सिंधुदुर्गात गावोगावी पक्षांतराला ऊत

भूषण आरोसकर
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सावंतवाडी - तालुक्‍यात ग्रामपंचायती निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. बहुतांशी ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व कमी करण्यासाठी आता तोलामोलाचा प्रतिस्पर्धी उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तालुक्‍यात सर्वच पक्ष अधिकाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यास उत्सुक आहेत. याचा परिणाम सध्या होत असलेल्या पक्षांतरातून दिसत आहे.

सावंतवाडी - तालुक्‍यात ग्रामपंचायती निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. बहुतांशी ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व कमी करण्यासाठी आता तोलामोलाचा प्रतिस्पर्धी उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तालुक्‍यात सर्वच पक्ष अधिकाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यास उत्सुक आहेत. याचा परिणाम सध्या होत असलेल्या पक्षांतरातून दिसत आहे.

जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले विधानसभा मतदारसंघातील गावातील मोर्चेबांधणीसाठी वेग आला आहे. पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांवर एकूणच सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. चतुर्थीनंतर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गावातील थेट नेटवर्कपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मिनी विधानसभेच्या निवडणुका असो वा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असो, येथे जिंकण्याच्या विचाराने नाही तर प्रतिस्पर्ध्यांकडून हार होऊ नये, यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली जाते. आता थेट सरपंच निवडला जाणार असल्याने त्याला असलेल्या निकषाआधारे जिल्ह्यातील युवा वर्गाला उमेदवारीसाठी आमंत्रण देण्यात येत आहे. जिल्ह्याच्या राजकीय हालचाली पाहता पाठिंबा देण्याविषयी कोणत्याच प्रकारचे सकारात्मक वातावरण नसलेले दिसून येत आहे. यामुळे येत्या निवडणुका स्वबळावरच रंगण्याची शक्‍यता अधिक वर्तविण्यात येत आहे. 

जिल्ह्यात काँग्रेसच्या ताब्यात असलेले ग्रामपंचायतीवरचे वर्चस्व मोडीत करण्यासाठी शिवसेनेसोबतच भाजपनेही चांगलीच कंबर कसली असल्याचे दिसून येते. यासाठी शक्‍य तितक्‍या ग्रामस्थांना मतदाराच्या रूपाने आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा व तालुका पातळीवर बोलावून ठिकठिकाणी जाहीर प्रवेश करून घेतला जात आहे. यासाठी वेगवेगळी आश्‍वासने व आमिषांचाही उपयोग करण्यात 
येत आहे. यातच उमेदवार चाचपणीसाठी वरिष्ठ नेत्यांकडून बैठका घेण्याचे सत्रही सुरू आहे. राज्यात जरी भाजपची सत्ता असली तरी सिंधुदुर्गात भाजपने अपेक्षित यश मिळवले नाही; मात्र नरेंद्र मोदींचा वाढलेला समर्थक वर्ग, नारायण राणेंचा अधांतरी असलेला भाजप प्रवेश, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत पूर्वीपेक्षाही मिळवलेले यशामुळे तालुक्‍यात भाजपकडे मतदाराच्या संख्येत वाढ होत असल्याचे बोलले जात आहे. 

पूर्वीपेक्षाही अपेक्षित यश भाजप मिळवेल असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकातही काँग्रेस, शिवसेनेसोबतच भाजपही कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ठाकणार असून, यातून बऱ्याच ठिकाणच्या लढती या तिरंगी होणार हे नक्कीच असेल. मात्र ग्रामपंचातीच्या निवडणुका असल्याने म्हणजेच मर्यादीत लोकसंख्येचा आखाडा असल्यामुळे बऱ्याच गावांत अपक्ष इच्छुक उमेदवारही बरेच असतील यात शंका नाही. एकूणच ग्रामीण भागात निवडणुकीची पूर्वतयारीसाठी सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना वेग आला आहे. काँग्रेसने पक्ष आपल्या हातातील ग्रामपंचायती आपल्याच ताब्यात ठेवण्याचा मोठा प्रयत्नात आहे तर शिवसेना आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. यात भाजप किती ग्रामपंचातीवर वेगळा करिष्मा करते याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. अपक्ष उमेदवार स्वतःची ओळख किती आहे हे सिद्ध करण्यासोबतच, मते खेचण्याचे व फोडण्याचे राजकारण करतील असे बोलण्यात येत आहे.

गावातील सर्वच गणपती पाहिले बुवा!
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वाधात चतुर्थी सण आला. यानिमित्ताने इच्छुक उमेदवारांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयातील व्यक्तींनी गणेश दर्शनानिमित्त गाठीभेटी घेण्यावर मोठा जोर दिला होता. कधी नाही ते यंदाच्या वर्षी गावातील प्रत्येक ग्रामस्थांच्या घरात गणेश मूर्तीचे दर्शन इच्छुक व त्याच्या कुटुंबीयांकडून होत होते. एरवी वेळ देता येत नसलेल्या उमेदवाराने ग्रामस्थांसाठी वेळात वेळ काढून श्री गणेश दर्शन केले. 

राणे फॅक्‍टर
जिल्ह्यात बहुसंख्य ग्रामपंचायतीवर सध्या काँग्रेसची सत्ता असली तरी त्यात राणे समर्थकांचा वाटा मोठा आहे. राणे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास राजकीय गणिते खूप वेगाने बदलण्याची शक्‍यता आहे. या राजकीय घडामोडींचा परिणाम गावागावांत दिसू शकतो.