आंबोली घाटाला चर खोदाईने धोका?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

सावंतवाडी - कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबोली घाटात दरीच्या बाजूने कठड्याजवळ खोल खोदाई करून मोबाईल केबल घातली जात आहे. त्यासाठी दरीच्या बाजूने सुमारे अडीच फूट सलग चर खणण्यात आले आहेत. यामुळे संरक्षक कठडे खिळखिळे होण्याची आणि पर्यायाने घाटरस्त्याला धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

सावंतवाडी - कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबोली घाटात दरीच्या बाजूने कठड्याजवळ खोल खोदाई करून मोबाईल केबल घातली जात आहे. त्यासाठी दरीच्या बाजूने सुमारे अडीच फूट सलग चर खणण्यात आले आहेत. यामुळे संरक्षक कठडे खिळखिळे होण्याची आणि पर्यायाने घाटरस्त्याला धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

हा प्रकार सावंतवाडी बार असोसिएशनचे अध्यक्ष परिमल नाईक यांनी आज उघड केला. चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले काम प्रशासनाने तत्काळ थांबवावे अन्यथा या प्रकाराच्या विरोधात न्यायालयात जाऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. आंबोली घाटातून एका मोबाईल कंपनीचे केबल घालण्याचे काम सुरू आहे. याबाबत संबंधित कंपनीच्या ठेकेदार कंपनीकडून चुकीच्या पद्धतीने उत्खनन सुरू आहे. 

सद्यस्थिती लक्षात घेता आंबोली घाटातील दरडीच्या ठिकाणी हे काम सुरू आहे. दरडीच्या पलीकडील बाजूने खोल दरीच्या ठिकाणी असलेल्या संरक्षक कठड्याच्या बाजूला सुमारे अडीच फूट खोल खड्डा खणून त्या ठिकाणी केबल घालण्यात येत असल्याची माहिती श्री. नाईक यांना मिळाली होती. याबाबत त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली. ते काम चुकीचे वाटल्याने त्यांनी कामाची देखरेख करणाऱ्या सुपरवायझरशी चर्चा केली. मात्र, प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, तसेच आपल्याला कोणत्या कंपनीने हे काम घेतले आहे, हे माहीत नसल्याचे सांगितले. 

दरम्यान, या प्रकाराबाबत नाईक यांनी ‘सकाळ’ला माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे काम सुरू आहे. एका बाजूने उंच असलेल्या दरडी धोकादायक बनून पडण्याचे सत्र सुरू असताना दुसऱ्या बाजूने संरक्षक कठड्याला लागून असलेले खोदकाम भविष्यात धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे हे काम तत्काळ बंद होणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. सद्यस्थिती लक्षात घेता ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून १०० हून अधिक कामगार लावून हे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने झालेले खोदकाम रोखण्यात न आल्यास भविष्यात अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. याबाबत प्रसंगी आम्ही न्यायालयात जाऊ.’’

याबाबत दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांच्या दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी तो स्वीकारला नाही. 

‘चुकीचे काम होत असेल तर चौकशी’ 
याबाबत प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘आपल्याकडेही काही नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार या प्रकाराची चौकशी सुरू आहे. संरक्षण कठड्याला लागून खोदकाम केले जात असेल तर ते चुकीचे आहे. तसा प्रकार असल्यास ते खोदकाम थांबविण्यात येणार आहे.’’ 
तहसीलदार सतीश कदम म्हणाले, ‘‘झालेला प्रकार धोक्‍याची घंटी देणारा आहे. आता तर ८० टक्के काम झाले आहे. याआधी योग्य ती भूमिका घेणे गरजेचे होते.’’

धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण..?
या प्रकाराबाबत पंचायत समितीचे सभापती रवी मडगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘‘चुकीच्या पद्धतीने खोदकाम सुरू आहे. ती कंपनी फक्त चर मातीने बुजवून निघून जाणार आहे. पावसाळ्यात आंबोलीत हजारो पर्यटक भेट देतात. अशा परिस्थितीत एखादा अपघात घडल्यास जबाबदार कोण, हा प्रश्‍न निर्माण होईल. त्यामुळे बांधकाम विभागाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.’’

Web Title: Sindhudurg News issue of digging in Amboli Ghat