आठवडाभर थांबा; राजकारणाला कलाटणी - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी - आठवडाभर थांबा. जिल्ह्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार आहे. कोण मागच्या दाराने प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असेल तर ईश्‍वरी कृपा तसे होऊ देणार नाही, असे सूचक विधान पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.

सावंतवाडी - आठवडाभर थांबा. जिल्ह्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार आहे. कोण मागच्या दाराने प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असेल तर ईश्‍वरी कृपा तसे होऊ देणार नाही, असे सूचक विधान पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.

गोवा-बांबुळी येथे पहिल्याप्रमाणे जिल्ह्यातील रुग्णांना उपचार मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा करणार आहे. जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन सेवा द्यावी, असे आवाहन संबंधितांना करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. श्री. केसरकर यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत, माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे आदी उपस्थित होते 

केसरकर म्हणाले, ‘‘राज्याच्या राजकारणात असलेले राणे काही दिवसांपूर्वी जिल्हास्तरावर आले. आता मात्र त्यांचे कणकवली मतदार संघापुरते नेतृत्व शिल्लक राहिले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याला यश मिळाले, असा दावा करणाऱ्या स्वाभिमान पक्षाचे पूर्वीच्या तुलनेत सदस्य कमी झाले आहेत. म्हणजे राणेंची जिल्ह्यातील ताकद संपली आहे. दुसरीकडे गाव पातळीवरच्या राजकारणात आपण कधीही उतरलो नाही; अन्यथा वेगळे चित्र दिसले असते.’’

श्री. केसरकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यात मी माझ्या काळात मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. त्याचा योग्य तो उपयोग करून येणाऱ्या काळात जिल्ह्यात अनेक विकासाचे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे; परंतु जीएसटी तसेच अन्य कारणे सांगून ठेकेदारांनी कामे करण्यास नकार दिल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे; मात्र संभाव्य अपघात लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही दुरुस्तीकामे करण्यात यावीत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सावंतवाडी विभागातील काम येत्या चार दिवसांत सुरू होणार आहे. कणकवली विभागालाही तशाच सूचना देण्यात आल्या आहेत.’’

कामात नियमिततेसाठी प्रयत्न करणार
निकृष्ट तसेच वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदारांवर राज्यात काही ठिकाणी थेट कारवाई करण्यात आली आहे. या बाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘कामात सातत्य राहण्यासाठी या ठिकाणीही कारवाई होणे अपेक्षित आहे; मात्र त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आपले अधिकार वापरणे गरजेचे आहे. येणाऱ्या आठवड्यात आपण संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामात नियमितता आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे; परंतु करोडो रुपयांचा निधी आणल्यानंतर योग्य काम होते की नाही हे पाहणे जिल्हावासीयांचे कर्तव्य आहे.’’

रेल्वे अपघाताबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा 
श्री. केसरकर म्हणाले, ‘‘दुरांतो एक्‍स्प्रेसला नेमळे येथे अपघात झाला. याबाबतची माहिती मी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.’’