‘स्वाभिमान’ला ‘समर्थ’ साथ

‘स्वाभिमान’ला ‘समर्थ’ साथ

सिंधुदुर्गनगरी -  नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व राखले. त्यांनी २३८ ग्रामपंचायतींवर दावा केला असला तरी जवळपास १५३ ठिकाणी त्यांचे सरपंच बसले आहेत. त्यापाठोपाठ शिवसेनेने जागा मिळविल्या. भाजपनेही चांगली मुसंडी मारली. काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. मनसे आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक जागा मिळवून अस्तित्व दाखवून दिले.

जिल्ह्यात ३२५ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यातील २९ ठिकाणी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. ४६ सरपंच आणि ९२६ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. आज निकालादिवशी अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के बसले. राणेंच्या स्वाभिमान पक्षाने अपेक्षेप्रमाणे वर्चस्व मिळविले. शिवसेना आणि भाजपनेही बऱ्यापैकी ताकद दाखविली. अनेक ठिकाणी पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक मुद्दे प्रभावशाली ठरले; मात्र राजकीय नेत्यांनी निकालानंतर त्याला पक्षीय लेबल लावले.

उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात समर्थ विकासला १५३, शिवसेनेला ७८, भाजपला ४०, युतीला २, गावपॅनेलकडे ४२, अपक्ष ३, तर राष्ट्रवादी व मनसेकडे प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचे नेतृत्व आले. कुडाळ तालुक्‍यातील सरंबळ ग्रामपंचायतीचा निकाल उशिरापर्यंत उपलब्ध न झाल्याने ३२४ ठिकाणचे हे चित्र पुढे आले. असे असले तरी सर्वच पक्षांनी यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर दावे केले आहेत. समर्थ विकासला कणकवली, मालवण आणि सावंतवाडीत चांगले यश मिळाले. कुडाळ आणि देवगडमध्येही त्यांनी ताकद दाखविली. शिवसेनेसाठी दोडामार्गमध्ये चांगले चित्र असून मालवणातही त्यांची ताकद दिसली. सावंतवाडीत भाजपने जोरदार मुसंडी मारली.

सावंतवाडी तालुक्‍याचा विचार करता समर्थ विकासने २४ ग्रामपंचायतींसह आघाडी घेतली. येथे भाजपने १३ ठिकाणी सत्ता मिळवत दुसरा क्रमांक मिळविला. त्यांनी मात्र १६ ठिकाणांवर दावा केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्‍मा सावंत आणि शिवसेनेचे नेते विक्रांत सावंत यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माजगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेने बाजी मारली. बांद्यात भाजपला सरपंचपद मिळाले असले तरी त्यांच्या बालेकिल्ल्यात नागरी विकास आघाडीच्या पॅनेलने वर्चस्व राखले.

दोडामार्गमध्ये शिवसेनेने मोठे यश मिळविले. तब्बल १३ ग्रामपंचायती त्यांनी राखल्या असून समर्थ विकासकडे ३ ग्रामपंचायती येण्याची शक्‍यता आहे. तेथे भाजपला ४ तर गाव पॅनेलला ८ ग्रामपंचायती मिळाल्याचे चित्र होते.

बऱ्याच ठिकाणी कुडाळमध्ये प्रतिष्ठितांना धक्के मिळाले. अगदी शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनाही मतदारांनी धक्कातंत्राचा अनुभव करून दिला. येथे ढोबळ चित्रानुसार समर्थकडे १३, शिवसेनेकडे १८, भाजपकडे १, युतीकडे २ तर गाव पॅनेलकडे १८ जागा असून अपक्षांनी एका ठिकाणी वर्चस्व राखले. 

वेंगुर्लेत २३ ग्रामपंचायतीमध्ये ९ ग्रामपंचायतीवर समर्थ विकास पॅनल, ५ ग्रामपंचायतीवर भाजप, व  ४ ग्रामपंचायतीवर शिवसेना तर उर्वरित ४ ग्रामपंचायतीवर गाव पॅनेलने वर्चस्व मिळवले आहे. वजराठ ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये सदस्य पदासाठी शारदा राणे व प्राजक्ता नळेकर यांना समसमान १६० एवढी मते पडल्याने तिथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिट्ठी टाकून काढलेल्या निकालामध्ये शारदा राणे या निवडून आल्या. तुळस प्रभाग १ तसेच प्रभाग ४ मध्ये सदस्यांच्या मागणीवरून फेरमोजणी घेण्यात आली; मात्र काही मतांचा फरक सोडल्यास पूर्वी दिलेला निकाल कायम ठेवण्यात आला.

