मालवणात पालिका सभेत निविदेपूर्वीच विकासकामे यावरून खडाजंगी

मालवणात पालिका सभेत निविदेपूर्वीच विकासकामे यावरून खडाजंगी

मालवण - पालिका प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया होण्यापूर्वीच शहरात ठेकेदारांकडून विकासकामे केली जात असल्याने आक्रमक भूमिका घेताना उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेविका पूजा करलकर, ममता वराडकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

पालिकेचा पारदर्शक कारभार हाच का? असा प्रश्‍न राजन वराडकर यांनी केला. यावर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अखेर यापुढे पालिकेत व शहरात कायद्यानुसारच कामे केली जातील असे नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी स्पष्ट केले. 

येथील पालिकेची सर्वसाधारण सभा आज पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत आडारी कचरा डेपोमध्ये कूपनलिका खोदणे व पंपिंग मशिनरी बसवून कार्यान्वित करणे या विषयावर उपनगराध्यक्ष वराडकर यांनी हे काम काही महिन्यांपूर्वी झाले असताना या कामाची आता निविदा प्रक्रिया कशी केली जात आहे असा प्रश्‍न उपस्थित केला. यावर नगरसेविका ममता वराडकर, पूजा करलकर यांनीही शहरात निविदा प्रक्रिया होण्यापूर्वीच कामांना सुरवात केली जात असल्याचे सांगत याला आक्षेप घेतला.

शहरात यापूर्वीही अशाप्रकारे निविदेपूर्वी कामे झाली आहेत त्याची यादी सभागृहात आणली जाईल असे गणेश कुशे, नितीन वाळके यांनी सांगितले. त्यानंतर कचरा डेपोमधील कामाला मान्यता देण्याचा ठराव नितीन वाळके यांनी मांडला त्याला गणेश कुशे यांनी अनुमोदन दिले. या ठरावाला उपनगराध्यक्ष वराडकर, करलकर आणि वराडकर यांनी विरोध दर्शवीत आपले विरोधी मत नोंदविले. यावर झालेल्या चर्चेत कुशे यांनी मेढा येथे झालेल्या कामाची जबाबदारी आपण स्वीकारत असून त्याचे पैसे आपण द्यायला तयार असल्याचे सभागृहात स्पष्ट केले. जे काम गेल्या काही वर्षात होऊ शकले नाही ते काम एका वर्षात आपण मार्गी लावले याचे समाधान असल्याचे सांगितले.

यावर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी शहरात विकासकामे करताना सर्व नगरसेवकांना विश्‍वासात घेणे महत्त्वाचे आहे. सर्व लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेत पथदिव्यांची कामे होणे आवश्‍यक असून कोणा एका नगरसेवकाचेच काम होत असेल तर ते चुकीचे असल्याचे स्पष्ट केले.

पालिकेस स्वच्छता निरीक्षक पुरविण्याबाबत एजन्सी नियुक्‍ती करण्याच्या ठरावाला आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी फेर निविदा काढण्याचा ठराव मांडला. त्याला नगरसेविका आकांक्षा शिरपुटे यांनी अनुमोदन दिले. यावर सुदेश आचरेकर यांनी आक्रमकपणे सभागृहात चुकीचा पायंडा पाडला जात आहे. निविदा प्रक्रिया योग्यप्रकारे झाली असताना फेरनिविदा काढणे चुकीचे आहे. एकाच्या मर्जीने कामकाज होणे चुकीचे आहे. पालिकेचे हित लक्षात घेता कमी दराची निविदा मंजूर करणे आणि त्यातही संबंधित स्वच्छता निरीक्षक कमी पैशांवर काम करण्यास तयार असल्यास पालिकेचा फायदा होणार आहे.

