एलईडी मासेमारी वाद चिघळला

एलईडी मासेमारी वाद चिघळला

मालवण - एलईडी फिशिंग करणाऱ्या बोटी मच्छीमारांनी पकडून दिल्यानंतर निर्माण झालेला वाद आज आणखी चिघळला. या बोटींवर घुसून चाकू व दांड्याचा धाक दाखवत मासळी व मासेमारीचे साहित्य चोरून नेल्याप्रकरणी तसेच खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयित गोपीनाथ तांडेल (रा. सर्जेकोट), जोसेफ नऱ्होंना (रा. मेढा) या दोघांना आज कडेकोट पोलिस बंदोबस्तात येथील न्यायालयात दाखल केले असता १७ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी त्यांच्यावर थर्ड डिग्री वापरल्याचा आरोप करत मच्छीमारांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, दरोडा तसेच मासळीची चोरी करण्यासाठी वापरलेला ट्रॉलर आज पोलिसांनी जप्त केला. त्यावरील सात खलाशांनाही ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिली. गोव्यातील पर्ससीनधारकांकडून सातत्याने एलईडी पद्धतीने मासेमारी केली जात असल्याने त्याला आळा घालण्याची मागणी पारंपरिक मच्छीमारांनी केली होती; मात्र मत्स्य व्यवसाय खात्याकडून प्रभावी उपाययोजना राबविल्या जात नसल्याने दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री काही मच्छीमारांनी समुद्रात प्रकाशझोतातील मासेमारी करणाऱ्या तीन बोटी पकडून येथील किनाऱ्यावर आणल्या. मच्छीमारांनी आपल्या बोटी पकडल्याची माहिती मिळाल्यानंतर येथे दाखल झालेल्या गोव्यातील बोटीच्या मालकांनी पोलिस ठाण्यात जात चाकूचा व दांड्याचा धाक दाखवत मासळी तसेच अन्य साहित्य असा सुमारे सहा लाखांचा ऐवज चोरून नेला, तसेच ५० लाख रुपयांची खंडणी मागितली, अशी तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी २५ ते ३० मच्छीमारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या दरोडा तसेच खंडणीप्रकरणी मच्छीमार नेते गोपीनाथ तांडेल, जोसेफ नऱ्होंना या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. आज या दोन्ही संशयितांना अटक दाखवून सायंकाळी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी पोलिस ठाणे, तसेच न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात मच्छीमारांनी गर्दी केली होती. त्यामुळे कडेकोट पोलिस बंदोबस्तात या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १७ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. यात चोरीसाठी ज्या ट्रॉलरचा वापर करण्यात आला होता, तो ट्रॉलर आज पोलिसांनी ताब्यात घेत जप्त केला. त्यावरील सात खलाशांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.

मच्छीमारांतील संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर किनारपट्टी भागात अद्यापही तणावाचे वातावरण आहे. काल (ता.१३) सायंकाळनंतर पोलिस ठाणे परिसरात मच्छीमारांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जलद कृती दल तसेच दंगा काबू पथकाचा बंदोबस्त ठेवला. त्यामुळे पोलिस ठाण्यास छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. आजच्या दुसऱ्या दिवशीही पोलिस ठाणे परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

गोव्यातील बोटमालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार मच्छीमार नेते गोपीनाथ तांडेल, जोसेफ नऱ्होना यांना संशयित म्हणून पोलिसांनी अटक केली आहे; मात्र या दोघांनाही पोलिस प्रशासनाने दहशतवादी असल्यासारखी वागणूक देत मच्छीमारांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यापुढे जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील एकही पारंपरिक मच्छीमार यापुढे पोलिस प्रशासनाला सहकार्य करणार नाही. किनारपट्टी भागातील सर्व सागरी सुरक्षा दलाच्या सदस्यांनी आपले राजीनामे श्रमिक मच्छीमार संघाकडे सादर करावेत, असे आवाहन नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे सदस्य रविकिरण तोरसकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

तीन बोटी ताब्यात
प्रकाशझोतातील मासेमारी करताना मच्छीमारांनी पकडून येथील किनाऱ्यावर आणलेल्या गोव्यातील तिन्ही बोटी येथील मत्स्य व्यवसाय विभागाने ताब्यात घेतल्या आहेत. यातील एका बोटीवर २४०० रुपयांची मासळी आढळून आली आहे. त्यामुळे या तिन्ही बोटी अनिश्‍चित कालावधीसाठी अवरुद्ध करण्यात याव्यात यासाठीचा प्रस्ताव मत्स्य व्यवसाय विभागाकडून उद्या (ता. १५) न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्रीकांत वारुंजीकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com