हत्ती हटाव मोहीम आता कोणत्या दिशेने?

हत्ती हटाव मोहीम आता कोणत्या दिशेने?

कर्नाटकातून महाराष्ट्रात आलेल्या हत्तींना नैसर्गिक अधिवासात पाठविण्यासाठी सजविलेली हत्ती हटाव मोहीम असो नाहीतर माणगाव खोऱ्यातील हत्ती पकड मोहीम असो, या काळात तीन हत्तींचे बळी गेले आहेत. निष्णात पशु वैद्यकीय अधिकारी आणि कुशल प्रशिक्षक तसेच कर्तव्यदक्ष वनधिकारी असूनही हत्तींचे गेलेले बळी निश्‍चितच क्‍लेशकारक होते.खासदार विनायक राऊत आणि सावंतवाडीचे सहायक वनसंरक्षक आता नव्याने हत्ती पकड मोहीम राबविण्याची तयारी करीत आहेत. त्यांचे ते पाऊल पुन्हा हत्तींचे बळी घेण्याच्या दिशेने तर पडत नाही ना अशी भीती व्यक्त होत आहे.

हत्तींची संख्या तेवीसपर्यत?
कर्नाटकातील दांडेतील अभयारण्यातून माणमार्ग मांगेलीतून महाराष्ट्रात हत्तींनी प्रवेश केला. ऑक्‍टोबर २००२ मध्ये हत्तींचा कळप मांगेलीत पहिल्यांदा दिसला. तेरी हत्तींचा कळपाचा फोटो ‘सकाळ’ला सर्वात प्रथम मिळाला, पण कळपातील हत्तींची संख्या २३ पर्यंत गेल्याचा दावा वनविभागाने केला होता. प्रत्यक्षात एकत्र अथवा विखुरलेले तेवीस हत्ती कुणी पहिल्याचे ऐकिवात नाही.

आतापर्यंत आठ बळी
हत्तीच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांनी आतापर्यंतची संख्या आठ आहे. सुरवातीला बळी गेलेल्या पाच जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख तर नंतरच्या तिघांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. माणसाची किंमत कुणीच करू शकत नाही. त्यामुळे भरपाई तुटपुंजीच म्हणावी लागेल.

आतापर्यंत तीन हत्तींचा बळी
साधारणपणे अख्ख्या सिंधुदुर्गात पदभ्रमण करणाऱ्या हत्तींची संख्या सरासरी चार एवढीच होती. २००९ मध्ये हत्ती हटाव मोहीम राबविली तेव्हा ती संख्या चारच होती. त्यातील एका हत्ती मृत्यू झाला. एकाला पकडून विदर्भाला सोडले तर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलेला एक हत्ती परत आला. त्यामुळे पुन्हा दोन हत्ती कायम राहिले. २०१४ मध्ये माणगाव खोऱ्यात हत्ती पकड मोहीम राबविली. तेव्हा तीन हत्ती पकडले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला तर एकाला माणसाळण्यासाठी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले.

दोन वर्षांनी पुनरागमन...
तीन हत्तींचा बळी गेली, दोन हत्ती माणसाळण्यासाठी विदर्भ आणि मदुमलाई अभयारण्यात पाठविण्यात आले. त्यामुळे हत्ती संकट कायम दूर झाले म्हणून सिंधुदुर्गवासिय आणि वनविभागाने सुटकेचा निश्‍वास सोडला; पण पुन्हा नव्याने हत्तींचा एक कळप मार्च २०१६ मध्ये पुन्हा दोडामार्ग तालुक्‍यात दाखल झाला.

वनविभागाचा दावा फोल
एप्रिल व मे २०१७ मध्ये तिलारी खोऱ्यात तेरा हत्तींचा वावर होता असा दावा वनविभाग करत आहे. प्रत्यक्षात त्याबाबतचे कोणतेही पुरावे वनविभागाकडे नाहीत. तसेच नुकसान करणाऱ्या एखाद दुसऱ्या हत्तीची संख्या पाहता विभागाने केलेल्या तेरा हत्तींच्या वावराचा दावा निश्‍चित फोल आहे.

वनविभागाकडे सहा हत्तींचीच माहिती
वनविभाग हत्तींचा आकडा फुगवून सांगत असले तरी त्यांच्याकडील अधिकृत माहितीनुसार तिलारी खोऱ्यात चार नर, एक मादी आणि एक पिल्लू असे सहाच हत्ती तिलारीत होते हे स्पष्ट होत आहे.

 असे आहेत सहा हत्ती
वनविभागाकडून १७ ते १९ मे २०१७ या काळात तिलारी खोऱ्यात हत्तींच्या पावलाचे ठसे घेण्यात आले. त्यांच्या मोजमापावरून सहा हत्ती असल्याचे स्पष्ट झाले. त्या हत्तींचे वर्णन असे आहे.

उपद्रव पण मर्यादित
वनविभागाने हत्ती तेरा आहेत असे म्हटले तरी किंवा सहा आहेत असे म्हटले तरी नुकसान करणाऱ्या हत्तीची संख्या एक अथवा दोनच आहे. शिवाय त्यांच्याकडून नुकसान होणाऱ्या गावाची संख्याही एकच आहे. एक-दोन दिवसासाठी चार हत्तींचा कळप सोनावल मध्ये गेला. तेथून ते परतला तो अज्ञातवासातच गेला होता. तेवढा अपवाद वगळता तर एखाद दुसऱ्या हत्तीचा उपद्रव केवळ आयनोडे हेवाळे ग्रामपंचायत हद्दीतील वाड्या वस्त्यांपुरता मर्यादित आहे.
 
