मालवणातील ‘ग्लास बॉटम बोटी’ची पर्यटकांना भुरळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

मालवण - जिल्ह्याची पर्यटन राजधानी असलेल्या मालवणात पर्यटकांना नवे काहीतरी देण्याचा प्रयत्न येथील पर्यटन व्यावसायिकांकडून नेहमीच केला जातो. याच धर्तीवर ‘ग्लास बॉटम बोट’ ही अनोखी सागरी पर्यटन संकल्पना चिवला बीच वॉटर स्पोर्टस्‌चा माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांनी साकारली आहे.

मालवण - जिल्ह्याची पर्यटन राजधानी असलेल्या मालवणात पर्यटकांना नवे काहीतरी देण्याचा प्रयत्न येथील पर्यटन व्यावसायिकांकडून नेहमीच केला जातो. याच धर्तीवर ‘ग्लास बॉटम बोट’ ही अनोखी सागरी पर्यटन संकल्पना चिवला बीच वॉटर स्पोर्टस्‌चा माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांनी साकारली आहे.

समुद्र तळाशी असलेल्या सागरी सौंदर्याचा खजिना विविध प्रजातीचे मासे, शंख, शिंपले, प्रवाळ व कोरल ग्लास बॉटम बोटमध्ये बसूनच पर्यटकांना पाहता येणार आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ही बोट पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली असून पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

चिवला बीच येथे येणाऱ्या पर्यटकांना नवे काही देण्याच्या उद्देशाने व येथील पर्यटन वाढीच्या दृष्टीने स्थानिकांनी पुढाकार घेत लाखो रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प राबवला आहे.

- सचिन गोवेकर, पर्यटन व्यावसायिक

पर्यटन व्यावसायिक सचिन गोवेकर यांनी कोकण किनारपट्टीवरील ही पहिलीच बोट असल्याचा दावा केला आहे. चिवला बीच येथील पिंटो रॉड्रिंक्‍स या पर्यटन व्यावसायिक युवकाने पुढाकार घेऊन लाखो रुपये खर्चाची ही बोट येथील चिवला किनारपट्टीवर आणली आहे.

काचेखालून समुद्री जगाचा आनंद

बोटीच्या तळाला पारदर्शक काचा आहेत. बोटीत बसून समुद्र सफर करताना काचेखालून समुद्री जगाचा आनंद लुटता येतो. गोव्यासह परदेशी किनारपट्टीवर अशाप्रकारे ग्लास बॉटम बोट संकल्पना पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे.

येथे येणाऱ्या पर्यटकांची पहिली पसंती स्कुबा डायव्हिंग असते. मात्र ऑक्‍सिजन सिलिंडर लावून समुद्राखाली स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटताना १० वर्षाखालील मुले व वृद्ध यांना परवानगी दिली जात नाही. याचा विचार करता मुले व वृद्ध यांच्यासह ज्यांना पाण्यात उतरण्याची भीती असते, अशा सर्वांना समुद्राखालील विश्व ग्लास बॉटम बोटच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. 

कोकण किनारपट्टीवरील चिवला बीच हा सर्वांत सुरक्षित सागरी किनारा म्हणून ओळखला जातो. येथे वॉटर स्पोर्टच्या माध्यमातून स्कुबा, बोटिंग, पॅरासेलिंग तसेच जलपर्यटनाच्या विविध सुविधा उपलब्ध आहेत. लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अन्य पर्यटन माध्यमेही येथे उपलब्ध करण्याचा मानस सचिन गोवेकर यांनी व्यक्त केला. या उपक्रमास शासनानेही सहकार्य करावे अशी अपेक्षाही गोवेकर यांनी 
व्यक्त केली.

Web Title: Sindhudurg News Glass Bottom Boat Tourism in Malvan