माईण गावचे सरपंचपद सहाव्यांदा बिनविरोध

माईण गावचे सरपंचपद सहाव्यांदा बिनविरोध

कणकवली - सिंधुदुर्गातील ३२५ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच निवडीत गावविकासात ऐतिहासिक पाऊल टाकणारे कणकवली तालुक्‍यातील माईण गावचे तुळशीदास दहिबांवकर हे तब्बल सहाव्यांदा बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आले आहेत. या गावाने गेल्या २५ वर्षांत विकासाकडे झेप घेतली आहे. याचे श्रेय गावातील सुजाण लोकांना जाते. गावविकासासाठी लोकांचा हा सहभाग म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरची ही परिवर्तनाची नांदी आहे. 

राज्यात दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी १६ ऑक्‍टोबरला मतदान होत आहे. जिल्ह्यात २३५ पैकी ४६ सरपंच आणि ९२६ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. सरपंचपदासाठी या खेपेस ८६७ आणि सदस्यपदासाठी ३५२५ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, खऱ्या अर्थाने थेट सरपंच निवडीत गावच्या सहमतीतून बिनविरोध ठरलेल्या उमेदवारांवर गावच्या लोकांनी विश्‍वास टाकला, असे म्हणता येईल. गाव विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजना लोकसहभागाशिवाय राबविणे अशक्‍य आहे. 

सिंधुदुर्गाचा विचार करता जिल्हा परिषदेने अनेक मोहिमेत देशात पहिला क्रमांक पटकावला. याचे श्रेय लोकसहभागातून पुढे आलेल्या ग्रामपंचायतींना आहे. तंटामुक्तीपासून हागणदारीमुक्ती आणि स्वच्छता मोहिमेपासून वृक्ष लागवडीपर्यंत विकास साधण्यासाठी जे लोक पुढाकार घेत आहेत त्याच गावचा विकास प्रगतिपथावर आहे. आता तर ग्रामपंचायतींना थेट निधीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान पोचत आहे. पुढील काळात बहुतांशी ग्रामपंचायती या डिजिटल बनणार आहेत. यासाठी सक्षम सरपंच म्हणून निवड करताना अनेक उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात खऱ्या अर्थाने आदर्श म्हणून माईणच्या तुळशीदास दहिबांवकर यांच्याकडे सोपविलेला गावचा कारभार आणि लोकांनी ठेवलेला विश्‍वास आहे. 

कणकवली तालुक्‍याच्या एका टोकाला निसर्गाच्या सान्निध्यात लालमातीचे वरदान लाभलेला माईण हा गाव संपर्कापासून फार दूरवर होता; परंतु दहिबांवकर यांनी १९९२ ला गावासाठी बारमाही रस्ता करून घेतला. त्यामुळे गावात दळणवळणाची सुविधा होऊन चिरेखाण व्यवसायाला चांगले दिवस आले. हा व्यवसाय गावातील तरुणांना रोजगार मिळवून देऊ लागला. त्यानंतर गाव खऱ्याअर्थाने विकासाकडे झेपावू लागला. या गावात पाणीटंचाईचा प्रश्‍न गंभीर होता; परंतु दहिबांवकर यांनी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करून गावातील प्रत्येक वाडीत स्वतंत्र लघुनळ योजना आणून प्रत्येक घराला आणि कुटुंबांना नळाने पाणीपुरवठा सुरू केला. 

दहिबांवकर यांच्या गेल्या २५ वर्षांच्या सरपंचपदाच्या कारकीर्दीत महात्मा गांधी गाव तंटामुक्त, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता, स्वच्छ भारत अभियान आणि निर्मल ग्राम समृद्ध योजनेचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळेच लोकसहभागातून विकासाला गवसणी घालणाऱ्या या गावाने राजकारणविरहित ग्रामपंचायत ठेवून सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com