंतुलित पाऊस हे या मागचे मुख्य कारण आहे. आता यात उत्पन्नात घट होण्याचे नवे संकट आले आहे. गेल्या वर्षीपासून सुपारीचे उत्पन्न कमी होत असल्याचे बागायतदारांच्या लक्षात आले. अनेकांनी गेल्या वर्षी शेण व खताचे व्यवस्थापन अधिक चांगले केले. मात्र तरीही यंदा उत्पन्नात मोठी घट झाली आहे. काही बागांमध्ये तर सरासरीच्या २५ टक्केही उत्पन्न आलेले नाही. सर्वसाधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सुपारी पीक तयार व्हायला सुरवात होत होती. यंदा सप्टेंबर निम्मा संपला तरी अजून अनेक बागात पीक तयार व्हायला सुरवात झालेली नाही. सातत्याने दोन वर्षे उत्पन्नात झालेली ही घट वातावरणातील बदलामुळे असल्याचा अंदाज बागायतदार वर्तवत आहेत.

सुपारी हे संवेदनशील पीक मानले जाते. याला पाणी देण्याचे व्यवस्थापन वर्षानुवर्षे अनुभवाच्या माध्यमातून बागायतदारांनी तयार केले आहे. मात्र गेल्यावर्षी एकाच दिवशी उष्मा आणि थंडी असे तापमानातील चढ-उतार पहायला मिळाले. त्याचे परिणाम सुपारीच्या पिकावर जाणवत होते. यामुळेच प्रामुख्याने उत्पन्नात घट झाल्याचे मानले जात आहे. अनेक कुटुंब या पिकावर अवलंबून आहेत. वर्षभर मेहनत घेवून हाताशी पीक न आल्याने त्यांच्या आर्थिक उत्पन्नात निम्म्याहून जास्त घट होणार आहे. भविष्यात असाच प्रकार सुरू राहिल्यास या पिकावर अवलंबून राहणे कठीण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पीक दुर्लक्षित
प्रशासनाच्या पातळीवर सुपारीचे पीक कायमच दुर्लक्षित राहिले. दोन-तीन संकरित प्रजातींच्या पलीकडे या क्षेत्रात फारसे संशोधन झालेले नाही. संकरित जाती फारशा प्रमाणात लावल्याही जात नाहीत. प्रशासनाच्या यादीतून बेदखल असलेल्या या पिकातून मिळणारे उत्पन्न तसे चांगले असते. त्यामुळे याच्या लागवड क्षेत्रात वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे होते; मात्र तसे झालेले नाही. सुपारीवर होणाऱ्या वातावरणातील बदलाचा किमान अभ्यास सुरू करावा, अशी अपेक्षा बागायतदार व्यक्त करत आहेत.