कोकणातील निसर्गसौंदर्य जगभरात पोचविणार - जॉकी श्रॉफ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

सावंतवाडी - कोकणातील नैसर्गिक सौदर्य, स्वच्छता आणि प्रदूषणमुक्त निसर्ग भावीपिढीसाठी टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबत आपणाला प्रचंड आवड आहे. यामुळे येथील निसर्गसौंदर्य जगभरात पोचविण्यासाठी सहकार्य करेन, अशी ग्वाही प्रसिद्ध सिनेअभिनेते जॉकी श्रॉफ यांनी येथे दिली.

सावंतवाडी - कोकणातील नैसर्गिक सौदर्य, स्वच्छता आणि प्रदूषणमुक्त निसर्ग भावीपिढीसाठी टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबत आपणाला प्रचंड आवड आहे. यामुळे येथील निसर्गसौंदर्य जगभरात पोचविण्यासाठी सहकार्य करेन, अशी ग्वाही प्रसिद्ध सिनेअभिनेते जॉकी श्रॉफ यांनी येथे दिली.

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत जॉकी श्रॉफ यांनी आज शहरातील विविध पर्यटन स्थळांना भेट दिली. यानंतर पालकमंत्री केसरकर यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जॅकी श्रॉफ म्हणाले, ‘‘गेली अनके वर्ष आपण कोकणात फिरत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक बदल झाले आहेत. पालकमंत्री केसरकर यांचे विकासाचे व्हिजन खूप चांगले आहे. येथील शिल्पग्राम प्रकल्प खूप सुंदर असुन मुलांना कलेची आवड निर्माण व्हावी, यासाठी असे प्रकल्प प्रत्येक ठिकाणी उभारावेत, असे कलाकार म्हणून आपणाला वाटते. चित्रीकरणासाठी गोव्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा सुंदर आहे. येथील निसर्गसौंदर्यचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माझे नाव वापरून जे काही उपक्रम किंवा कार्यक्रम राबविता येतील त्यासाठी आपले पूर्ण सहकार्य असेल.’’

श्री. केसरकर म्हणाले, ‘‘जॉकी श्रॉफ यांचा दौरा तीन, चार महिन्यापूर्वी नियोजन होता; मात्र शूटिंगमुळे त्यांना येत आले नाही. जॉकी श्रॉफ यांना कले बरोबरच पर्यटन, निसर्ग आणि वृक्षारोपणाचीही आवड आहे. तसेच जिल्ह्याच्या विविध पर्यटन विकास योजनांमध्ये त्यांना रस आहे. त्यामुळे आजच दौरा त्यांचा पहिला किंवा शेवटचा नसून ते पुन्हा जिल्ह्यात येणार आहेत.’’

जॉकी श्रॉफ यांनी केसरकर यांच्या सोबत रेडी येथील यशवंतगड आणि परिसरातील पर्यटनस्थाळाची पाहणी केली. यानंतर त्यांनी सालईवाडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी श्रॉफ यांना पाहण्यासाठी आणि त्यांचे फोटो काढण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर त्यांनी येथील राजवाडा पहिला. यावेळी त्यांनी राजमाता सत्वशिलादेवी भोसले, शुभदादेवी भोसले, बाळराजे खेमसावंत भोसले, लखमराजे भोसले यांच्याशी चर्चा करून हस्तकलेची माहिती घेतली.

येथील स्वच्छता आणि प्रदूषणमुक्त पर्यावरण भावी पिढीसाठी टिकवून ठेवण्याचे काम एकट्याचे नसून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. आंबोली घाटात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्या ठिकाणी आयुर्वेदिक सेंटर उभारले तर त्याचा मुलांना फायदा होऊन जिल्ह्यात आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठीही आपले प्रयत्न आहेत.
- जॉकी श्रॉफ, सिने अभिनेते