सिंधुदुर्गात आरोग्य व्यवस्थेवर उतारा शासकीय मेडिकल कॉलेजचा

सिंधुदुर्गात आरोग्य व्यवस्थेवर उतारा शासकीय मेडिकल कॉलेजचा

सिंधुदुर्गची आरोग्य व्यवस्था वर्षानुवर्षे व्हेंटिलेटरवर आहे. त्या सुधारणेसाठी अनेकांनी आवाज उठवला; पण व्यवस्था तसूभरही पुढे सरकलेली नाही. गोरगरीब रुग्णांचे जगणे खूपच स्वस्त झाले आहे. तऱ्हेतऱ्हेच्या तापाने माणसे मरत आहेत. यावर रामबाण औषध शोधून अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होणार नसल्याचे चित्र आहे. शासकीय मेडिकल कॉलेज आणि पर्यायाने उभे राहणारे किमान ५०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय हा त्यावरील उपाय आहे. त्यासाठी जनमताचा रेटा उभा राहिल्याशिवाय मायबाप सरकारला जाग येणार नाही. ‘सकाळ’ने ही संकल्पना २८ डिसेंबर २०१७ ला मांडली होती. त्याचे जिल्हाभरातून उत्स्फूर्त स्वागत झाले. ही संकल्पना अधिक सविस्तर मांडत आहोत...

आरोग्याचे तीन तेरा
सिंधुदुर्गात स्वातंत्र्यानंतर आरोग्य व्यवस्थेत सुधारणांचे अनेक प्रयत्न झाले. विशेषतः आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत यांच्या काळात त्याला खऱ्या अर्थाने गती मिळाली. सावंतवाडीतील आयुर्वेद महाविद्यालय, गावोगाव उभारलेली आरोग्य केंद्रे हे त्याचे दृश्‍य परिणाम; पण आज एकूण व्यवस्थेकडे पाहता रुग्णालयांसाठी उभारलेल्या सुसज्ज इमारतींच्या आत आरोग्य सुविधांचे धिंडवडेच निघाल्याचे दिसते. तज्ज्ञ डॉक्‍टरांची पदे मंजूर आहेत; पण ते उपलब्ध नाहीत. तपासणीसाठीच्या यंत्रणा आहेत; पण ते चालवायला तंत्रज्ञ नाहीत, अशी अवस्था जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आहे. अगदी जिल्हा रुग्णालयही त्याला अपवाद नाही.

गोव्यावरचे अवलंबत्व
कोणत्याही गंभीर आजाराचा किंवा अपघाताचा रुग्ण येथील आरोग्य यंत्रणेमधील कोणत्याही केंद्रात दाखल झाला की प्राथमिक उपचार करून त्याला गोव्याचा रस्ता दाखविला जातो. गोव्यात कॅज्युलिटी विभागात दाखल झाल्यापासून उपचार सुरू होईपर्यंत त्या रुग्णाला दुर्लक्षाचे दशावतार अनुभवावे लागतात. दुसरा पर्याय नसल्याने हे सगळे सहन करण्यापलीकडे सिंधुदुर्गातील गोरगरीब रुग्णांच्या हातात काहीच नसते. रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकांचे तर त्याहून जास्त हाल होतात. आम्ही महाराष्ट्रात कर भरतो आणि आरोग्य सेवेसाठी मात्र गोव्याच्या मेहरबानीवर जगतो. ही भावना गोव्यातील गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयामध्ये कोपऱ्या-कोपऱ्यात दडून आपल्याकडे पाहत असते. हा अनुभव सिंधुदुर्गातील जवळपास सर्वच कुटुंबांनी कधी ना कधी घेतला आहे. किती दिवस ही मेहरबानी डोक्‍यावर ठेवायची या प्रश्‍नाचे उत्तर दृष्टिपथात नाही

असंवेदनशील सत्ताधीश
सिंधुदुर्गातील हा सर्वात गंभीर प्रश्‍न असूनही दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत एकाही राजकीय नेत्याने तो पूर्णतः सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले नाहीत. सावंतवाडी संस्थानच्या काळात प्लेग, मलेरियाच्या आजाराने माणसे मरत होती. त्या काळातील राजे श्रीमंत बापूसाहेब महाराज यांनी त्यावर संशोधनासाठी प्रयोगशाळा उभी केली. खास ब्रिटनमधून कीटकशास्त्रज्ञ आणला. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात लेप्टो, माकडताप (केएफडी) अशा तापसरीने अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यावर उपायासाठी मात्र तत्कालिक प्रयत्नांच्या पलीकडे काहीच झाले नाही. त्यामुळे लेप्टो आणि माकडतापाचे संकट आजही मनात घर करून आहे.

