कणकवली नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी पारकरांकडे

कणकवली नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी पारकरांकडे

कणकवली - नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी संदेश पारकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पोटनिवडणूक आणि सार्वत्रिक निवडणुकीत सर्व उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने त्यांच्याकडे सोपवली आहे. दरम्यान, मुंबई मंत्रालयात माजी आमदार राजन तेली आणि संदेश पारकर यांच्यातील वादंगावरही पडला पडला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कोअर कमिटीची बैठक मुंबईत झाली. यात प्रामुख्याने पारकर-तेली वादावर चर्चा झाली. त्याबरोबरच भाजपची जिल्ह्यातील पुढील वाटचाल, आगामी निवडणुकांसाठी प्रभारींचीही नियुक्‍ती झाल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली आहे. बैठकीला अतुल काळसेकर, अतुल रावराणे, कोकण प्रांत संघटनाध्यक्ष सतीश धोंड, भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली, संदेश पारकर आदी उपस्थित होते.

पुढील काळात कणकवली नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक तसेच दोडामार्ग पोटनिवडणूक आणि नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम आहे. यात दोडामार्गसाठी राजन म्हापसेकर यांची प्रभारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. तर कणकवली नगरपंचायतीसाठी संदेश पारकर यांना प्रभारी म्हणून नेमणूक केली आहे. श्री. पारकर यांच्याकडे भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी असेल. तसेच नगरपंचायतीसाठीचे उमेदवार, निवडणूक रणनीती आणि इतर निर्णय सामुहिकपणे घेतले जातील असे श्री. जठार म्हणाले. तसेच भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्याकडे पूर्वीप्रमाणेच सावंतवाडी मतदारसंघाची जबाबदारी आहे असेही ते म्हणाले.

पोटनिवडणूक लढविणार नाही 
कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग १ मध्ये पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक भाजप लढवणार नाही. तसेच इतर पक्षांनीही या निवडणुकीत सहभाग घेऊ नये. पुढील चार महिन्यात नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक कुणीही लढवू नये असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केले आहे.

दोघांत वाद झाला हे खरे - जठार 
भाजप पक्षामध्ये विद्वानांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वाद, भांडणे होतच राहतील. महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपचे राजन तेली आणि संदेश पारकर मुंबईत आले होते. त्यांच्यात वादंग झाला हे खरे आहे, मात्र कुणीही कुणावर हात उगारलेला नाही. आम्ही सर्वजण तेथे होतो. त्या दोघांत गैरसमजुतीमधून वाद झाले होते. हे वाद कोअर कमिटी बैठकीत मिटविण्यात आले आहेत, असे जठार यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com