कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

आचरा -  गेली दोन वर्षे आचरा रामेश्‍वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीतील तत्कालीन सचिवांनी संस्थेचे दप्तर गायब केल्यानंतर सोसायटीच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने येथील पोलिसांकडे सबळ पुरावे सादर करत वारंवार संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, कारवाई होत नसल्याने दप्तरी दस्तऐवज गायब असल्याने कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसह संचालकांनी येथील पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला.

आचरा -  गेली दोन वर्षे आचरा रामेश्‍वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीतील तत्कालीन सचिवांनी संस्थेचे दप्तर गायब केल्यानंतर सोसायटीच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने येथील पोलिसांकडे सबळ पुरावे सादर करत वारंवार संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, कारवाई होत नसल्याने दप्तरी दस्तऐवज गायब असल्याने कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसह संचालकांनी येथील पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला.

सहायक पोलिस निरीक्षक संजय धुमाळे यांच्या लेखी कारवाईच्या आश्‍वासनानंतर ठिय्या मागे घेत दोन दिवसांत कारवाई न झाल्यास कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्यास शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देणार असल्याचा इशारा ग्रामस्थ व संचालकांनी येथील पोलिसांना दिला. या वेळी रामेश्‍वर सोसायटीचे अध्यक्ष धनंजय टेमकर, जिल्हा परिषद सदस्य जेरोन फर्नांडिस, माजी सरपंच मंगेश टेमकर, सुरेश ठाकूर, शेखर मोर्वेकर, पंचायत समिती सदस्य निधी मुणगेकर, संतोष कोदे, मनोहर वाडेकर, मनोहर कांबळी, वायंगणकर, भाऊ घाडी, लक्ष्मण आचरेकर, सुहास परब, तात्या भिसळे, अन्य शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आचरा पोलिस ठाण्यात तत्कालीन सचिवावर कारवाईस विलंब का होतो आहे, याचा जाब विचारण्यासाठी संचालकांसह आलेल्या शेतकरी सभासदांनी आक्रमक भूमिका घेत पोलिस निरीक्षक धुमाळे यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला. कारवाईस विलंब का, असा सवाल करत ठोस कारण देण्यास सांगितले. आज जर तुम्ही तत्कालिन सचिवांवर कारवाई केलीत तर झालेल्या भ्रष्ट कारभारची व सामान्य शेतकऱ्यांचे पैसे कोणी खाल्लेत ते बाहेर येतील. मालवण तालुक्‍यात अग्रेसर असणारी सोसायटी रसातळाला नेणारा समोर येईल, या तत्कालिन सचिवाच्या मागे खरा सूत्रधार कोण आहे हेही समोर येईल. आपण राजकीय दबावाखाली येवून काम करू नका, असे ग्रामस्थांनी धुमाळे यांना सांगत कारवाई करून आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे ग्रामस्थांनी सुनावले. या वेळी आचरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक धुमाळे यांनी कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते.

यावर जमलेल्या शेतकरी बांधवांसह संचालकांनी आम्हाला नुसते आश्‍वासन नको तर दोन दिवसात ठोस कारवाई तत्कालीन सचिवांवर केली जाईल, असे लेखी आश्‍वासन देण्याच्या मागणीवर ठाम राहिले. धुमाळे यांनी तत्कालीन सचिवांविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार कोणत्या कायद्याअंतर्गत व कलमान्वये गुन्हा होतो याचे वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेऊन कारवाई केली जाईल, असे लेखी आश्‍वासन दिल्यावर आपला ठिय्या शेतकऱ्यांनी घेतला. दोन दिवसात कारवाई न झाल्यास सर्व शेतकरी व ग्रामस्थ न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देण्याचा इशारा धुमाळे यांना दिला.

कर्जमाफीपासून ४५० शेतकरी वंचित...
कर्जदार शेतकऱ्यांची बाजू मांडताना उद्योजक शेखर मोर्वेकर म्हणाले,‘‘आज प्रामाणिकपणे सोसायटीचे कर्ज शेतकऱ्यांनी भरली तर काहींनी कर्ज थकीत राहू नये म्हणून पतसंस्थेचे कर्ज घेऊन सोसायटीची कर्जे भरली आहेत. आज या सोसायटीची कागदपत्रे सचिवांनी गायब केल्याने कागदपत्राअभावी मिळणाऱ्या कर्जमाफीतून हेच शेतकरी वंचित राहत आहेत. आज शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सोसायटी व पतसंस्थांची कर्जे त्यांच्या डोक्‍यावर आहेत. आज जर या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या ४५० शेतकऱ्यांच्या रोषाला पोलिसच जबाबदार राहतील.’’