सिंधुदुर्ग संवर्धनासाठीच्या दबाव गटाचा प्रभाव

सिंधुदुर्ग संवर्धनासाठीच्या दबाव गटाचा प्रभाव

मालवण - सिंधुदुर्ग किल्ला ही जिल्ह्याची अस्मिता बनली आहे. याच्या संवर्धनासाठी अनेक हात पुढे येत आहेत. किल्ले प्रेरणोत्सव समितीसह शिवप्रेमी, किल्ल्यातील रहिवासी, वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीच्या वतीने शासन, पुरातत्त्व विभागाकडे याच्या संवर्धनासाठी बराच पाठपुरावा केला. या दबाव गटाच्या प्रभावाने हळूहळू किल्ला संवर्धनाच्या दिशेने पावले पडू लागली.

समुद्री लाटांच्या माऱ्यात किल्ल्याची तटबंदी ढासळण्यास गेल्या काही वर्षात सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात किल्ला रहिवासी, शिवप्रेमींनी याबाबत पुरातत्त्व विभाग, शासन, राजकीय पुढारी यांचे याप्रश्‍नी लक्ष वेधले; मात्र याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही. त्यानंतर शिवप्रेमींनी तीव्र आंदोलन छेडल्यानंतर पुरातत्त्व विभागास जाग आली. १० ते १२ वर्षांपूर्वी किल्ल्याच्या तटबंदीची डागडुजी केली; मात्र त्यानंतरही तटबंदीस अजस्र लाटांचा मारा सुरूच राहिल्याने पश्‍चिम, दक्षिण तटबंदीस धोका निर्माण झाला. किल्ल्याच्या ढासळत्या तटबंदीचा विचार करता किल्ल्यास धोका निर्माण झाला होता. त्यामुळे याबाबत विविध संस्था, शिवप्रेमींनी आवाज उठविला. 

या ऐतिहासिक ठेव्याचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सुमारे दहा हजार पोस्टकार्ड भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यास पाठवून त्यांचे लक्ष वेधले. किल्ल्याच्या संवर्धनासाठी बंदर जेटी येथे शंभर मीटर लांब कापडावर स्वाक्षऱ्याची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेस शिवप्रेमी तसेच पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वाक्षऱ्यांचा हा फलक तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना पाठवून किल्ल्याच्या संवर्धनाबाबत साकडे घालण्यात आले.

किल्ल्याच्या दुरवस्थेबाबत शासन तसेच पुरातत्त्व विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. याची दखल घेत पुरातत्त्व विभागाकडून किल्ल्याच्या तटबंदीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.  शिवप्रेमी, किल्ला रहिवासी आणि प्रेरणोत्सव समिती यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या पाठपुराव्याला आता यश मिळत असल्याचे चित्र आहे. किल्ल्याच्या संवर्धनाबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीने आवश्‍यक उपाययोजना राबविण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. किल्ल्याच्या ३५० व्या वर्धापन दिन सोहळ्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. त्यानुसार आवश्‍यक आराखडा बनविण्याच्या सूचना केल्या. किल्ल्याचा आराखडा बनविण्यात आला आहे. सध्या हा आराखडा पुरातत्त्व विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

मोरयाच्या धोंड्याचा विकास व्हावा यासाठी शिवप्रेमी, प्रेरणोत्सव समितीने शासनाकडे पाठपुरावाही केला. त्यानुसार कोकण आयुक्त देशमुख यांनी गतवर्षी याठिकाणी भेट देत पाहणी केली होती. शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने या ठिकाणाचा विकास करता येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र ही जागा नेमकी कोणाच्या ताब्यात आहे हे स्पष्ट न झाल्याने हे काम कठीण बनले होते. त्यामुळे आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना मोरयाच्या धोंड्याचा स्वतंत्र सातबारा बनविण्याचा आदेश केला आहे. तसेच ज्या दिवशी किल्ल्याच्या पायाभरणीचा समारंभ झाला त्या दिवशी म्हणजेच २५ नोव्हेंबरला याठिकाणी शासकीय पूजा घालण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात या ऐतिहासिक ठेव्याचेही संवर्धन होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com