सावंतवाडीतील ‘ताप’सरी उतरेना

सावंतवाडीतील ‘ताप’सरी उतरेना

सावंतवाडी - गेल्या पंधरवड्यात जिल्हाभर तापसरीने थैमान घातल्यामुळे धास्ती निर्माण झाली होती. कुडाळ आणि 
सावंतवाडी तालुक्‍यांत याचा जास्त प्रभाव आहे. सावंतवाडी तालुक्‍यातील आरोग्य यंत्रणेकडून आता तापसरी आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असले अद्यापही तापसरीचा ओघ थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. या एक महिन्यात तालुक्‍यात एक हजार ४७० एवढ्या तापसरीच्या रुग्णांची नोंद झाली. त्यात तब्बल १३७ रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात आंतरुग्ण म्हणून उपचार घेत होते.

जिल्हाभरच थैमान घालत असलेली ही तापसरी आटोक्‍यात येण्यास आणखी १५ ते २० दिवस लागणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. अद्यापही तापसरीची रुग्णांचे येणे चालूच असल्याचे पाहावयास मिळत आहे. 
भातशेती कापणी हंगामात शेतकऱ्यांना तापसरीने घेरले. तालुक्‍यात गेल्या एक महिन्यापासून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात व शहरातील उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्येत मोठी वाढ झाली. यातच याच महिन्याच्या २ तारखेला तालुक्‍यातील लेप्टोचा पहिला बळी गेला. तर जिल्ह्यातील इतर तालुक्‍यातही लेप्टो व डेंगीने तापसरीचे रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून आली.

तालुक्‍यात ऑक्‍टोबर १७ ते नोव्हेंबर १६ या कालावधीत पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रात ३३५ पुरुषांना तर ४२२ महिलांना तापसरीची लागण झाली.  मिळून एका महिन्यात ७५७ रुग्णांची नोंद झाली होती. 

येथील उपजिल्हा रुग्णालयाची आकडेवारी पाहता ७१३ तापसरीच्या रुग्णांची नोंद झाली होती. यात ५७६ बाह्य रुग्ण तर १३७ जण तापसरीने हॉस्पिटलमध्ये उपचारार्थी म्हणून दाखल झाले होते. तापसरीची ही आकडेवारी प्रथमच इतकी वाढली आहे. यात तब्बल १९ रुग्ण लेप्टो पॉझिटिव्ह आढळले. त्यातील मळगाव येथील सतेज गोसावी यांचा लेप्टोच्या स्वरुपातील पहिला बळी गेला. तत्पूर्वी आंबेगाव व सोनुर्ली येथील शाळकरी मुलाचा तापसरीने मृत्यू झाला होता. तसेच तळवडे येथील युवतीचाही तापसरीने मृत्यू झाला होता. त्यातच भातशेतीचा हंगाम आला असल्यामुळे लेप्टोची मोठी धास्ती शेतकरीवर्गाला होती. त्यातच डेंगीचे ४ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते. त्यातील एक रुग्ण अद्यापही उपचार 
घेत आहे.

जिल्ह्यात नुकतेच कुडाळ व पाठोपाठ माणगावमधील दोघांचा तापसरीने मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यातच आणखी किती तापसरीमुळे बळी जातील हे सांगता येत नाही. तापसरीचे वाढत असलेले रुग्ण व बळी जात असलेल्या जिल्हावासीयांची वाढत जाणारी आकडेवारी पहाता आरोग्य विभागाही ॲलर्ट झाला आहे. तापसरी जोखीमग्रस्त भागात पाहणी व सर्वेक्षण करण्याचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. 
त्यातच काल खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली. तर आज आरोग्य समितीची सभाही बोलविण्यात आली होती. लेप्टोचे किंवा अन्य तापसरीच्या आजाराने रुग्ण दगावू नये यासाठी शक्‍य तशा उपाययोजना करण्याचे काम आरोग्य विभाग करत आहे.

शेती कामांचा हंगाम असल्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतात काम करण्याखेरीज पर्यायच नाही. मात्र अशातच तापसरीच्या लक्षणानेही नागरिकांत आता धास्ती लागून राहिली आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडूनही आता तालुका पातळीवरील नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य समितीच्या सभा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तशी कार्यवाहीही उद्यापासून होणार आहे. सध्या तापसरीच्या रुग्णांनी दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी रांगा लागत आहेत.

तापसरीमुळे यंदा जिल्ह्यातील बराचसा भाग प्रभावित झाला आहे. सध्या भातकापणीचा हंगाम आहे. त्यामुळे तापसरी शक्‍यता मोठी आहे. मात्र आटोक्‍यात येण्यासाठी काही काळ लागणार आहे. १५ ते २० दिवस लागणार आहे.
- डॉ. उत्तम पाटील,
उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com