उत्खननप्रकरणी उत्तम स्टीललाच दंड 

उत्खननप्रकरणी उत्तम स्टीललाच दंड 

सावंतवाडी - सातार्डा येथील उत्तम स्टील कंपनीच्या आवारात झालेल्या बेकायदा गौण खनिज उत्खननाला संबंधित कंपनीच जबाबदार आहे, असा ठपका येथील तहसिलदार सतिश कदम यांनी ठेवला आहे. दंडापोटी पाच कोटी अठरा लाख रुपये एक महिन्यात शासनाला जमा करावे अन्यथा महसुल थकबाकी म्हणून जमिन वसूल करू, असे आदेश तहसिलदारांनी दिले आहेत.

उत्खनन केलेली जमिन ही कंपनीच्या मालकीची आहे. त्यामुळे त्याठिकाणी उत्खनन होवू नये, यासाठी सुरक्षा रक्षक नेमून कंपनीने योग्य ती काळजी घेणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नाही, असेही कदम यांनी आदेशात म्हटले आहे. 

याबाबतची तक्रार तेथील शेतकरी गोविंद प्रभू यांनी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून महसुल विभागाकडे केली होती. त्यानंतर संबंधित कंपनी बेकायदा उत्खननाची दंड भरत नसेल तर त्यांच्याकडून जमिन वसूल करुन घ्या, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते. या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई केल्याचे समजते. 

याबाबतचा आदेश प्राप्त झाल्यानंतर श्री. प्रभू यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, "गेले अनेक वर्षात कुटुंबियांच्यावतीने उत्तम स्टील कंपनीसाठी दिलेल्या जमिनीत अज्ञात लोकांकडून उत्खनन सुरू होते. उत्खननात कंपनीच्या अधिकाऱ्यांसह महसुलच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय आहे. याबाबतची तक्रार महसुल विभागाकडे केली; मात्र जिल्हास्तरावर योग्य दखल न घेतल्याने मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली. त्यालासुध्दा जिल्हाधिकाऱ्यांनी पाने पुसण्याचे प्रयत्न केले. याबाबतचा प्रकार आमदार नितेश राणे यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून चुकीच्या पध्दतीने झालेल्या उत्खननाच्या चौकशीची मागणी केली. त्यानुसार तहसिलदार कार्यालयाकडुन पंचनामा झाला. यावेळी त्याठिकाणी कंपनीच्या मालकीच्या असलेल्या क्षेत्रात चिरे खाणीवर वापरण्यात येणारी हत्यारे डंपर तसेच अन्य वस्तू, कामगारांच्या तात्पुरत्या झोपड्या आढळून आल्या. त्यामुळे हा नेमका प्रकार काय? याला कंपनीची संमती आहे का? याबाबतचा खुलासा कंपनीच्या कार्यालयाकडुन मागविला होता.'' 

श्री. प्रभू म्हणाले, ""संबंधित उत्खनन होत असलेले क्षेत्र हे कंपनीच्या मालकीचे आहे, असे असताना अज्ञात लोक उत्खनन करत असतील तर कंपनीने खबरदारी घेणे गरजेचे आहे. सुरक्षा रक्षक नेमून रोखणे गरजेचे होते; मात्र असा प्रकार झालेला नाही. उलट याबाबत पत्रव्यवहार करुन आपला व तहसिलदार कार्यालयाचा वेळ वाया घालवला, असे आदेशात नमुद केले आहे.'' 

कारवाई नंतरही उत्खनन सुरू 
श्री. प्रभू म्हणाले, ""एकीकडे महसुल विभागाकडुन दंड वसूलीचा आदेश कंपनीला दिला आहे; मात्र त्याठिकाणी अद्यापही अनधिकृत उत्खनन सुरू आहे. जाणीवपुर्वक महसुल यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. हा सर्व प्रकार चुकीचा आहे.'' 

चोरी रोखण्याचे काम पोलिस, महसूलचे 
उत्तम स्टील कंपनीचे अधिकारी सुभाशिष दास म्हणाले, ""तहसीलदार कार्यालयाकडून जुनी नोटीस दिली आहे. यापूर्वी नोटीस दिल्यानंतर आम्ही कंपनीकडून खुलासा कळविला होता. त्यात संबंधित जमीन कंपनीच्या मालकीची असली तरी त्या ठिकाणी होणारी चोरी रोखणे हे पोलिस व महसूल यंत्रणेचे काम आहे. याबाबत वेळोवेळी आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यावेळी कोणतीही कारवाई झाली नाही; मात्र या प्रकरणात आपली यंत्रणा अडचणीत येणार असल्याचे लक्षात येतात ही नोटीस बजावली आहे. बेकायदा उत्खनन रोखणे हे महसूल व पोलीस यंत्रणेचे काम आहे. त्याचा दंड कंपनीकडून वसूल केला जात असेल तर ते चुकीचे आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com