मालवणला पावसाचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

मालवण - जिल्ह्यात आज मॉन्सून सक्रिय झाला. याचा सर्वाधिक तडाखा मालवण तालुक्‍याला बसला. पावसाच्या कहराने तालुक्‍यात सर्वत्र दाणादाण उडवली. शहरातील अनेक भाग पाण्याखाली होते. काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याची घटना घडली.

मालवण - जिल्ह्यात आज मॉन्सून सक्रिय झाला. याचा सर्वाधिक तडाखा मालवण तालुक्‍याला बसला. पावसाच्या कहराने तालुक्‍यात सर्वत्र दाणादाण उडवली. शहरातील अनेक भाग पाण्याखाली होते. काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याची घटना घडली.

आडवण भागातील घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने नागरिकांना रात्रभर जागता पहारा ठेवावा लागला. झाडे, विद्युत खांब कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक ४९१ मिलिमीटर पावसाची नोंद येथे झाली.

जिल्ह्यात मॉन्सूनचे धडाक्‍यात आगमन झाले खरे मात्र पहिल्या दिवसापासून सुरू झालेल्या पावसाचा धडाका आजच्या दुसऱ्या दिवशीही कायम आहे. दिवस-रात्र कोसळलेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. शहरातील सखल भागात झपाट्याने पाण्याची पातळी वाढली. पहाटेवेळी आडवण भागात पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली. 

पुराचे पाण्याने तेथील घरांना वेढा घातला. यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने काळोख्या रात्रीत नागरिकांना जागता पहारा द्यावा लागला. देऊळवाडा पुलानजीकच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करावी लागली. या भागातील काही नागरिकांच्या घरातही पावसाचे पाणी घुसले. दरवर्षी तेथे पाणी साचत असल्याने यावर प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी स्थानिकांनी मागणी केली. 

सागरी महामार्गानजीक एका खासगी मालमत्तेच्या ठिकाणी जाण्यासाठी अनधिकृतपणे नवीन मार्ग बनविला आहे. यामुळे येथील प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन परिसरातील घरांना धोका निर्माण झाला आहे. याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही कार्यवाही न झाल्याने स्थानिक रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काल रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे त्याठिकाणी पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावर अडथळे निर्माण होऊन रेवतळे भागातील घरांमध्ये पाणी घुसले. याची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका शीला गिरकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, दीपक पाटकर, आप्पा लुडबे यांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या मदतीने अडथळा दूर केला.

तालुक्‍यातील खैदा येथील रस्त्यावर डोंगरातील दगड कोसळल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. शहरातील धुरीवाडा, तसेच अन्य भागात माडाची झाडे विद्युत खांबावर कोसळल्याने या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. नगरसेवक यतीन खोत यांनी पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही झाडे हटविण्याची कार्यवाही केली. विद्युत खांब तसेच तारा तुटल्याने महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दृष्टिक्षेपात पाऊस

  • जिल्ह्यात सर्वाधिक मालवणमध्ये ४९१ मिलिमीटर पावसाची नोंद
  • आडवण भागातील घरांना पुराच्या पाण्याने वेढा
  • नागरिकांना रात्रभर जागता पहारा
  • विद्युत खांब कोसळून महावितरणचे मोठे नुकसान
  • खैदा येथील रस्त्यावर दरड कोसळली
  • जनजीवन विस्कळीत
  • देवबागमध्ये वीजपुरवठा खंडित
Web Title: Sindhudurg News Heavy Rains in Malvan