माणगाव खोऱ्यात ‘ढगफुटी’

माणगाव खोऱ्यात ‘ढगफुटी’

माणगाव - खोऱ्यात रविवारी (ता. १५) रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने शिवापूर ते आंबेरीपर्यंत पूरपरिस्थिती ओढवली होती. यामुळे अनेक ठिकाणी घरात-दुकानातच पाणी घुसून व शेती वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमुळे पंचनाम्यासाठी तलाठी मिळाले नाहीत, तर लोकप्रतिनिधींनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

माणगाव खोऱ्यात काल रात्री झालेल्या ढगफुटीसारख्या पावसाने शिवापूर ते आंबेरी हे सुमारे २२ ते २३ किलोमीटर नदीकाठचे क्षेत्र पूर्ण पाण्याखाली गेले होते. स्थानिकांच्या मदतीने पूरपरिस्थितीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यात यश आले. या पूरसदृश परिस्थितीमुळे उपवडे गावाकडे जाणारा संपर्क तुटला असून, या नदीवरील पुलाचे काँक्रिट उखडून गेल्याने एस. टी. बससेवा ठप्प झाली आहे. महादेवाचे केरवडे येथील शंकर केसरकर यांच्या घरात सुमारे दहा फूट पाणी साचल्याने घरातील वस्तू खराब झाल्या. त्यांच्या पोल्ट्रीतील ५० कोंबड्या मृत झाल्या. परमानंद हेवाळेकर यांच्या घरात व गिरणीत पाणी साचल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पुळास वरचीवाडी येथील साकव वाहून गेल्याने येथील लोकांची दळणवळण व्यवस्था कोलमडली आहे. केरवडे तुळशीगाळू येथील दत्ताराम परब यांचे कापून वाळत घातलेले भात पावसाच्या पुराने वाहून गेले; तर हनुमंत निकम यांच्या घरात व दुकानात पाणी घुसल्याने त्यांच्या घरातील चीजवस्तू नष्ट झाल्या. मोरे स्वप्ननगरी येथील पुलावर सुमारे दहा फूट पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. कुडाळ येथील रिक्षा पुलावरून नेत असताना स्थानिकांच्या प्रसंगावधानाने बालंबाल बचावली. रिक्षा वाहत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी रिक्षा ढलकून पाण्याबाहेर काढली. गोठोस डिगेवाडी येथील गुरुनाथ डिगे यांच्या दुकानात व गिरणीत पाणी गेल्याने दुकानातील वस्तू व इतर सामान भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले. निळेली येथील अमित देसाई यांच्या घरात पाणी गेल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुळास बिब्याचीवाडी येथील भातशेती व काजूकलमेही या पुरामुळे वाहून गेली.

लोकप्रतिनिधी निवडणुकीत व्यस्त
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी तलाठी निवडणूक प्रक्रियेत अडकल्याने पोचू शकले नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार, खासदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य घरघर फिरत असताना शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. काही लोकांना घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ धावले. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आमदार, खासदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य दिसतात, त्यांना नुकसानग्रस्त शेतकरी मात्र दिसले नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

१९७१ नंतर पूरपरिस्थिती ओढवली
माणगाव खोऱ्यात १९७१ मध्ये पूरपरिस्थिती ओढवली. मात्र त्यापेक्षाही भयंकर अशी पूरस्थिती ओढवल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात. या पूरस्थितीबाबत पाटगाव येथील धरणाचे पाणी सोडल्याने माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज काही शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com