अर्धा कोटीचे सोने घेऊन पळून जाणाऱ्यास पकडले

अर्धा कोटीचे सोने घेऊन पळून जाणाऱ्यास पकडले

कुडाळ - मार्केटमध्ये देण्यासाठीचे सुमारे ५३ लाख ४८ हजार रुपये किमतीचे १ हजार ८०० ग्रॅम सोने घेऊन गोव्यातून पळालेल्या चोरट्याला येथे शिताफीने पकडण्यात यश आले. श्रावण दान नाथ (वय २८ रा. भालनी राजस्थान) असे त्याचे नाव आहे. येथील नागरिक, रिक्षाचालक व सोनेमालकाच्या मित्रांनी येथील बस स्थानकात त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार काल (ता.२८) रात्री उशिरा घडला. त्याच्याकडे सोन्याची बिस्किटे, लॉकेट, चेन अशा वस्तू सापडल्या. 

मडगाव-गोवा येथील संजय विरनोडकर यांनी मडगाव मार्केटमधील सोने ऑर्डर श्रावण दान नाथ याला द्यायला सांगितली होती. त्यासाठी त्याच्याकडे ५३ लाख ४८ हजार रुपयांचे १ हजार ८०० ग्रॅम सोने दिले. नाथने संबंधित ग्राहकाला सोने पोच न करता तो बेपत्ता झाला.

याबाबत मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. यानंतर मडगाव पोलिस व सोनेमालक त्याच्या मागावर होते. नाथ काल (ता. २७) राजस्थानला जायला निघाला. तो पणजी-पुणे शिवशाही बसमधून प्रवास करत असल्याची माहिती सोनेमालकाला मिळाली. यानुसार सोनेमालकाने सावंतवाडीतील एका मित्राला याबाबत माहिती दिली आणि संबंधित बसमध्ये तपासणी करण्यास सांगितले. तोपर्यंत बस सावंतवाडीतून कुडाळच्या दिशेने रवाना झाली होती.

सोने मालकाने मित्राच्या मोबाईलवरील व्हॉटस्‌ ॲपवर त्यांचा फोटोही पाठवला होता. यानंतर त्याच्या मित्राने आपल्या कुडाळमधील काही मित्रांना याबाबत माहिती व फोटो दिला. संबंधित बसची तपासणी करण्यास सांगितले. येथील बस स्थानकात थांबलेल्या शिवशाही बसची तपासणी केली असता नाथ सापडला. त्याला त्वरित खाली उतरवत झडती घेण्यात आली; तेव्हा त्याच्याजवळ सोने आढळले.

नाथने बस स्थानकातच हिसका देत पळण्याचा प्रयत्न केला; मात्र नागरिक, रिक्षाचालकांनी त्याला पकडले. तत्काळ पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत त्याने प्रथम त्याने पुणे येथील एका पार्टीला सोने देण्यासाठी जात असल्याचे सांगितले; मात्र पोलिसांनी खाक्‍या दाखवताच त्याने सर्व प्रकार कबुल केला आणि सोने पोलिसांच्या ताब्यात दिले. या वेळी प्रभारी पोलिस निरीक्षक सुधीर शिंदे, हवालदार पी. जी. मोरे, एन. पी. नारनवर, सायमन डिसोजा आदी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. नाथला सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला इतर ठिकाणी हलविण्याची कार्यवाही सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com