माकडतापाची रुग्णसंख्या २० वर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात साथरोगांचे प्रमाण वाढू लागले असून गेल्या महिनाभरात डेंगीचे ९ रुग्ण, मलेरियाचे ६ रुग्ण, माकडतापाचे २० रुग्ण तर कुष्ठरोगाचे ५ रुग्ण आढळले असल्याची माहिती सभेत देण्यात आली. जिल्हा रुग्णालयाकडून सेवा बजावणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेला कधी डॉक्‍टर नाही तर कधी चालक नाही, अशी स्थिती असल्याने ही सेवा असून नसल्यासारखीच असल्याचा आरोप आजच्या आरोग्य समिती सभेत सदस्यांनी केला.

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात साथरोगांचे प्रमाण वाढू लागले असून गेल्या महिनाभरात डेंगीचे ९ रुग्ण, मलेरियाचे ६ रुग्ण, माकडतापाचे २० रुग्ण तर कुष्ठरोगाचे ५ रुग्ण आढळले असल्याची माहिती सभेत देण्यात आली. जिल्हा रुग्णालयाकडून सेवा बजावणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेला कधी डॉक्‍टर नाही तर कधी चालक नाही, अशी स्थिती असल्याने ही सेवा असून नसल्यासारखीच असल्याचा आरोप आजच्या आरोग्य समिती सभेत सदस्यांनी केला.

जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. यावेळी समिती सचिव व्ही. डी. नाद्रेकर, सदस्य हरी खोबरेकर, जेरॉन फर्नांडिस, शर्वाणी गावकर, उन्नती धुरी आदींसह खातेप्रमुख अधिकारी, तालुक्‍याचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 

जिल्ह्यात साथरोगाचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. काजूचा हंगाम सुरू झाल्याने माकडतापाच्या रुग्णांत अधिक वाढ होण्याची शक्‍यता आहे. गेल्या महिनाभरात माकडतापाचे २० रुग्ण, डेंगीचे ९ रुग्ण, मलेरियाचे ६ रुग्ण, कुष्ठरोगाचे ५ रुग्ण आढळले असल्याची माहिती देण्यात आली. माकडतापाचे प्रमाण दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्‍यात अधिक आहे. त्यामुळे येथील शाळा, महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात यावी, असे आदेश सभापती राऊळ यांनी दिले. १०८ रुग्णवाहिकेवर कधी डॉक्‍टर नाही तर कधी चालक नाही, अशी स्थिती असल्याने ही सेवा असून नसल्यासारखी आहे. यामुळे गंभीर रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याची बाब समोर आली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांचे जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर नियंत्रण नसल्याने शासकीय रुग्णालयांची अवस्था बिकट बनली असल्याचा आरोप या वेळी सदस्यांनी केला. आरोग्य समितीच्या बैठकीलाही ते उपस्थित राहून माहिती देत नसल्याबाबत सभापती राऊळ यांनी नाराजी व्यक्त करत जिल्हा रुग्णालयामार्फत सुरु असलेल्या १०८ रुग्णवाहिकेच्या स्थितीबाबत तसेच डॉक्‍टरांच्या रिक्तपदाबाबत तात्काळ अहवाल मागवून घ्या, असे आदेश दिले.

तपासलेल्या १०३३ पाणी नमून्यामध्ये तब्बल १२६ पाणी नमूने दुषित आढळले आहेत. दुषित पाण्याचे प्रमाण ११.२६ टक्के एवढे आहे. यामध्ये दोडामार्ग, सावंतवाडी, मालवण तालुक्‍यात दुषित पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आजच्या सभेत उघड झाले. सिंधुदुर्ग हा स्वच्छ जिल्हा, हागणदारीमुक्त जिल्हा असतांनाही दुषित पाण्याचे प्रमाण वाढणे ही चिंतेची बाब आहे. तरी पाण्याचे स्रोत दुषित का होतात? याचा शोध घ्यावा.

दुषित पाण्याच्या स्रोताचे टीसीएल पावडर टाकून शुद्धीकरण करण्याबरोबरच पाण्याचे स्रोत दुषित होवू नये, याबाबत उपाययोजना करण्यात याव्यात, असे आदेश सभापती राऊळ यांनी दिले.

मालवण तालुक्‍यातील वायरी, तारकर्ली, देवबाग या पर्यटन स्थळी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या पर्यटकांमुळे साथरोग पसरण्याची भीती अधिक आहे. अशावेळी पर्यटकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच साथरोग रोखण्यासाठी वायरी, तारकर्ली, देवबाग याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर व्हावे, अशी मागणी सदस्य हरी खोबरेकर यांनी केली. याबाबत आजच्या सभेत ठराव करण्यात आला.

जिल्ह्यात तब्बल ८७८ कुष्ठरोगी
जिल्ह्यात कुष्ठरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे सर्वेक्षणात उघड झाले आहे. जानेवारी महिन्यात ५ कुष्ठरोगी नव्याने सापडले आहेत. दरमहा ५ ते ६ रुग्ण आढळत असून वर्षाला सुमारे ५० ते ६० रुग्णांची भर पडत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८७८ एवढे कुष्ठरोगाचे रुग्ण औषधोपचाराखाली असल्याची माहिती देण्यात आली. कुष्ठरोग रोखण्यासाठी उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात. नव्या रुग्णांचा शोध घेऊन प्रत्येक रुग्ण औषधोपचाराखाली येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, अशा सूचनाही राऊळ यांनी केल्या.

२० वैद्यकीय अधिकारी नेमण्याचा प्रस्ताव
जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. साथरोग रोखण्यासाठी मनुष्यबळ कमी पडते. यासाठी जिल्हा परिषद निधीतून २० वैद्यकीय अधिकारी व २० प्रयोगशाळा तंत्रज्ञ नियुक्त करावेत, असा ठराव घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवावा, अशी सूचना आरोग्य सभापती राऊळ यांनी केली.

Web Title: Sindhudurg News Monkey Fever 20 cases found