यामुळे सभागृहाने एकमताने हा ठराव मंजूर करायला हवा असे सांगितले. लुडबे यांनी मात्र फेरनिविदेचा विषय लावून धरला. अखेर आचरेकर यांनी या ठरावावर उपसूचना मांडली. या उपसूचनेवर मतदान घेतले असता ठरावाच्या बाजूने नगराध्यक्षांचे मत धरून 9 मते तर उपसूचनेच्या बाजूने 9 मते मिळाली. दोन्ही बाजूला समसमान मतदान झाल्याने निर्णायक मत पुन्हा नगराध्यक्षांना देण्याचा अधिकार असल्याचे कांदळगावकर यांनी स्पष्ट करताना आपले दुसरे मत ठरावाच्या बाजूने टाकले. यामुळे आरोग्य सभापतींनी मांडलेला ठराव 10 विरुद्ध 9 मतांनी मंजूर करण्यात आला. आणि आचरेकर यांनी मांडलेली उपसूचना फेटाळण्यात आली.

या ठरावाच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांतील दुही पुन्हा एकदा समोर आली. या ठरावावर पालिका प्रशासनाने आपली टिपणी ठेवताना निविदाधारकास पत्र देऊन दर कमी करण्याबाबत कळविणे आवश्‍यक वाटते, असे म्हटले होते असे असतानाही सभागृहात ही निविदा फेटाळण्यात आली. या ठरावावर नगराध्यक्षांनी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने मत नोंदविले असले तरी प्रत्यक्षात त्यांनी त्याच एजन्सीची निविदा मंजूर व्हावी यासाठी सभागृहात एकमत होण्यास त्यांनी प्रयत्न केले. 

स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्‍तीची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपली असतानाही संबंधित कर्मचारी गेले दोन महिने पालिकेत वावरताना दिसत आहे. कामाच्यावेळी त्याला राबवून घेत आता त्याला बाजूला करणे योग्य नसल्याचे श्री. आचरेकर, श्री. वराडकर यांनी सांगितले. ठेका संपला असताना एखादी व्यक्‍ती पालिकेत वावरत असेल तर तिच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करायला हवा असे आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी सांगताच सभागृहातील सर्व सदस्य अवाक झाले. यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची भाषा कोणी करू नये.

लोकप्रतिनिधीच्या विरोधातील लेखी पत्र प्राप्त आहेत त्यामुळे काय होऊ शकते याचा विचार करावा असे श्री. आचरेकर यांनी सुनावले. जर मुदत संपूनही संबंधित कर्मचाऱ्यांनी काम केले असेल तर त्याला त्याचे मानधन द्यायला हवे असे श्री. लुडबे यांनी सांगितले. एखादीव्यक्‍ती चांगल्याप्रकारे काम करत असताना त्याला अशाप्रकारे अपमानास्पदरीत्या बाजूला करणे योग्य नसल्याचे आचरेकर यांनी सांगत याचा निषेध व्यक्त केला. 

विरोधक झाले मजबूत
पालिकेत शिवसेना-भाजप युतीची एकहाती सत्ता आहे. सभागृहात अनेकदा भाजप नगरसेविका पूजा करलकर आणि उपनगराध्यक्ष राजन वराडकर हे सत्ताधारी असताना शहरात चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या विविध विकासकामांच्या विषयांवरून सातत्याने आक्रमक भूमिका मांडताना दिसून आले आहेत. आजच्या सर्वसाधारण सभेतही वराडकर आणि करलकर यांच्या विरोधी धारेला सुदेश आचरेकर आणि विरोधी नगरसेवक ममता वराडकर, शीला गिरकर, मंदार केणी, यतीन खोत यांची जोड मिळाल्याने सभागृहात विरोधी गट अधिक मजबूत झाल्याचे चित्र होते. सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गणेश कुशे, आप्पा लुडबे, नितीन वाळके यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावण्यावर जोर दिला. 

उत्तर देताना उडाली भंबेरी
आजच्या सभेला मुख्याधिकारी रंजना गगे अनुपस्थित राहिल्याने सदस्यांच्या विविध प्रश्‍नांना उत्तरे देताना नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे चित्र होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com