आशेचा किरण...
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पडवे येथे मेडिकल कॉलेजची उभारणी केली आहे. त्यात आधुनिक सुविधांबरोबरच तज्ज्ञ डॉक्‍टरांची उपलब्धता असणार आहे. तपासणीसाठीच्या यंत्रणाही उपलब्ध असतील. 

मेडिकल कॉलेजचा पर्याय
सिंधुदुर्गात उद्‌भवणाऱ्या विविध आजारांवर फारसे संशोधन झालेले नाही. येथील रिकाम्या जागी तज्ज्ञ डॉक्‍टर यायला तयार नसतात. काही रुग्णालयांमध्ये सुविधांचा अभाव असतो. या सर्वावर उपाय म्हणजे एकाच छत्राखाली सर्व वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ उपलब्ध करणे हा आहे. असे एका छत्राखालील केंद्र शासकीय असल्यास गोरगरीब रुग्णांना त्याचा आधार वाटणार आहे. यावर शासकीय मेडिकल कॉलेज हा चांगला पर्याय आहे. प्रत्येक जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज उभारण्याचे शासनाचे धोरण आहे. दिग्विजय खानविलकर आरोग्यमंत्री झाल्यानंतर कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये मेडिकल कॉलेज सुरू झाले. अशा अनेक मंत्री, नेत्यांनी आपल्या जिल्ह्यात कॉलेज उभारावे; मात्र सिंधुदुर्गाचे सुपुत्र डॉ. दीपक सावंत राज्याच्या आरोग्यमंत्रिपदी असूनही दुर्लक्षच झालेले आहे. या रुग्णालयांच्या स्थितीतही सुधारणा झालेली नाही. शासकीय मेडिकल कॉलेज झाल्यास सुसज्ज रुग्णालय उभे राहणार आहे. त्यामुळे अनेक प्रश्‍न एका झटक्‍यात सुटणार आहेत; पण यासाठी जनमताचा रेटा उभा राहिल्याशिवाय कोणत्याच हालचाली होणार नसल्याची सध्याची स्थिती आहे. एखादे शासकीय मेडिकल कॉलेज झाल्यास त्याला आवश्‍यक यंत्रणा, तज्ज्ञ किती गरजेचे आहेत याचे निकष ठरलेले आहेत. त्या निकषानुसार असे रुग्णालय झाल्यास काय काय मिळू शकते याचा तपशील खाली दिलेला आहे. 

तज्ज्ञांची वानवा दूर होणार...
सिंधुदुर्गात सध्या एमडी असणारे डॉक्‍टर शासकीय रुग्णालयात रुजू व्हायला फारसे इच्छुक नसतात. यामुळे शासनाने वारंवार आवाहन करूनही अनेक पदे रिक्त आहेत. यामागची कारणे अनेक आहेत; पण शासकीय कॉलेज झाल्यास हा प्रश्‍न बऱ्याचअंशी सुटू शकेल. १०० विद्यार्थी संख्येचे कॉलेज उभे राहिल्यास ॲलोपॅथीमधील जवळपास २०० डॉक्‍टर या रुग्णालयात उपलब्ध होऊ शकतात. कारण शासनाच्या निकषानुसार तितक्‍या डॉक्‍टरांची आवश्‍यकता असते. शिवाय येथे शिकल्याने या भागाची आवड निर्माण झालेले विद्यार्थीही भविष्यात या ठिकाणी सेवा देण्याचा विचार करू शकतात. जिल्ह्यात दूर जावे लागत असल्याने मेडिकल ऐवजी दुसरा पर्याय स्वीकारणाऱ्या स्थानिक हुशार मुलांना हा पर्याय वाटू शकतो. 

गरिबांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी बांबुळीतील गोमेकॉ रुग्णालयातील उपचार म्हणजे केवळ नाईलाज असतो. अत्यवस्थ स्थितीतील रुग्णाला बांबुळीत नेण्याची, तेथे राहण्याची परिस्थिती नसते. शेवटच्या क्षणी बांबुळीत जायचा सल्ला दिला जातो. माणूस त्यावेळी हतबल असतो. याऐवजी इथल्या इथे चांगले उपचार मिळाले तर खऱ्याअर्थाने सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. अनेकांचे प्राण वाचतील.
- लक्ष्मण नाईक,
चार्टर्ड अकौंटंट

सिंधुदुर्गातील ग्रामीण भागामध्ये घरात एखादा आजारी पडला तर त्याच्या नातेवाईकांची काय अवस्था होते हे अनेकांनी आतापर्यत अनुभवले आहे. हा तिढा कधीतरी सुटायला हवा. सद्य:स्थितीत त्या दिशेने शासनाकडून पावले टाकली जात असल्याचे दिसत नाही. शासकीय मेडिकल कॉलेज हा यावरचा चांगला पर्याय आहे. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आणि लोकांनी एकत्र येऊन जनमताचा रेटा तयार करायला हवा.
- प्रवीण परब,
सरपंच कुंब्रल ग्रामपंचायत

जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती लक्षात घेता झाराप ते बांदा या दरम्यान शासकीय मेडिकल कॉलेज झाल्यास माणगाव खोऱ्यासह सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या तालुक्‍यातील रुग्णांना तातडीचे उपचार उपलब्ध होतील. पडवेतील राणेंनी उभारलेल्या मेडिकल कॉलेजमधून खासगी उपचार घेण्याची क्षमता असलेल्यांना तसेच त्याच्या आजूबाजूच्या भागातील तातडीच्या रुग्णांना चांगल्या सुविधा मिळू शकतील. बहुसंख्य जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज उभारली गेली आहेत. सिंधुदुर्गासाठी असे कॉलेज मिळाल्यास एकाच छत्राखाली उपचाराची यंत्रणा निर्माण होईल. 
- डॉ. प्रवीणकुमार ठाकरे,
डॉक्‍टर

जिल्ह्यात गुणवत्तेची कमतरता नाही. अनेक विद्यार्थी इच्छा आणि क्षमता असूनही वैद्यकीय क्षेत्राकडे जात नाहीत. खासगी मेडिकल कॉलेज त्यांना परवडत नाही. येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास अशा हुशार विद्यार्थ्यांसाठी पर्याय उपलब्ध होईल. यातून सेवाभावी डॉक्‍टर घडतील.
- ॲड. शामराव सावंत,
वकील

मेडिकल कॉलेज झाले तर...

  •  सिंधुदुर्गात किमान १०० विद्यार्थी क्षमता असलेले शासकीय मेडिकल झाले तर आरोग्य सुविधांविषयीचे अनेक प्रश्‍न सुटू शकतील. त्यातील काही महत्त्वाच्या निर्माण होणाऱ्या सुविधा आपण पाहू.
  •  शंभर विद्यार्थी संख्येच्या कॉलेजसाठी पाचशे खाटांचे रुग्णालय आवश्‍यक असते. यात जनरल मेडिसिनच्या १२०, बालरोगासाठी ६०, टीबी, श्‍वास रोगांसाठी २०, त्वचा कुष्ठरोगासाठी १०, मानस रोगासाठी १०, शल्य विभागासाठी १२०, अस्थिव्यंगोपचारासाठी ६०, नेत्ररोगासाठी २०, नाक, कान, घसा विभागासाठी २०, प्रसूती विभागासाठी ३० आणि स्त्रीरोग विभागासाठी ३० खाटांचा समावेश असतो.
  •  ६ ऑपरेशन थिएटरची उपलब्धता
  •  एन्डोस्कोपीचा स्वतंत्र विभाग असतो. यात एक्‍सरे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय ही यंत्रणा उपलब्ध असते. एक्‍सरेच्या किमान १५, सोनोग्राफीच्या १०, सीटी स्कॅनच एमआरआयचे प्रत्येकी एक यंत्र उपलब्ध होते. दारिद्र्यरेषेखालील रुग्णांसाठी या तपासण्या मोफत तर इतर रुग्णांसाठी अत्यंत माफक दरात उपलब्ध होतात.
  •  विविध प्रकारच्या तपासण्यांसाठी स्वतंत्र सात प्रयोगशाळांची उपलब्धता
  •  रिहॅबिलिटेशन विभागांतर्गत फिजिओथेरपी, इलेक्‍ट्रोथेरपी, हायड्रोथेरपी, ऑक्‍युपेशनल थेरपी, स्पीच थेरपीची उपलब्धता.
  •  याशिवाय स्वतंत्र कॅज्युलिटी विभाग, स्वतंत्र बर्न विभाग, कॅन्सरसाठी रेडिओथेरपीची व्यवस्था, दंत रोग चिकित्सेचा स्वतंत्र विभाग याची उपलब्धता असते.
  •  माकडताप, लेप्टो यासारख्या आजारांवर येथे संशोधन करण्याची संधीही यानिमित्ताने मिळू शकते. साथरोगांच्या निर्मूलन व प्रतिबंधासाठी अधिक प्रभावी काम होऊ शकेल.
  •  गोव्यावरील अवलंबत्व दूर होईल व उपचार केंद्रापर्यंत पोहोचण्याचे अंतर कमी झाल्याने उपचारांती जगण्याचा रेशो वाढू शकेल. 
  •  ट्रामा केअर सेंटर उपलब्ध झाल्याने अपघातग्रस्तांना दिलासा मिळू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com