खाकीला उल्लू बनवत साडेपाच लाख लुटले

खाकीला उल्लू बनवत साडेपाच लाख लुटले

कुडाळ - स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून पुण्यातील सहाजणांनी निरुखे येथे छापा टाकायला लावून साडेपाच लाखांची लूट केली. विशेष म्हणजे छापा घातलेल्या व्यावसायिकाला पोलिस कोठडीची हवा खावी लागली. अखेर पोलिस अधीक्षकांच्या हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर खरी घटना उघड झाली. याची माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांनी दिली. 

असा घडला प्रकार

  •     पुण्यातील सात जण सावंतवाडीत आले
  •     स्थानिक पोलिसांना घेऊनच निरुखेतील घरावर छापा
  •  घरातील साडेआठपैकी साडेपाच लाख रक्कम घेऊन पोबारा

पुण्‍यातील सहा जणांवर गुन्‍हा दाखल
निरुखेतील साडेपाच लाखांच्‍या लुटीप्रकरणी याप्रकरणी पुण्यातील कथित माहिती अधिकार कार्यकर्ता श्रीजीत रमेशन याच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे.  

पोलिस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांनी दिलेली माहिती अशी - २२ एप्रिलला पुणे येथील श्रीजीत रमेशन व त्याचे सहकारी राजबहाद्दर यादव, आनंद सदावर्ते, अनिल बनसोडे, त्यांचा ड्रायव्हर इरफान व श्रीजित रमेशन यांचा सशस्त्र अंगरक्षक तथा पुणे पोलिस मुख्यालयातील (ग्रामीण) पोलिस मोरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन सिंधुदुर्ग पोलिस, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेशी संपर्क साधला.

आपण दिल्ली येथून आलेलो आहोत. आमची ओळख कुणाला देत नाही. निरुखे येथील एका व्यक्‍तीने घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्‍कम तसेच डिझेल, पेट्रोलचा अवैध साठा केलेला आहे. तेथे छापा टाकायचा आहे, असे सांगितले.

सरकारी अधिकारी असल्याचे भासवून निरुखे येथील रामदास पुरुषोत्तम करंदीकर यांच्या घराकडे रात्री पावणेनऊच्या सुमारास पोलिसांना घेऊन गेले. तेथे पोलिसांना व करंदीकर यांना खोटी ओळख सांगून घराची झडली घेतली. करंदीकर यांनी घरात आणून ठेवलेली जांभूळ व काजू विक्रीची रोख रक्‍कम सुमारे ८ ते ८.५ लाख रुपये आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर करंदीकर यांच्या विनवणीनंतर ४४ हजार रुपये त्यांना खर्चासाठी त्यांच्या कपाटात टाकले. त्यापैकी पोलिसांकडे १,८५,७१० रुपये रोख रक्‍कम पंचनाम्यात दाखवण्यासाठी दिली. उर्वरित रक्‍कम एका व्यक्‍तीने पिशवीतून करंदीकर यांच्या घराच्या पाठीमागील दरवाज्याने बाहेर काढून आपल्या मोटारीत नेऊन ठेवली. त्यानंतर ते तेथून पोलिसांना त्याची कारवाई करण्यास सांगून निघून गेले.

पोलिसांनी घराच्या बाहेर मिळून आलेल्या पेट्रोल व डिझेलचे कॅन, तसेच कॅन ठेवलेली महिंद्रा पिक अप गाडी व १ लाख ८५ हजार ७१० रुपये रोख रक्‍कम यांचा पंचनामा करून ताब्यात घेतली. रामदास करंदीकर यांना ताब्यात घेऊन कुडाळ पोलिस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केला. 

श्री. करंदीकर २३ एप्रिलला जामिनावर सुटले. त्यानंतर त्यांनी घरी जाऊन आपल्या व्यवसायाच्या कागदपत्रावरून रक्‍कमेचा ताळमेळ घातला. त्यावेळी त्याच्या असे लक्षात आले की, या प्रकारात संशयिताने सुमारे साडेपाच लाख रुपये रक्‍कम नेलेली आहे. त्या रक्‍कमेबाबत कोणतीच कारवाई झालेली नाही. म्हणून रामदास करंदीकर यांनी पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची भेट घेऊन ती हकीकत कथन केली. या प्रकाराबाबत चौकशी करण्याचे निवेदन दिले.  

श्री. गवस म्हणाले, ‘‘पोलिस अधीक्षकांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. मी व सहकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणली. या प्रकाराबाबत गुन्हा दाखल केलेला आहे. सर्वांवर दरोडा व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित श्रीजीत व्यावसायिक यादव व सदावर्ते चौकशीसाठी एकदा आले होते. लवकरच त्यांना ताब्यात घेऊ. ही कारवाई पोलिस अधिक्षक गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे.’’ 

आठ पोलिसांची चौकशी होणार
स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या अधिकाऱ्यांनी पुणे येथून येणारे कोण आहेत, त्यांची साधी ओळखही करून घेतली नाही. कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल पोलिस उपनिरीक्षकसह आठजणांची कसून चौकशी होणार आहे. पुणे येथील या सर्वांना निरुखेसारख्या ग्रामीण भागाची माहिती देणारा कोण, याचासुद्धा उलगडा करणार असल्याचे श्री. गवस यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com