शेतातील प्रयोग हत्तींसाठी पोषक
परिसरात भातशेती प्रमुख पीक आहे. हत्तींचा कळप भातासाठी धावून येतो. त्यामुळे अनेकांनी भातशेती सोडली तर दुसरीकडे आयनोडे हेवाळेत चारसूत्री शेती प्रकारातून कमीत कमी जागेत सर्वाधिक भाताचे उत्पन्न घेण्याचे प्रयोग सुरू आहेत. अर्थात ती बाब हत्तींच्या आगमनास आणि मुक्कामास पोषक आहे. वनविभागाने आणि शासनाने त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन शेतकऱ्यांना करून हत्ती नुकसान करणार नाही असे भाताला पर्यायी पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्याची गरज आहे.
 
शेतकरी अभयारण्यासाठी अनुकूल
हत्तींच्या बंदोबस्तासाठी हाकारा पथके तैनात केली, फटाके, अग्निबाणांचा मारा केला. खंदक खोदले, मिरची पूड व ऑईल मिश्रीत दोरखंड बांधले. तरीही हत्ती येतच आहेत. २०१४ मध्ये जिल्ह्यात एकही हत्ती नव्हता; पण २०१६ मध्ये त्यांचे पुनरागमन झाले. आता हत्ती पकड मोहिम राबवून त्यांना परत पाठविले तरीही ते पुन्हा येणारच. वनविभाग किंवा सरकार सुद्धा ते परतविणार नाहीत याची हमी देऊ शकत नाही. त्यामुळे आपले पुर्नवसन करून हत्ती अभयारण्य उभारा अशी अपेक्षाही शेतकरी व्यक्त करत आहेत. जनमत चाचणी घेतल्यास त्यांची भूमिका स्पष्ट होईल.

खासदारांना घाई का?
माणगाव खोऱ्यात हत्ती पकड मोहिम राबवली त्यावेळी दोन हत्तींचा बळी गेली. वन्य हत्ती ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याचे संरक्षण करण्याची गरज असताना घाईगडबडीत व अयशस्वीपणे मोहिम राबवून हत्तींचे बळी घेतले गेले. त्याची पुनरावृत्ती नव्याने हत्ती पकड मोहिम तिलारीत राबविली तर होणार नाही याची हमी खासदार विनायक राऊत, शासन अथवा वनविभाग देणार आहे का असा प्रश्‍न पर्यावरणप्रेमी विचारात आहेत.
 
हमी अथवा अभयारण्याचा पर्याय हवा
वनविभागाचे उपसंरक्षक समाधान चव्हाण यांनी कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षकांना ५ ऑगस्टला पत्र पाठवून वन्य हत्ती पकड मोहिम राबविण्याची मागणी केली आहे. खासदार राऊत यांच्या ५ जुलैच्या हेवाळे दौऱ्यावेळच्या बैठकिचा उल्लेख करून ती मागणी केली आहे. त्यामुळे हत्ती पकड मोहिम राबविण्यास वनविभाग अनुकूल असल्याचे दिसते. पण तीन हत्तींचा बळी घेणारे वनविभाग, वनअधिकारी, शासन आणि शासनाचे प्रतिनिधी येत्या मोहिमेत एकाही हत्तीचा बळी जाणार नाही याची खात्री देऊ शकतात का? तसे नसे तर ती मोहिम राबविण्याऐवजी अभयारण्याच्या प्रस्तावावर सकारात्मक विचार होण्याची गरज आहे.

सोळा महिन्यात ५३ लाखांची भरपाई
मार्च २०१६ पासून जून २०१७ पर्यंतच्या १६ महिन्यांच्या काळात वनविभागाकडे नुकसान भरपाईची २४८ प्रकरणे प्रकरणे दाखल झाली. त्यापोटी वनविभागाने ५३ लाख ४१ हजार ७६५ रुपये एवढी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली. मार्च २०१६ मध्ये १९ प्रकरणासाठी ४ लाख ४२ हजार ४३९ रुपये, एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या काळातील १९५ प्रकरणांसाठी ४२ लाख ९ हजार ७०६ रुपये तर एप्रिल ते जून २०१७ मधील ३४ प्रकरणांसाठी ६ लाख ८९ हजार ६२० रुपये एवढी भरपाई देण्यात आली.

हत्ती क्रमांक १
 साधारण २५ वर्षे वयाचा वयस्कर नर, सुळ्यांची लांबी ३ फूट, पायाची घेरी २१० सेंमी, उंची १० फूट.

हत्ती क्रमांक २
 साधारण ९ वर्षे वयाचा किशोरवयीन नर, उंची ५ फूट, सुळ्यांची लांबी २ फूट, पायाची घेरी १७० से. मी.

हत्ती क्रमांक ३
 १७ वर्षे वयाची वयस्क मादी, उंची ८ फूट, पायाची घेरी २०० सें. मी.

हत्ती क्रमांक ४
 १५ वर्षे वयाचा तरुण नर, उंची ८ फूट, सुळ्याची लांबी २.५ फूट, पायाची घेरी २०० सें.मी.

हत्ती क्रमांक ५
 १ वर्षाचे लहान पिल्लू, उंची ४ फूट, पायाची घेरी १३० से. मी.

हत्ती क्रमांक ६
 २८ वर्षे वयाचा वयस्क नर, उंची ११ फूट, पायाची घेरी २३० सेंमी, सुळ्याची लांबी, ३.५ फूट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com