मुडेश्‍वर स्टेडियम उभारणीची प्रतीक्षाच

मुडेश्‍वर स्टेडियम उभारणीची प्रतीक्षाच

कणकवली - शहरातील सर्वाधिक लांब आणि रुंदीच्या असलेल्या प्रभाग दोनमध्ये मुडेश्‍वर मैदान, कणकवलीची नळपाणी योजना, पर्यटन केंद्राचा भाग येतो. प्रामुख्याने ग्रामीण भाग असलेल्या या प्रभागात शहराचे स्टेडियम प्रस्तावित आहे; परंतु पंधरा वर्षे झाली तरी क्रीडांगणाचे आरक्षण कुठल्याच राज्यकर्त्यांना विकसित करता आलेले नाही. पर्यटन केंद्र उभारणीनंतर काही दिवसांतच बंद पडले. शहराची नळयोजना सक्षम करण्यात मात्र विद्यमान सत्ताधाऱ्यांना यश आले आहे. ग्रीन झोनमुळे प्रभाग दोनचा बहुतांश भाग अविकसितच राहिला आहे. याखेरीज अंतर्गत रस्ते, पायवाटा, विद्युतीकरण आदी समस्याही या प्रभागात आहेत.

प्रभाग २ मध्ये वरचीवाडी, घाडीवाडी, धनगरवाडी, समर्थनगर आणि साईनगर आदी वाड्यांचा समावेश आहे. यांतील वरचीवाडीमधील नागरिकांना पायवाटांचा प्रश्‍न गंभीरतेने भेडसावतो आहे. वरचीवाडीतील अनेक नागरिकांना अजूनही आपल्या घरापर्यंत दुचाकी घेऊन जाता येत नाही, अशी स्थिती आहे. पावसाळ्यात तर गुडघाभर पाण्यातून घरांपर्यंत जावे लागते. शहराच्या इतर भागांत रस्त्याचे जाळे झाले असले तरी वरचीवाडीतील रस्त्यांचा प्रश्‍न सोडविण्यात कुठल्याच सत्ताधाऱ्यांनी उत्सुकता दाखवली नसल्याची खंत या भागातील नागरिकांना आहे. शहराचा उर्वरित भाग पथदीपांनी झळाळला असला तरी वरचीवाडीच्या अनेक भागांत मात्र पथदीपांची उभारणी झालेली नाही. 

अशी आहे रचना...

  •  लोकसंख्या ११००.  
  •  आरक्षण : सर्वसाधारण महिला.
  •  प्रभागात समाविष्ट भाग-  वरचीवाडी, घाडीवाडी, धनगरवाडी, समर्थनगर.
  •  प्रभाग रचना -  उत्तरेला - जानवली नदीपासून उत्तर पूर्वेस मौजे नागवे हद्दीपर्यंत. पूर्वेला - हरकूळ बु. सीमेपर्यंत. पश्‍चिमेला - जानवली नदी ते रेल्वेलाइन मार्ग महारूद्र अपार्टमेंटपर्यंत.

प्रभाग दोनमधील साईनगर, समर्थनगर ही गेल्या दहा वर्षांत वसलेली नवीन नगरे आहेत. धनगरवाडीत तुरळक वस्ती आहे. तर घाडीवाडी जुना नरडवे रोड आणि मच्छी मार्केट रोड या दरम्यान वसली आहे. या वाडीतील पायवाट रुंदीकरण आणि डांबरीकरण अनेक वर्षे झालेले नाही. 

कणकवली शहरात पंचवीस वर्षांहून अधिक काळ मुडेश्‍वर येथील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. याखेरीज शाही विवाह सोहळे, जाणता राजा महानाट्य आदी कार्यक्रमदेखील पार पडले आहेत. या सर्व उपक्रमांसाठी केंद्र ते राज्यपातळीवरची नेतेमंडळी आली. या सर्वांनी क्रीडांगण उभारणीसाठी कोट्यवधी रुपये देण्याची घोषणा केली. पण त्या उभारणीसाठी एक रुपयादेखील खर्च पडलेला नाही. तसेच जागाही ताब्यात आलेली नाही. हे मैदान विकसित करण्यासाठी काहीच हालचाली होत नसल्याने अखेर येथील जमीन मालकांनी हे मैदान तारा लावून बंदिस्त केले आहे.

शहराची नळपाणी योजना प्रभाग दोनमध्ये येते. गेल्या दोन वर्षांत या नळयोजनेचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरवासीयांना मुबलक आणि शुद्ध पाणीपुरवठा होत आहे.  याखेरीज साईनगर येथे उद्यानाची निर्मिती झाली आहे; मात्र याच प्रभागातील पर्यटन सुविधा केंद्र उभारणीनंतर काही दिवसांतच बंद पडले आहे. भूसंपादन न करताच तसेच नियम डावलून हे केंद्र उभारण्यात आल्याने त्याची डागडुजीदेखील करता येत नाही अशी नगरपंचायतीची अडचण झाली आहे.
 प्रभाग दोनमध्ये येणाऱ्या बांदकरवाडीमधून वरचीवाडीपर्यंत जाण्यासाठी शहर विकास आराखड्यात रस्ता प्रस्तावित आहे. तो पूर्ण झाल्यास या भागाच्या विकासाला चालना मिळू शकते. याखेरीज मुडेश्‍वर मैदान गारबेज डेपो ते नागवे हद्दीपर्यंतचा रस्ता पूर्ण झाल्यास शहराला नवीन रिंगरोड उपलब्ध होऊ शकतो. पुढील पाच वर्षांत तरी या रस्त्यासाठी येणारे लोकप्रतिनिधी प्रयत्न करतील अशी अपेक्षा येथील नागरिकांना आहे.

नगरपंचायतीच्या २००३ मधील निवडणुकीत या प्रभागातून रवींद्र गायकवाड आणि ज्युईली निग्रे यांनी प्रतिनिधित्व केले. २००८ च्या निवडणुकीत किशोर राणे आणि समृद्धी पारकर तर २०१३ च्या निवडणुकीत किशोर राणे, गौतम खुडकर, ॲड.प्रज्ञा खोत आणि सुविधा साटम या प्रभागातून निवडून आल्या होत्या. यंदा प्रभाग दोनची रचना बदलली आहे. हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे या प्रभागातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी अन्य प्रभागात चाचपणी 
सुरू केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com