डोंगरपालमध्ये माकडतापाचा दुसरा बळी

डोंगरपालमध्ये माकडतापाचा दुसरा बळी

बांदा - डोंगरपाल-देऊळवाडी येथील काशिनाथ गोपाळ गवस (वय ६८) यांचा माकडतापाने काल दुपारी म्हापसा (गोवा) येथील ॲझिलो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. डोंगरपाल गावात गेल्या चार दिवसांतील माकडतापाचा हा दुसरा बळी ठरला आहे. गावात सध्या १३ माकडतापबाधित रुग्ण आहेत. आरोग्य विभाग गावात सर्व प्रकारचे खबरदारीचे उपाय घेत असतानाही तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने गावात भीतीचे वातावरण आहे.

मृत माकडे सापडण्याचे सत्र सुरू असताना वनविभागाने मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने स्थानिकांनी रोष व्यक्त केला आहे. परिसरातील डोंगरपाल गावावर सध्या माकडतापाचे संकट गडद आहे. तापसरीच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक गावात ठाण मांडून आहे.

माकडतापाबाबत गावात जनजागृती करण्याबरोबरच फवारणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. डोंगरपाल गावात सध्या काजू हंगाम ऐन बहरात आहे. येथील ९५ टक्के स्थानिकांची उपजीविका ही काजू बागायतीवर अवलंबून आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर्जेदार व सर्वाधिक काजू उत्पन्न हे डोंगरपाल गावात होते. गावाची मुख्य अर्थव्यवस्था ही काजू बागायतीवर अवलंबून असल्याने माकडतापाच्या संकटामुळे येथील अर्थव्यवस्था धोक्‍यात आली आहे.

काशिनाथ गवस हे शेतकरी होते. काजू बागायती हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन होते. त्यांना ताप येत असल्याने ९ मार्चला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. त्यावेळी प्राथमिक उपचार करून तसेच त्यांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेऊन त्यांना घरी पाठविले. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्या शरीरात तापाचे प्रमाण वाढल्याने नातेवाईकांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशींची संख्या कमी झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना तातडीने गोवा बांबोळी येथे हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी दिला; मात्र त्यांना उपचारासाठी बांबोळी येथे हलविताना त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्याने त्यांना म्हापसा गोवा येथील ॲझिलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांना माकडतापाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते; मात्र त्यांची प्रकृती उपचाराला प्रतिसाद देत नव्हती. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांनी माकडताप प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस घेतले होते. तरीही त्यांना माकडतापाची लागण झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांच्यावर गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, चार मुली, भाऊ, पुतण्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. डोंगरपाल तंटामुक्त समिती अध्यक्ष गुणाजी गवस यांचे ते भाऊ होत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com