मच्छीमारांविरुद्ध अधिकाऱ्यांची हुकूमशाही - कृष्णनाथ तांडेल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

मालवण - जिल्हा पोलिस प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने तपास यंत्रणा राबवून निरपराध मच्छीमार नेते गोपीनाथ तांडेल व जोसेफ नऱ्होंना यांच्या विरोधात हेतूपुरस्सर दरोडा व मारहाण करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना गोवले आहे. ‘थर्ड डिग्री’चा वापर केला गेला. ही सनदी अधिकाऱ्यांची हुकूमशाही आहे. यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची तत्काळ बदली करावी, अशी मच्छीमारांची एकमुखी मागणी आहे.

मालवण - जिल्हा पोलिस प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने तपास यंत्रणा राबवून निरपराध मच्छीमार नेते गोपीनाथ तांडेल व जोसेफ नऱ्होंना यांच्या विरोधात हेतूपुरस्सर दरोडा व मारहाण करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना गोवले आहे. ‘थर्ड डिग्री’चा वापर केला गेला. ही सनदी अधिकाऱ्यांची हुकूमशाही आहे. यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची तत्काळ बदली करावी, अशी मच्छीमारांची एकमुखी मागणी आहे.

पोलिसांच्या मनमानीविरोधात असंतोषाला वाचा फोडण्यासाठी सर्जेकोट, मिर्याबांदा, कोळंब व रेवंडी येथील मच्छीमारांतर्फे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ज्येष्ठ मच्छीमार नेते कृष्णनाथ तांडेल यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.

जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्थानिक मच्छीमारांनी गोवा राज्यातील तीन पर्ससीन बोटी पकडल्याच्या पार्श्‍वभूमीवर येथील दोन मच्छीमारांना ताब्यात घेत अटक केली. यासंदर्भात श्री. तांडेल यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

या वेळी स्वप्नील पराडकर, दीनानाथ धुरी, नितीन आंबेरकर, सुनील खवणेकर, चिन्मय तांडेल, नागेश परब, नरी जामसंडेकर, मनीष खडपकर, नारायण आडकर, शंकर मुंबरकर, सुधीर जोशी, प्रमोद खवणेकर, भिवा आडकर, भगवान मुंबरकर, पुंडलिक परब, विकी चोपडेकर, रूपेश लोणे, नितीन परुळेकर, महादेव आडकर, विक्रम आडकर, बाळा आंबेरकर, स्वप्नील आचरेकर, संदीप कोयंडे, दीपक जामसंडेकर यांच्यासह भद्रकाली, रामेश्वर व सर्जेकोट मच्छीमार सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. तांडेल म्हणाले, ‘‘किनाऱ्यापासून दोनशे सागरी मैलांपर्यंत भारत सरकारचे सार्वभौमत्व प्रस्तावित झाले आहे. प्रत्येक राज्याला किनारपट्टीपासून १२ नॉटिकल मैल क्षेत्रात मासेमारी करण्याचा अधिकार आहे.

मासेमारी परवाना असलेल्या  नौका वैधरित्या व्यवसाय करू शकतात. केरळ, कर्नाटक, गुजरात यांच्या १२ नॉटीकल क्षेत्रात मच्छीमार प्रवेश करत असतील व त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या परवाना नसेल तर ते अवैध मासेमारी करत असल्याचे सिद्ध होते. दुर्दैवाने महाराष्ट्र सागरी अधिनियम कायदा १९८१ अस्तित्वात येऊन देखील तत्कालीन व विद्यमान सरकारने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर परराज्यातील यंत्रनौकांना आंदण दिल्यासारखे आहे.

परराज्यातील हायस्पीड व पर्ससीन व प्रकाशझोतातील मासेमारी बोटी बारा नॉटीकल क्षेत्रात घुसखोरी करून मत्स्य थवे लुटून नेत आहेत. तरी देखील आमचे मायबाप सरकार ढिम्मपणे सागरी नियमांची अंमलबजावणी न करता परराज्यातील यंत्रनौकांना मुभा देत आहेत, असा मच्छीमार समाजाचा आरोप आहे.’’

ते म्हणाले, ‘‘प्रशासन या अवैध मासेमारी विरोधात शासन कोणतीही कारवाई करत नाही म्हणून स्थानिक मच्छीमार स्वतःचा जीव धोक्‍यात घालून प्रसंगी अंगावर गुन्हे घेऊन शासन कारवाई करेल या उद्देशाने परराज्यातील नौका पकडून किनाऱ्यावर आणतात. असाच प्रकार मंगळवारी दांडी किनारी घडला.

या प्रकरणात मच्छीमार नेते व समाजसेवक गोपीनाथ तांडेल व जोसेफ नऱ्होना या कार्यकर्त्यांना अटक करून जिल्हा पोलिस प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने गोवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर पोलिसांनी थर्डडिग्रीचा वापर केला. जिल्हा पोलिस अधीक्षक केवळ दबावापोटी मच्छीमारांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे मच्छीमारांना न्याय मिळावा, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल.’’

पालकमंत्री पालकच राहिले नाहीत 
जिल्हा पोलिस अधीक्षक स्थानिक मच्छीमारांवर चुकीचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करत आहेत. पर्ससीन नौकांप्रकरणी अटक केलेल्या गोपीनाथ तांडेल व जोसेफ नऱ्होंना यांचा या प्रकाराशी कोणताही संबंध नसताना त्यांना पोलिस ठाण्यात कोंडून ‘थर्ड डिग्री’चा वापर करत आहेत. तरीदेखील पालकमंत्री दीपक केसरकर तसेच आमदार, खासदार कमकुवत ठरले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री पालकच राहिले नाहीत. त्यामुळे न्याय कोणाकडे मागणार? असा उद्विग्न सवाल श्री. तांडेल यांनी उपस्थित केला. 

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
याप्रकरणी आज आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यात त्यांनी पोलिसांची कारवाई हुकूमशाहीची असल्याचे म्हटले आहे. संबंधित पोलिस प्रशासनाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि गरीब मच्छीमारांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Sindhudurg News Krushnnath Tandel Press