आंगणेवाडीत सापडले स्त्रीजातीचे अर्भक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

मालवण - आंगणेवाडी येथे श्री भराडी देवी मंदिरानजीक असणाऱ्या अंगणवाडीत रविवारी सायंकाळी महिन्याच्या स्त्री जातीचे नवजात अर्भक ग्रामस्थांना सापडले. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली.

मालवण - आंगणेवाडी येथे श्री भराडी देवी मंदिरानजीक असणाऱ्या अंगणवाडीत रविवारी सायंकाळी महिन्याच्या स्त्री जातीचे नवजात अर्भक ग्रामस्थांना सापडले. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती पोलिसपाटलाने पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी त्या अर्भकाला ताब्यात घेत येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले. या अर्भकाला एका मोटारीतून आलेल्या काही व्यक्तींनी अंगणवाडीत सोडून पळ काढल्याची चर्चा गावात सुरू आहे. 

सायंकाळी आंगणेवाडीतील स्थानिक ग्रामस्थ दिनेश आंगणे व सत्यविजय आंगणे हे दोघे भराडी देवी मंदिराच्या शेजारील अंगणवाडीच्या परिसरातून जात असताना त्यांना अंगणवाडीमधून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे या दोघांनीही अंगणवाडीकडे धाव घेतली. या वेळी त्यांना अंगणवाडीच्या व्हरांड्यात स्त्री जातीचे अर्भक रडत असल्याचे दिसून आले. याची माहिती दिनेश यांनी आजूबाजूच्या ग्रामस्थांना दिली.

ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता हे अर्भक अनोळखी असल्याचे दिसून आले. त्यांनी या प्रकाराची माहिती पोलिस पाटील विकास सावंत यांना दिली. त्यांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक रेश्‍मा मोमीन यांनी अन्य पोलिस कर्मचाऱ्यांसह आंगणेवाडी येथे दाखल झाले. त्यांनी अर्भकाची पाहणी करत तिला ताब्यात घेत सायंकाळी उशिरा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले. 

या अर्भकाला अंगणवाडीत कोण सोडून गेले याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली नसली तरी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कणकवली मार्गाहून आंगणेवाडी येथे एक मोटार अंगणवाडी परिसरात फिरताना ग्रामस्थांनी पाहिली. याच मोटारीतील व्यक्तींनी त्या अर्भकाला अंगणवाडीत सोडून पलायन केले अशीही चर्चा सुरू आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Sindhudurg News Infant found in Anganewadi