मालवण तालुक्‍यातील ४९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज झालेल्या मतमोजणीच्या निकालावरून शिवसेनेने जोरदार मुसंडी मारताना २२ ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले. समर्थ विकास पॅनेलला ३० ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळाले तर भाजपला केवळ दोनच ग्रामपंचायतीत कमळ फुलविण्यात यश आल्याचे दिसून आले. प्रतिष्ठेच्या बनलेल्या काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अनेकांचा पराभवाचा धक्का बसला. काही उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारताना प्रस्थापितांना धक्का दिला.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मतमोजणी केंद्रानजीक तसेच गावागावात शिवसेना, समर्थ विकास पॅनेलच्या उमेदवारांनी जल्लोष केला.
राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवली तालुक्‍यात अपेक्षेप्रमाणे प्रमाणे समर्थ विकास पॅनेलने वर्चस्व राखले आहे. तालुक्‍यातील ५८ पैकी राणेंच्या गटाला आणि समर्थ विकास पॅनेलमधून लढलेले ४६ सरपंच निवडून आले आहेत. याखेरीज भाजप आणि गाव विकास आघाडीचे प्रत्येकी ४ तर शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी दोन ठिकाणी सरपंच निवडून आले. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने प्रथमच मुसंडी मारली आहे.

वैभववाडी तालुक्‍यात १७ पैकी १४ ग्रामपंचायतीमध्ये समर्थ पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. तर गाव विकास पॅनेलसह शिवसेना आणि भाजपची धूळधाण झाली आहे. तालुक्‍यात शिवसेनेला भोपळा देखील फोडता आला नाही. भाजपला दोन ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखता आले आहे. ग्रामविकास आघाडीने एक ग्रामपंचायत जिंकली. तालुक्‍यातील सतरा ग्रामपंचायतीपैकी उंबर्डे आणि निमअरूळे या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली होती. हे दोन्ही सरपंच समर्थ विकास पॅनेलचे आहेत.

देवगड तालुक्‍यातील ग्रामपंचायतींचे पक्षीय बलाबलाचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सर्वाधिक ग्रामपंचायती समर्थ विकास पॅनेलकडे गेल्या आहेत. त्या पाठोपाठ गाव विकास पॅनेल, त्यानंतर भाजप आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवारांनी ग्रामपंचायतींवर यश मिळविले आहे. तालुक्‍यात गाव विकास पॅनेलच्या माध्यमातून निवडून आलेल्या सर्वच सरपंच आणि सदस्यांवर समर्थ पॅनेलसह भाजप आणि शिवसेनेने दावा सांगितला आहे.
 
सिंधुदुर्गात भाजपची घोडदौड वेगाने सुरू झाली आहे. तसा कौल जिल्ह्यातील ग्रामीण मतदारांनी दिला आहे. जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतींवर भाजप पुरस्कृत सरपंच निवडून आले आहेत. निकालाचे अंतिम चित्र आल्यावर त्यात आणखी वाढ होईल. तसेच भाजपचे १ हजारहून अधिक ग्रामपंचायत सदस्य देखील निवडून आले आहेत.
- प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष भाजप

ग्रामपंचायत निवडणुकीत समर्थ पॅनेलची सर्व पक्षांनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. परंतु मतदारांनी समर्थ पॅनेलच्या बाजूने कौल दिला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक २३५ ग्रामपंचायतींवर आमचे उमेदवार निवडून आले आहेत. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला पन्नास सरपंच देखील निवडून आणता आलेले नाहीत.
- नीतेश राणे,
आमदार

सिंधुदुर्गात शिवसेनेचे स्वबळावर १२० सरपंच निवडून आले आहेत. याखेरीज २० गाव विकास पॅनेलच्या सरपंचांनी आपण शिवसेनेसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. ग्रामपंचायतींच्या या निकालाने शिवसेनेचे आगेकूच कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे प्रश्‍न फक्त शिवसेनाच सोडवू शकते, असाही कौल या निकालातून मतदारांनी दिला आहे.
- वैभव नाईक,
जिल्हाप्रमुख, शिवसेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com