मच्छिमारांच्या प्रश्नावर मालवणमध्ये मोर्चा

मच्छिमारांच्या प्रश्नावर मालवणमध्ये मोर्चा

मालवण - एलईडी हटवा.. मच्छीमार जगवा, समुद्र आमच्या हक्काचा.. नाही कुणाच्या बापाचा.. एक रुपयाचा कढीपत्ता खासदार झाला बेपत्ता अशा मच्छीमारांच्या गगनभेदी घोषणांनी आज मालवण शहर दणाणून गेले. मच्छीमारांवर झालेल्या अन्यायाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे नेते माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात साडे आठशेहून अधिक मच्छीमार व महिला सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला असतानाही या मोर्चास जिल्ह्यातील मच्छीमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कोणतीही कार्यवाही झालेली नव्हती.

गोव्यातील एलईडीचा वापर करून मासेमारी करणारे ट्रॉलर्स पकडल्यानंतर चोरी तसेच खंडणी मागितल्याप्रकरणी मच्छीमारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे नेते व माजी खासदार नीलेश राणे यांनी पोलिस अधीक्षक हटाव साठी भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. जिल्ह्यात सध्या मनाई आदेश लागू असल्याने प्रशासनाने या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे आजच्या मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. 

मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळपासूनच शहरातील विविध नाक्यांवर तसेच मुख्य भरड नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. साडे अकरा वाजता भरड नाक्यावरून माजी खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास सुरवात झाली. यावेळी आमच्या मागण्या मान्य करा.. नाहीतर खुर्च्या खाली करा, कोण आला रे कोण आला.. मच्छीमारांचा वाघ आला, मच्छीमार एकजुटीचा विजय असो, हम सब एक है, मच्छीमारांना न्याय मिळालाच पाहिजे, एलईडी हटवा.. मच्छीमार जगवा यासह अन्य घोषणांनी शहर परिसर दणाणून सोडण्यात आला. भरड ते बाजारपेठ तेथून फोवकांडा पिंपळ ते तहसील कार्यालय अशा काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्ह्यातील मच्छीमार बांधव, महिला, महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

यावेळी उपस्थित मच्छीमारांना मार्गदर्शन करताना माजी खासदार राणे म्हणाले, मच्छीमारांवरील अन्याय थांबायला हवा यासाठीच हा मोर्चा काढण्यात आला. मच्छीमारांवर अन्याय होत असताना त्यांची बाजू घेणारा आता कोणच वाली राहिला नसल्याची टीका त्यांनी केली. महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाने मच्छीमारांवरील अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी मोर्चाची हाक दिल्यानंतर शिवसेनेकडून सोशल मिडीयाचा वापर करून मच्छीमार या मोर्चात सहभागी होऊ नयेत यासाठी त्यांना घाबरविण्यात आले. मोर्चा अयशस्वी कसा होईल यासाठी शिवसेनेने कारस्थाने रचली. मात्र जिल्ह्यातील मच्छीमारांनी या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी होताना शिवसेनेचा डाव उधळून लावला आहे. मच्छीमारांनी गोव्यातील जे तीन ट्रॉलर्स पकडले आहेत ते सोडल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसून येतील. 

मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे साधन कोण उद्ध्वस्त करत असेल तर महाराष्ट्र स्वाभीमान पक्ष कदापि स्वस्थ बसणार नाही. एलईडीविरोधात आंदोलन करणार्‍या मच्छीमारांची काय चूक होती? या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या गोव्यात सिंधुदुर्गातील मासळी घेतली जात नाही. यावर आमदार, खासदार गप्प बसले आहेत. मच्छीमारांच्या आंदोलनात मी सदैव पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी राहणार आहे. मच्छीमारांवर गुन्हे दाखल होत असतील तर पहिला गुन्हा मी घेईन. यापुढे मच्छीमारांना हात लावाल तर हात शिल्लक ठेवणार नाही. ही तर फक्त सुरवात आहे असा इशाराही श्री. राणे यांनी यावेळी दिला. 

महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाच्यावतीने आज शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यात जमावबंदी लागू असल्याने हा मोर्चा यशस्वी होईल का? याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र हा मोर्चा यशस्वी झाल्याचे दिसून आले. मात्र जमाव बंदी लागू असतानाही पोलिस प्रशासनाकडून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरापर्यत झाली नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा पोलिस प्रशासनाकडून अवमान झाल्याचे दिसून आले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यात आले

विधानसभेत पाडून मीच नोकरी देणार- नीलेश राणे

मच्छीमारांवरील अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाच्यावतीने आज छेडण्यात आलेल्या भव्य मोर्चात माजी खासदार नीलेश राणे यांनी सत्ताधारी आमदार, पालकमंत्र्यांवर सडकून टीका केली. मच्छीमारांवर अन्याय होत असताना आमदार काहीही बोलत नाहीत. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या आमदाराला पाडून मीच नोकरी देईन असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com