देवरुख बाजारपेठेतील भारत बेकरीला आग

देवरुख बाजारपेठेतील भारत बेकरीला आग

साडवली - देवरुख बाजारपेठेतील हनिफ अब्बास हरचिरकर यांच्या भारत बेकरीला आज पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत बेकरी पूर्णपणे जळुन खाक झाली तर शेजारच्या भालेकर व मुळ्ये यांच्या वडापाव सेंटरलाही या आगीची झळ बसली आहे. शाॅर्ट सर्कीटने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सोमवारी पहाटे बसस्थानकासमोरील हनिफ हरचिरकर यांच्या भारत बेकरीतून धूर येताना रिक्षाचालक संतोष हेगिष्टे यांनी पाहिले .त्यांनी तातडीने हनिफ हरचिरकर यांना दुरध्वनीवरुन याची कल्पना दिली. हरचिरकर यांनी लगेच बाजारपेठेकडे धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांना हरचिरकरांनी कल्पना दिली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. व्यापारी, रिक्षाचालक, नगरसेवक, राजू काकडे अॅकॅडमी कार्यकर्ते व शहरवासियांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

सार्दळ यांच्या जेसीबीने शटर, पत्रे बाजूला करण्याचे मोठे काम केले. नगरपंचायत कर्मचारीही मदतीला धावले. मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्याने बेकरी पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी पडली.

पाउसही त्यावेळेत गायब होता.विजपुरवठाही खंडीत झाल्याने चुंडावत यांच्याकडील जनरेटरने विहिरीतील पाणी उपसा करण्पात आला  मात्र त्यालाही मर्यादा आल्या. घटनास्थळी पोलीस यंत्रणा, महसुल विभाग कर्मचारीचीही मदतीला आले होते.

बेकरीला लागलेली भीषण आग आजुबाजुच्या दुकानात पसरु नये यासाठी प्रयत्न केले गेले. दोन बाजुच्या वडापाव सेंटरमधील गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने अनर्थ टळला. बेकरीच्या वरच्या भागात ज्वेलर्स, कापड दुकान तर शेजारी लागून वडापाव सेंटर, वाॅचमेकर, चप्पल दुकान यांना धोका निर्माण झाला असता.
भारत बेकरीतील सर्व सामान जळुन खाक झाले. तीन मोठे फ्रिज, डिप फ्रिज, शीतपेये, ट्रे व सगळा बेकरी माल कपाटे, कांउटर सर्वकाही जळुन खाक झाले.

देवरुख बाजारपेठ व परीसरात वारंवार आगीच्या घटना घडत आहेत मात्र देवरुख नगरपंचायत असुनही अग्निशमन यंत्रणा नाही हे दुर्देव आहे. पाण्यासाठी नगरपंचायतीने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. बेकरीला आग लागल्यावर रत्नागिरी नगरपरीषदेला काॅल करण्यात आला .तेथील बंब जयगडला होता. जयगडहून बंब देवरुखला येईपर्यंत मोठे नुकसान झाले होते. नगरपंचायतीने आता तरी अग्नीशमन यंत्रणा उभारावी अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com