कणकवलीत शिवसेनेची स्वबळाची तयारी

कणकवलीत शिवसेनेची स्वबळाची तयारी

कणकवली - नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाला पहिल्याच मोठ्या सार्वत्रिक निवडणुकीत रोखण्यासाठी येथील नगरपंचायत लढतीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होत्या; मात्र आता शिवसेनेने निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केल्याने चुरस आणि राजकीय हालचालींमध्ये वाढ झाली आहे. शिवसेना-भाजपमधील ही चढाओढ निवडणुकीआधी मोठा भाऊ ठरविण्यासाठी मानली जात आहे.

आजवर शिवसेनेने सहकारी पक्षाची आणि छोट्या भावाची भूमिका बजावली. पण यापुढे शिवसेना स्वबळावरच लढेल आणि सर्वाधिक जागा जिंकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केलाय. तसेच सर्व १७ प्रभागांतून प्रभावी जनसंपर्क असलेले तगडे उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
येथील नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी शहरात निवडणुकीचे जोरदार वातावरण तयार झाले आहे. यात ‘अभी नहीं तो कभी नहीं’ या इराद्याने झपाटलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि संभाव्य इच्छुकांनी आपापल्या प्रभागात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. 

शहरातील बांदकरवाडी येथे रेल्वे अंडरपास भूमिपूजन कार्यक्रम झाला. वास्तविक रेल्वे विभागाच्या वतीने हा कार्यक्रम होणार होता. मात्र या कार्यक्रमाचा कुठल्याही पक्षाला थांगपत्ता लागू न देता हा संपूर्ण कार्यक्रम शिवसेनेने हायजॅक केला. राज्यात, केंद्रात भाजपचे सरकार असले तरी, त्या पक्षाच्या नेत्यांनाही रेल्वे अंडरपासचे काम सुरू होतंय याची माहिती पडली नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेनेने बांदकरवाडीत मोठा मेळावा घेतला. तेथील प्रमुख शेतकऱ्यांना ताडपत्रीचे वाटप केले.

याखेरीज ग्रामदेवतेच्या मंदिराला घसघशीत आर्थिक मदत करून मतदारांनाही आकर्षित केले. याच कार्यक्रमात शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आणि मतदारांनाही सहकार्याची भावनिक साद घातली.
नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने शहरातील महिलांसाठी नुकतीच पैठणी स्पर्धा झाली. तब्बल एक हजारहून अधिक महिलांचा थेट सहभाग आणि दोन हजार महिलांची उपस्थिती लाभल्याने हा कार्यक्रम स्वाभिमान पक्षाला बळ देणारा ठरला; मात्र या कार्यक्रमावर कडी करण्यासाठी शिवसेनेच्या वतीनेही पैठणी स्पर्धा होणार आहे. त्यामध्ये शिवसेनेचे उपनेते आणि ‘होम मिनिस्टर’ फेम आदेश बांदेकर सहभागी होणार आहेत.

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आपली पाळेमुळे घट्ट रोवण्यासाठी प्रयत्नात आहे. त्यासाठी श्री. राणे यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला चिन्ह मिळाल्यानंतर हा पक्ष प्रथमच कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीला सामोरा जाणार आहे. त्यामुळे स्वाभिमान पक्षाकडून या निवडणुकीत मोठी ताकद पणाला लावली जाणार आहे. त्याला टक्‍कर देण्यासाठी शिवसेना पक्षाने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे.

सध्या भाजपत असलेले संदेश पारकर आणि शिवसेनेचे आमदार व जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचे पूर्वीपासूनच मैत्रीची संबंध राहिले आहेत. या दोघांनी नगरपंचायतीच्या निवडणुका एकत्रित लढविल्या होत्या. यात श्री. पारकर यांनी मोठ्या भावाची भूमिका बजावली होती. नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत श्री. पारकर नगराध्यक्ष तर श्री. नाईक हे उपनगराध्यक्ष होते; मात्र आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना व भाजपची युती झालीच तर शिवसेना मोठ्या भावाची भूमिका बजावणार असल्याचे संकेत शिवसेनेने दिले आहेत.

शहरात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. त्याचबरोबर संदेश पारकर यांना मानणाराही मतदारवर्ग मोठा आहे. तर आमदार नाईक यांनीही कणकवलीत आपला स्वतंत्र असा मतदारवर्ग तयार केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान, भाजप आणि शिवसेना हे तीनही पक्ष शहरात तोडीस तोड आहेत; मात्र तीनही पक्ष स्वबळावर लढले तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नगरपंचायत निवडणुकीत बाजी मारण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे युती करूनच निवडणूक लढविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेची नेतेमंडळी आग्रही आहेत. मात्र मोठा भाऊ कोण हा प्रश्‍न सुटला नसल्याने युतीचा प्रश्‍न सध्या तरी अधांतरीच आहे.

कणकवली शहर म्हणजेच संदेश पारकर हे समीकरण गेली अनेक वर्षे  रूढ असल्याने शिवसेना आणि भाजप युती झाली तर शिवसेनेच्या वाट्याला अपेक्षित जागा मिळण्याची शक्‍यता कमीच आहे. त्यामुळे गाव आघाडी सोबत युती करून सर्वांनाच धक्‍का देण्याचीही तयारी शिवसेनेच्या नेतेमंडळींनी केली आहे. त्यादृष्टीने व्युहरचना देखील आखली जात आहे. २०१३ च्या निवडणुकीत शिवसेनेने कनकनगर, नाथ पै नगर, बिजलीनगर हा भाग आपला बालेकिल्ला तयार केला होता. तर यंदाच्या निवडणुकीत पूर्वीच्या प्रभागाबरोबरच सोनगेवाडी, बाजारपेठ, निम्मेवाडी, बांदकरवाडी, मधलीवाडी येथील प्रभागांमध्येही नव्या दमाचे कार्यकर्ते तयार केले आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष स्वबळावर लढले तरी शिवसेनेची स्वतंत्र ताकद या निवडणुकीत दिसून येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com