मांगेली तळेवाडी ते सडा रस्ता काम अंतिम टप्प्यात

 मांगेली तळेवाडी ते सडा रस्ता काम अंतिम टप्प्यात

दोडामार्ग - कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या ऋणानुबंधाची वीण मजबूत करणारा मांगेली तळेवाडी ते सडा (कर्नाटक) रस्ता अंतिम टप्प्यात आहे. या रस्त्याने दोन राज्ये जवळ येणारच आहेत, पण त्याहीपेक्षा ‘रोटी- बेटी’ व्यवहाराने भावनिकदृष्ट्या जवळ असलेली राज्ये आता भौगोलिकदृष्ट्याही अगदी जवळ येणार आहेत.

महाराष्ट्राच्या सीमेवरचं मांगेली गाव कर्नाटकच्या सीमेवरील सडा गावाशी जोडलेले. कर्नाटक आणि महाराष्ट्र जोडणारा दगड, मातीचा रस्ता सड्यावरूनच यायचा. दोन्हींकडच्या पै-पाहुण्यांना त्याच रस्त्याचा आधार. कर्नाटकातील दांडेली अभयारण्यातून आलेला हत्तींचा कळप महाराष्ट्रात पहिल्यांदा आला तो याच मार्गाने. कर्नाटकातील माण मार्गे हत्तींचा कळप महाराष्ट्रात आला आणि मांगेलीला हत्तींचे प्रवेशद्वार, असे म्हटले जाऊ लागले.

मधल्या काळात हत्तींचा येण्या जाण्याचा मार्ग असलेल्या या रस्त्यावर लोखंडी गेट उभारून हत्तींचा प्रवेश रोखण्यात आला. पण त्या मार्गाने दोन्ही राज्यांतील गावकऱ्यांचा प्रवास मात्र सुरूच होता. असे असले तरी रस्त्याअभावी वाहने गोव्याहून चोर्ले घाटमार्गे कर्नाटकात न्यावी लागायची. येण्या-जाण्यात वेळ आणि पैसा खर्च व्हायचा. त्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारशी बोलणी करून संयुक्‍त बैठका घेतल्या आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे ६० लाख रुपये मंजूर करून घेतले.

सध्या त्या रस्त्याचे काम सुरू आहे. तीव्र चढ, उतार कमी करून रस्ता वाहने चढण्या-उतरण्यास योग्य करण्याचे काम सुरू आहे. अनेक धोकादायक वळणावर रुंदीकरण करण्यात येत आहे. रस्त्याच्या दुतर्फाची धोकादायक बाजुपट्‌टी कट करण्यात येत आहे. धोकादायक दगड आणि दरडी हटविण्यात आले आहेत. हत्तींचा प्रवेश रोखण्यासाठी जेथे लोखंडी गेट घातली होती, तेथे तीव्र चढ होता. तो कमी करण्यासाठी खोदाई सुरू आहे. खोदाईवेळी कातळ सापडल्याने ते फोडण्याचे काम सुरू आहे. सध्या मातीकाम अंतिम टप्प्यात आहे.

खडीकरण, डांबरीकरणही आता सुरू होईल. पावसाळ्यापूर्वी रस्ता वाहतुकीस खुला होईल, अशी अपेक्षा आहे. कर्नाटक हद्दीपर्यंतचा सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता पूर्णत्वाकडे प्रवास करतो आहे. अर्थात रस्त्याचा हा प्रवास दोन राज्यांच्या नातेसंबंधांचा पूल मजबूत करणारा आणि रोटी-बेटीच्या माध्यमातून जुळून येणाऱ्या ऋणानुबंधांना नवा आयाम देणारा ठरेल एवढे मात्र निश्‍चित!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com