करुळ, भुईबावडा घाट ‘डेंजरझोन’मध्ये

करुळ, भुईबावडा घाट ‘डेंजरझोन’मध्ये

वैभववाडी -  गेल्या आठवडाभरापासून घाट परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भुईबावडा आणि करुळ हे पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारे प्रमुख घाटरस्ते डेंजरझोनमध्ये पोचले आहेत. भुईबावडा घाटरस्ता तीन ठिकाणी तर करुळ घाट एका ठिकाणी खचला आहे. आठवडाभरात चार ते पाच वेळा दरडी कोसळल्या असून, अजूनही दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. खचत असलेले घाटरस्ते वाहतुकीच्या दृष्टीने धोक्‍याची घंटा मानली जात आहे.

गेला आठवडाभर करुळ आणि भुईबावडा घाट परिसरात ढगफुटीसदृश्‍ा पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसाचा फटका करुळ आणि भुईबावडा परिसरातील शेतकऱ्यांना बसला तितकाच तो घाटरस्त्यांना बसला आहे. आठवडाभरात भुईबावडा घाटात चार ते पाच वेळा दरडी कोसळल्या आहेत, तर करुळ घाटात तीनदा दरडी कोसळल्या. दरडी कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही तासांकरिता ठप्प झाली होती; परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे हे दोन्ही घाटरस्ते खचू लागले आहेत.

डोंगरमाथ्यावरून येणारे पावसाचे पाणी रस्त्यावरूनच वाहत असल्यामुळे घाटरस्त्यांना धोका निर्माण झाला आहे. घाटरस्त्यांना छोटी छोटी भगदाडे पडत आहेत. सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भुईबावडा आठवडाभरात तीन ठिकाणी रस्ता खचला आहे. तर करुळ घाटात एका ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे भुईबावडा खचलेल्या ठिकाणांची संख्या आता सहावर पोचली आहे तर करूळ घाटातील संख्या पाचवर पोहोचली आहे.

कोसळलेल्या दरडी हटवून रस्ता वाहतुकीस खुला केला जातो; मात्र घाटरस्ते खचण्याचे वाढत असलेले प्रकार वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक मानले जात आहेत. ज्या ठिकाणी रस्ते खचले आहेत. त्याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास खचलेल्या ठिकाणी पूर्ण रस्ता खचण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे घाटरस्त्यांबाबत सावधानता न बाळगल्यास मोठा धोका निर्माण होतो, अशी सध्या घाटातील स्थिती आहे.

घाटरस्ते खचत असले तरी सार्वजनिक बांधकाम विभाग सुशेगाद आहे. कोसळलेल्या दरडी हटवून वाहतूक पूर्ववत करणे एवढेच काम चोखपणे बांधकामचे अधिकारी कर्मचारी करताना दिसत आहे; परंतु खचत असलेल्या रस्त्यांकडे ते गंभीरपणे पाहताना दिसत नाही. त्यामुळेच गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात खचलेल्या घाटरस्त्यांच्या पुनर्बांधणीला अजूनही बांधकाम विभागाला फुरसत मिळालेली नाही.

करूळ घाटात तीन ठिकाणी रस्ता खचला होता, तर भुईबावडा घाटात दोन ठिकाणी रस्ता खचलेला होता. या रस्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी सप्टेंबरमध्ये करून तत्काळ ही कामे करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या; परंतु अजुनही ही कामे झालेली नाहीत. खचलेल्या रस्त्यांची कामे जुनच्या पहिल्या आठवड्यात मंजुर झाली. त्याची निवीदा प्रकिया देखील झाल्याचे बांधकामकडुन सांगण्यात येत आहे; परंतु अद्याप खचलेल्या रस्त्यांच्या पुर्नबांधणीला सुरूवात झालेली नाही.

करूळ आणि भुईबावडा हे दोन घाट एकमेकांना पर्यायी रस्ते आहेत.परंतु या पावसाळ्यात या दोन्ही घाटांची दुरावस्था झाली आहे. कधी नव्हे एवढी पडझड गेल्या काही दिवसात झाली आहे. भुईबावडा घाट रस्ता तर वाहतुकीस अयोग्य झाला आहे.हा घाटरस्ता अतिशय धोकादायक मानला जातो. गेल्याच आठवड्यात एका गाडीवर दगड कोसळला होता. सुदैवाने त्यामध्ये कुणालाही दुखापत झाली नव्हती. घाटातील संरक्षक कठडे अनेक ठिकाणी कोसळले आहेत.

बांधकाम सुशेगात
घाटरस्ता खचला तर यापुर्वी तत्काळ उपाययोजना केल्या जात होत्या. बॅरेलमध्ये दगड घालुन ते रचली जात होती जेणेकरून रस्ता अधिक खचु नये परंतु अशा पध्दतीच्या कोणत्याही उपाययोजना बांधकामकडुन केल्या जाताना दिसत नाही.

गाळामुळे रस्त्याचे बनले गटार
घाटरस्त्यावर येणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याकरिता काही वर्षांपूर्वी डोंगराकडील बाजूस गटारे बांधण्यात आली होती. काँक्रीटीकरण केलेली ही गटारे सध्या दगडमातीच्या गाळाने भरली आहेत. त्यामुळे डोंगरावरून अतिवेगाने पाणी थेट रस्त्यावर येते. त्याच पाण्यामुळे घाटरस्ते खचत आहेत; मात्र त्याकडे बांधकाम विभाग सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे.

कार्यालयाला अधिकारीच नाही
सार्वजनिक बांधकाम विभागाचे वैभववाडी उपविभागीय कार्यालय आहे. कोट्यावधी रुपयाची कामे या कार्यालयाच्या अधिपत्याखाली होत असतात. याशिवाय या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दोन संवेदनशील घाटमार्ग आहेत; मात्र गेल्या वर्षाभरापासून बांधकाम विभागाला उपविभागीय अभियंताच नाही. त्यामुळे तालुक्‍यातील अनेक कामांची दुरवस्था झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com