सावंतवाडीत तिरंगी लढत

सावंतवाडीत तिरंगी लढत

सावंतवाडी -  तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने गावातील वातावरण तापले आहे. जो तो आपल्याच पॅनलचा उमेदवार निवडून येणार आहे, असा दावा करीत आहे; मात्र सद्यस्थिती लक्षात घेता तालुक्‍यात ८९ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. पाच ग्रामपंचायतीसह कलंबिस्त सरपंच बिनविरोध झाला आहे. तरिही आता तालुक्‍यात शिवसेना, भाजप आणि समर्थ विकास पॅनल अशी तिरंगी लढती होणार आहेत. काही मोजक्‍याच ठिकाणी काँग्रेस आपले उमेदवार आजमविण्याचा प्रयत्न करीत आहे.

दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुका प्रतिष्ठेच्या केलेल्या नाहीत. तर गावात मात्र पक्षाचे पदाधिकारी शिवसेनेच्या नावाने सामोरे जाणार आहे. दुसरीकडे समर्थ विकास पॅनलसह भाजपाने या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. या सर्वात मात्र समर्थ विकास पॅनलच्या माध्यमातून राणे समर्थक संजू परब यांनी पाच ग्रामपंचायती बिनविरोध ताब्यात घेवून तुर्तास तरी बाजी मारल्याचे चित्र आहे.

तालुक्‍यात निवडणुकीत तिन्ही पक्षाने जास्त ग्रामंपचायतीवर आपला दावा केला असून ५२ ग्रामपंचायतीपैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून यातील पाच ग्रामपंचायतीत समर्थ विकास पॅनेलने खाते खोलले आहे. तरीही उर्वरित ग्रामपंचायतीच्या निवडणुकित शिवसेना व भाजपने जोर लावल्याने कोणाच्या पारड्यात किती ग्रामपंचायत येणार हे निकालावरूनच स्पष्ठ होणार आहे. 

सर्वच पक्षाचे कार्यकर्ते उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रचारात वेगवेगळया क्‍लृप्त्या वापरतांना दिसत आहेत. आश्‍वासनाची खैरातही पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सरपंच पदाच्या रिंगणात असलेल्या उमेदवाराला ग्रामस्थांच्या मागण्यालाही सामोरे जावे लागत आहे. तालुक्‍यातील सद्यस्थिती लक्षात घेता गावातील वेगवेगळे विषय काढुन शितयुध्दे रंगविली जात आहे. भाजपने या वेळेस जास्तीत जास्त ग्रामपंचायतीत पॅनेल उभे केले आहे. त्यामुळे त्याचा फटका समर्थ विकास पॅनेनला बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

भाजप प्रदेश सरचिटणीस व तालुकाध्य महेश सारंग यांनी निवडणूकीच्या आधी गावागावात केलेली मोर्चेबांधणी त्यांना फायदेशीर ठरणार आहे. तर माजी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब यांची राणे समर्थकांवर असलेली पकड व गावागावात उत्तम प्रकारे असलेली राणे समर्थकांची फळी यावरून परब हे काय चमत्कार घडवून आणतील हे सांगता येणार नाही. या दोघामध्ये शिवसेना निवडणूकीच्या प्रक्रियेत शांत असली तरी पालकंमत्री केसरकर हे शेवटच्या क्षणी चित्र बदलण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

तिरोडा, नाणोस, गुळदूवे मध्ये शिवसेनेच्या पॅनेलचा जोर आहे. सातार्डा, साटेली तर्फे सातार्डा, किनळे याठिकाणी राणे समर्थक समर्थ पॅनेल बाजी मारू शकतात तेथे भाजपही जोर लावण्याची शक्‍यता आहे. न्हावेली, सोनुर्ली, वेत्ये गावात समर्थ पॅनेल व शिवसेना पुरस्कृत पॅनेल यांच्यात जोरदार लढत होणार आहे. निरवडेमध्ये समर्थ विकास पॅनेल बाजी मारणार आहे. तर सर्वाचे लक्ष लागून राहीलेल्या माजगाव ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. याठिकाणी काँग्रेस, शिवसेना व समर्थ विकास पॅनेलचे सरपंच पदाच्या उमेदवारांनी एकमेकांना आव्हान निर्माण केले आहे. याठिकाणी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असेच चित्र पाहायला मिळणार आहे. ओटवणेमध्ये काँग्रेस, समर्थ विकास पॅनेल व शिवसेनेने पॅनेल उभे केले आहे. याठिकाणी सध्यातरी काँग्रेसच्या पॅनेलचे पारडे जड दिसत आहेत.

तांबुळी, ओवळीये, पडवे-माजगाव, कोनशी, देवसू दाणोली मध्ये भाजप व शिवसेना पॅनेलचे पारडे जड आहे, तर कारिवडे, कुणकेरी, आंबेगावमध्ये शिवसेना व भाजपाच्या पॅनेलमध्ये जोरदार लढत होणार आहे. यात कुणकेरी ग्रामपंचायतमध्ये राणे समर्थक, समर्थ विकास पॅनेल बाजी मारू शकतो. सावरवाड, शिरशिंगे आदी ठिकाणी राणे समर्थकाचें पारडे जड आहे. त्यामुळे तिरंगी होणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकित कोणाचे पारडे जड राहणार यावरच सर्वाचे लक्ष लागून राहीले आहे.

तालुक्‍यात ५२ पैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर कंलबिस्त ग्रामंपचायत सरपंच बिनविरोध झाला आहे. उर्वरित ४६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी १३५ जण आपले नशिब अजमावणार आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचात सरपंच पदासाठी तिरंगी लढत होणार आहे. काही ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी पाच उमेदवार रिंगणात आहेत.

थेट सरपंच पदाच्या या ग्रामपंचायत निवडणूकीत ६३६ जण सदस्यपदासाठी निवडणूक लढविणार आहेत. बऱ्याच ठिकाणी बिनविरोध सदस्य निवडून आल्याने ही संख्या कमी असली तरी काही ठिकाणी एकाच जागेसाठी तिन तीन उमेदवार रिंगणात आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमुळे यावर्षी अर्ज बाद ठरण्याचे प्रकार जास्त घडल्याने बिनविरोध निवडणून आलेल्यांची संख्या जास्त आहे. महिलांना पन्नास टक्के आरक्षणानुसार तालुक्‍यातील ६३ ग्रामपंचायतीपैकी ३२ ग्रामपंचायतीत आता महिला सरपंच दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com