जोरदार खडाजंगीत कणकवली नगरपंचायतीत निरोपाची सभा 

 कणकवली - नगरपंचायतीच्या निरोपाच्या सभेत नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांना बंडू हर्णे, समीर नलावडे आदींनी शुभेच्छा दिल्या. 
कणकवली - नगरपंचायतीच्या निरोपाच्या सभेत नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांना बंडू हर्णे, समीर नलावडे आदींनी शुभेच्छा दिल्या. 

कणकवली - शहरातील सांडपाणी मुद्यावर नगरपंचायत सभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांत जोरदार खडाजंगी झाली. विकासकामांच्या श्रेयाच्या मुद्दयावरही आरोप-प्रत्यारोप झाले. विद्यमान कार्यकारीणीची ही शेवटची सभा असल्याने एकमेकांची माफी मागत राजकीय कटुता संपुष्टात आणण्याचे आवाहन पदाधिकारी आणि नगरसेवकांनी केले. या सभेत निरोप घेताना नगराध्यक्षांनाही अश्रू अनावर झाले होते. 

येथील नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह समीर नलावडे, बंडू हर्णे, किशोर राणे, अभिजित मुसळे, रूपेश नार्वेकर, सुशांत नाईक, गौतम खुडकर, राजश्री धुमाळे, मेघा गांगण, सुविधा साटम, नंदिनी धुमाळे, सुमेधा अंधारी आदी नगरसेवक तसेच नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

सभेत परबवाडी येथील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटाराच्या बांधकामाचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला. पोयेकरवाडी ते कामत सृष्टीपर्यंत गटाराच्या कामाचा पुन्हा कंटूर सर्व्हे करावा आणि सांडपाणी वाहून जाईल याच धर्तीवर गटाराचे बांधकाम केले जावे या मुद्दयावर सर्व सहमती झाली. तत्पूर्वी या प्रश्‍नावर सुमारे एक तास जोरदार खडाजंगी झाली. बंडू हर्णे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक हे सांडपाणी प्रश्‍नावर राजकारण करीत असल्याचा आरोप केला. तर गेली अडीच वर्षे सत्तेत असताना सांडपाणी गटार प्रश्‍नाकडे नाईक यांनी अजिबात लक्ष दिले नसल्याची टिका अभिजित मुसळे यांनी केली. 

यावर नाईक यांनी नलावडे, मुसळे यांना प्रतिप्रश्‍न केला. यानंतर नाईक आणि नलावडे, मुसळे, बंडू हर्णे यांच्यात प्रचंड खडाजंगी झाली. यात अभिजित मुसळे यांनी स्वतः सभापती असताना केलेल्या विकासकामांची यादीच वाचून दाखवली. त्याला रूपेश नार्वेकर यांनी हरकत घेतली. दुसऱ्यांच्या विकासकामांचे श्रेय तुम्ही का घेता असे सांगताना खोटे बोला पण रेटून बोला अशी कोपरखळी मारली. त्यामुळे सांडपाणी प्रश्‍न बाजूला राहिला आणि श्रेयाच्या मुद्दयावर वादंग सुरू झाला. 

अभिजित मुसळे यांनी आपण सभापती असताना उद्यान अद्ययावत केल्याचे सांगितले. यानंतर समीर नलावडे, बंडू हर्णे यांनीही पहिल्या अडीच वर्षात केलेल्या कामांचा घोषवारा सादर केला. सत्ताधारी आणि विरोधकांत वादंग सुरू झाला. यात कुणीच मागे हटत नव्हते अखेर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी नार्वेकर आणि नाईक यांना शांत केले. तर विरोधी पक्षनेत्या राजश्री धुमाळे यांनी नलावडे, मुसळे, हर्णे यांना शांत राहण्याचे आवाहन केले. 

शहरातील विविध विकासकामांची उद्‌घाटने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते होणार आहेत. या कामांना स्थानिक आमदारांना का डावलता अशा मुद्दा समीर नलावडे यांनी मांडला. तसेच या कार्यक्रमाला आमदारांना निमंत्रण नसल्यास सर्व कामांची आम्ही आधीच उद्‌घाटने करू अशी तंबी नलावडे यांनी दिली. यावेळी उपनगराध्यक्ष पारकर यांनी या कामांना सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले जाणार असल्याची ग्वाही दिली. 
नगरपंचायत हद्दीमधील रस्ते नगरपंचायतीच्या ताब्यात घेण्याच्या ठरावाला बंडू हर्णे, समीर नलावडे, अभिजित मुसळे यांनी त्याला विरोध केला.

