ढिसाळ रुग्णवाहिका यंत्रणेमुळे बांदा येथे एकाचा बळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

बांदा - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेवर डॉक्‍टर उपलब्ध नसल्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने एकाला प्राण गमवावा लागला. विश्‍वनाथ सदाशिव धुरी (वय ५८, शेर्ले कापईवाडी) असे त्याचे नाव आहे.

बांदा - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेवर डॉक्‍टर उपलब्ध नसल्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने एकाला प्राण गमवावा लागला. विश्‍वनाथ सदाशिव धुरी (वय ५८, शेर्ले कापईवाडी) असे त्याचे नाव आहे.

रुग्णवाहिका प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा गेल्या आठ दिवसांमधील हा तिसरा मृत्यू आहे. यावरून आज नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला होता. उपसरपंच अक्रम खान यांनी आक्रमक भूमिका घेत डॉक्‍टर उपलब्ध नसतील तर रुग्णवाहिका आरोग्य केंद्राच्या आवारात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.

शेर्ले-कापईवाडी येथील विश्‍वनाथ धुरी हे रंगकाम व्यवसाय करायचे. परिसरात ते ‘धुरी पेंटर’ या नावाने परिचित होते. आज सकाळी सायकलने ते बांदा-गडगेवाडी येथे कामानिमित्त आले होते. छातीत जळजळ होत असल्याने स्थानिकांनी त्यांना तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणाली कासार यांनी त्यांच्यावर तत्काळ उपचार केले; मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने अधिक उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका मागविण्यात आली. आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध होती; मात्र डॉक्‍टर उपलब्ध नसल्याने ती नेता येत नव्हती. अखेर सावंतवाडीतून रुग्णवाहिका येईपर्यंत धुरी यांचा मृत्यू झाला.

रुग्णवाहिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे धुरी यांचा बळी गेल्याने बांद्यात तणाव उसळला. ग्रामस्थ आरोग्य केंद्र परिसरात येऊ लागले. रुग्णवाहिकेवरील चालकाने आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका घेऊन पलायन केले. चालकाने पळ काढल्याने ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले. उपसरपंच खान यांनी १०८ रुग्णवाहिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून खडसावले. बांदा हे महामार्गावरील महत्त्वाचे आरोग्य केंद्र असून याठिकाणी गंभीर रुग्णांची संख्या वाढतीच आहे. त्यामुळे याठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिका व त्यावर डॉक्‍टरची २४ तास नेमणूक असणे आवश्‍यक असल्याचे सांगितले.

रुग्णवाहिकेवर तत्काळ डॉक्‍टरची नेमणूक न केल्यास रुग्णवाहिकेला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात प्रवेश बंदी करण्याचा इशारा दिला. याला पूर्णपणे आपण जबाबदार रहाल, असेही सुनावले.

विश्‍वनाथ धुरी यांच्यावर शेर्ले येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. शेर्ले माजी ग्रामपंचायत सदस्या विजयश्री धुरी यांचे ते पती होत.

डॉक्‍टरचा राजीनामा
याबाबत रुग्णवाहिकेचे जिल्हा व्यवस्थापक शॅमियल घाटगे यांनी सांगितले की, बांदा येथील १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्‍टर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे. लवकरात लवकर हे रिक्त पद भरण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

Web Title: Sindhudurg News issue of doctor absence in Ambulance system