आरोस, पाडलोसमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी - तालुक्‍यातील आरोस व पाडलोस गावात गेले चार दिवस बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. रविवारी (ता. ८) सकाळी आरोस-वरचावाडा येथील संजय नाईक हे गायी-म्हैशींना चरण्यासाठी भुताचासडा येथे घेवून जात असताना दबा धरून बसलेला बिबट्या हल्ला करण्यासाठी अचानक समोर आला. आरडाओरड करून काठीच्या सहाय्याने नाईक यांनी बिबट्यापासून आपला जीव वाचविला. वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

आरोस-वरचावाडा येथील संजय नाईक हे नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या गुरांना चरण्यासाठी भुताचासडा येथे घेवून जात होते. एका डबऱ्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याला जनावरांनी पाहून हंबरण्यास सुरुवात केली व सैरभैर धावू लागली. त्यामुळे संजय नाईक यांना आजुबाजुस रानटी प्राणी असल्याचा संशय आला. त्यांनी हुशारीने गुरांना तेथून बाहेर काढले, मात्र दबा धरून बसलेला बिबट्या जनावरांवर हल्ला करण्यासाठी अचानक समोर आला. आरडाओरड केल्यानंतर त्या बिबट्याने जंगलाच्या दिशेने धुम ठोकली व संजय नाईक यांनी आपल्यासह जनावरांचेही प्राण वाचविले. 

पाडलोस-केणीवाडा येथील रमाकांत पटेकर यांच्या घराशेजारी रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एका बिबट्याने दर्शन दिले. कोंबडी, कुत्रे तसेच पाळीव जनावरांना या बिबट्यापासून धोका असल्याचे रमाकांत पटेकर यांच्या लक्षात येताच त्यांनी काहीवेळ घराबाहेरील वीज सुरुच ठेवली होती. गेले अनेक दिवस बिबट्या केणीवाडा येथील डोंगराळ भागात वावरत असल्याचे त्यांनी सांगितले. 

बिबट्याचा वावर घरापर्यंत होत असल्याने नागरिकांसह पाळीव जनावरांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रात्रो ८ वाजल्यानंतर घराबाहेर एकट्यादुकट्याला फिरणे मुश्‍किल झाले आहे. वनविभागाने अशा दहशत माजविणाऱ्या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.