नगरपंचायतीने हे रस्ते ताब्यात घेऊ नयेत. अखेर सर्व सदस्यांच्या चर्चेनंतर शहरातील रस्ते नगरपंचायतीने ताब्यात न घेण्याचे ठरविण्यात आले; मात्र निधी उपलब्ध झाल्यास बांधकामची परवानगी घेऊन बांधकामच्या ताब्यातील रस्ते दुरुस्ती करण्यासही सभेत मान्यता दिली. 

शहरातील बौद्धवाडी सिद्धार्थनगरमधील रस्त्या प्रश्‍न गेली अनेक वर्षे अनुत्तरीत आहे. सुशांत नाईक यांनी या रस्ता प्रश्‍नी भालचंद्र आश्रम संस्थान आणि बौद्धवाडीतील ग्रामस्थ यांच्यात समन्वयाने चर्चा करण्याची सूचना केली. 

नगरपंचायत सभेत सुमारे दोन तास सत्ताधारी आणि विरोधनगरसेवकांत विविध मुद्दयांवर वादंग झाला. सभा संपताना मात्र सर्वच सदस्यांनी एकमेकांची माफी मागत राजकीय कटुता संपुष्टात आणण्याचे आवाहन केले. यानंतर समीर नलावडे, बंडू हर्णे, अभिजित मुसळे, राजश्री धुमाळे, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी निरोपाचे मनोगत मांडले. तर नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांना अश्रू अनावर झाले होते. 

समन्वयातून कामे झाली असती... 
नगरपंचायतीमध्ये बहुमताची सत्ता होती; परंतु सत्ताधाऱ्यांमधेच दोन गट पडले. या गटातील वादंगामुळे शहरातील अनेक प्रश्‍न प्रलंबित राहिले. तरीही समन्वयाने काम झाले असते तर शहरात अनेक विकास कामे मार्गी लागली असती. शहरात वाहतूक कोंडी, भाजी मार्केट, मच्छी मार्केट प्रश्‍न तसाच आहे. मोकाट जनावरे, भटकी कुत्री यांचा उपद्रव कायम आहे. पार्किंग प्रश्‍न सुटलेला नाही. कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू झाला नाही. अनेक पायवाटांचेही प्रश्‍न प्रलंबित राहिले असल्याचे यावेळी विरोधी पक्षनेत्या राजश्री धुमाळे यांनी सांगितले. 

पहिली अडीच वर्षे बांधकाम सभापती म्हणून काम करताना शहरातील अनेक प्रश्‍न मार्गी लावता आले याचे समाधान आहे. प्रभागात अद्ययावत उद्यान, स्ट्रीट लाइट, ओपन जीम, टेंबवाडी पायवाटेचा प्रश्‍न सोडवता आला. स्वाभिमानचे शहराध्यक्ष समीर नलावडे यांचेही विकास कामात महत्वाचे सहकार्य आणि योगदान लाभले.
- अभिजित मुसळे,
नगरसेवक 

सलग 10 वर्षे कणकवली नगरपंचायतीमध्ये आहे. या कालावधीत गारबेज डेपो, तेलीआळी डीपी रस्ता, कॉलेज रस्ता, हॉटेल सह्याद्री रस्ता मार्गी लावता आला. मच्छीमार्केटसाठी निधी आणण्यासाठी पुढाकार घेतला. भाजी मार्केटचाही प्रश्‍न मार्गी लावला. तर प्रशासनाला शिस्त आणि पदाधिकाऱ्यांनी मनमानी सहन न करता मुख्याधिकाऱ्यांनीही अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली.
- बंडू हर्णे,
नगरसेवक 

गेल्या अडीच वर्षात शहराला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक प्रभागात पथदीप व्यवस्था. ओला आणि सुका कचरा संकलनासाठी वेगवेगळी डस्टबिन, संपूर्ण शहरात स्वच्छता, शहरातील सर्व रस्त्यांचे अद्ययावतीकरण केले. प्रत्येक नागरिकाची समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले. 
- कन्हैया पारकर,
उपनगराध्यक्षा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com