आडाळीत २०० कोटींची फूटवेअर डिझाइन इन्स्टिट्यूट

आडाळीत २०० कोटींची फूटवेअर डिझाइन इन्स्टिट्यूट

कळणे - आडाळीत २०० कोटींचा ‘फूटवेअर डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ प्रकल्प उभारणीसाठी ‘एडीडीआय’च्या व्यवस्थापकीय संचालकांनी एमआयडीसीतील जागेची पाहणी केली. प्रकल्पासाठी एमआयडीसीतील जागा निश्‍चित करण्यात आली. एमआयडीसीकडून जागा हस्तांतरित झाल्यानंतर दोन वर्षांत प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. आडाळीत प्रकल्प उभारणीसंबंधी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभूंनी निर्देश दिले आहेत.

‘एफडीडीआय’चा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. त्यासाठी चाळीस एकरची जागा आवश्‍यक आहे. प्रकल्पात शैक्षणिक संकुल, नागरी सुविधा, वसतिगृह व कर्मचारी वसाहत असणार आहे. अलीकडेच रत्नागिरी येथे श्री. प्रभूंनी केंद्रातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्या वेळी सिंधुदुर्गात आडाळी येथील एमआयडीसीची जागा उपलब्ध असल्याचे पुढे आले होते. त्यानंतर माजी आमदार राजन तेलींच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य राजन म्हापसेकर यांनी दिल्लीत प्रभूंची भेट घेतली. आडाळी येथील जागेत केंद्रामार्फत प्रकल्प उभारणीसंबंधी चर्चा केली. 

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या ‘एफडीडीआय’चे व्यवस्थापकीय संचालक अरुण सिन्हा, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग मॅनेजमेंट’चे अमित सिंगला यांनी आडाळी एमआयडीसी क्षेत्राला भेट दिली. या वेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी बर्गे, कार्यकारी अभियंता परशुराम करावडे, श्री. म्हापसेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, लुपिन फाउंडेशनचे योगेश प्रभू, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावकर, मनसे तालुकाध्यक्ष कानू दळवी, माजी सरपंच मधुकर गावकर, उपसरपंच सगुण नाईक, ग्रामपंचायत सदस्य पराग गावकर, माजी उपसरपंच प्रवीण गावकर आदी उपस्थित होते. 

श्री. सिन्हा यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून जागेची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर बांदा-दोडामार्ग रस्त्याला लागून असलेली जागा प्रकल्पासाठी निश्‍चित केली. श्री. सिन्हा म्हणाले, ‘‘प्रकल्पासाठी जागा योग्य असल्याने निश्‍चित केली आहे. एमआयडीसीने जागा हस्तांतरित केल्यानंतर लगेच प्रकल्पउभारणी सुरू होईल.’’

ग्रामस्थांना माहिती देताना नाडकर्णीं म्हणाले, ‘‘जिल्ह्यात अन्य ठिकाणी प्रकल्पांना विरोध असतानाही आडाळी ग्रामस्थांनी जमिनी दिल्या. त्यामुळे रोजगाराभिमुख प्रकल्पांचीच येथे उभारणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी आमचे संपूर्ण सहकार्य राहील.’’ सरपंच उल्का गावकर यांनी स्वागत केले. उपसरपंच सगुण नाईक, सदस्य विशाखा गावकर, शोभा परब, पराग गावकर, संजना गावकर, नाना देसाई, शंकर देसाई उपस्थित होते. पराग गावकर यांनी सूत्रसंचालन केले.  

‘‘मंत्री प्रभू यांनी परिसरात प्रकल्प उभारण्यासंबंधी निर्देश दिले आहेत. फूटवेअर डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ही चार प्रकारचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवते. त्यामध्ये फूटवेअर डिझाइन, लेदर गुडस्‌ ॲण्ड ॲक्‍सेसरीज डिझाइन, रिटेल मॅनेजमेंट आणि फॅशन डिझाइनचा समावेश आहे. इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्माण करून औद्योगिक क्षेत्राला पुरविले जाते.’’
 - अरुणकुमार सिन्हा,
व्यवस्थापकीय संचालक, एफडीडीआय

वाफोलीत होणार डेटा सेंटर - केसरकर 

बांदा - 'स्ट्रिम क्‍लाउड या जागतिक कंपनीने बांद्यात २२०० कोटींची गुंतवणूक करून देशातील पहिला गणिती डेटा सेंटरचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुमारे १५०० हून अधिक जणांना रोजगाराची संधी मिळेल. येथे चष्म्याचा कारखाना होणार असल्याने बांदा जागतिक नकाशावर झळकेल; मात्र यासाठी राजकीय हेवेदावे विसरून सर्वांनी एकत्र येऊन योगदान द्यावे,' असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.

बांदा-वाफोलीच्या सीमेवर स्ट्रिम क्‍लाऊड कंपनीच्या पहिल्या डेटा सेंटर प्रकल्पाचे भूमिपूजन केसरकर यांच्या हस्ते झाले. खासदार विनायक राऊत, सरपंच मंदार कल्याणकर, विक्रांत सावंत, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, मुंबईचे माजी पोलिस आयुक्‍त राकेश मारिया, उपवनसंरक्षक चव्हाण, अपर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, सावंतवाडी तहसीलदार सतीश कदम, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरस्कर, साई काणेकर, माजी सरपंच श्रीकृष्ण काणेकर, अर्चना पांगम, दोडामार्गचे सभापती गणपत नाईक, पैकाणे ग्रुपचे अध्यक्ष अतुल पैकाणे, स्ट्रिमकास्ट ग्रुपचे अध्यक्ष निमित पांड्या, धर्मेश पांड्या, गोव्याचे उद्योजक हर्षवर्धन साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. केसरकर म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील तरुण माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात यावा, यासाठी आम्ही हा प्रकल्प जिल्ह्यात सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. येथील तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी सावंतवाडीत साई सेंटर फॉर एक्‍सलन्स केंद्र सुरू होईल. तेथे माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण मिळेल. त्यानंतरच तरुणांना कंपनीत सामावून घेण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञान कंपनीबरोबरच येथे गोव्यातील कंपनी चष्म्याचा कारखाना लवकरच सुरू करणार आहे. त्या माध्यमातून येथील ५०० तरुणांना रोजगार मिळेल.’’

खासदार राऊत म्हणाले, ‘‘जागतिक दर्जाच्या कंपनीला बांद्यात आणण्याचे खरे श्रेय हे केसरकर यांनाच द्यावे लागेल.’’ सरपंच कल्याणकर म्हणाले, ‘‘बांदा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व प्रकल्पांना आम्ही सहकार्य करू; मात्र स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे.’’ कंपनीचे अध्यक्ष निमित पांड्या यांनी कंपनीची निर्मिती, उद्‌देश व प्रकल्पाची माहिती दिली. अभिनेते श्रेयस तळपदे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आठ संस्थांना आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com