पेंढरी येथील खुनाचे गूढ उकलले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

देवगड - तालुक्‍यातील पेंढरी येथील सूर्यकांत ठकोजी गुरव (वय ५५, रा. पेंढरी) यांच्या संशयास्पद मृत्यूचा अखेर उलगडा झाला आहे. गावातील एका महिलेशी असलेले अनैतिक संबंध उघड होतील या भीतीने संशयिताने त्यांना संपविल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या कृत्याची पेंढरी येथील संशयित भिकाजी आत्माराम गुरव (वय ५५) याने पोलिसांकडे कबुली दिल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली. या प्रकारामुळे गावात खळबळ माजली.

देवगड - तालुक्‍यातील पेंढरी येथील सूर्यकांत ठकोजी गुरव (वय ५५, रा. पेंढरी) यांच्या संशयास्पद मृत्यूचा अखेर उलगडा झाला आहे. गावातील एका महिलेशी असलेले अनैतिक संबंध उघड होतील या भीतीने संशयिताने त्यांना संपविल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या कृत्याची पेंढरी येथील संशयित भिकाजी आत्माराम गुरव (वय ५५) याने पोलिसांकडे कबुली दिल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली. या प्रकारामुळे गावात खळबळ माजली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः विजयदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या तालुक्‍यातील पेंढरी गावातील एका ओहोळाच्या पाण्यात २९ जानेवारीला सूर्यकांत गुरव यांचा मृतदेह आढळला होता. २८ जानेवारीला गावातील एका शाळेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला ते उपस्थित होते; 
मात्र कार्यक्रमातून ते उठून गेले होते. ते परत घरी आले नसल्याने त्यांची नातेवाइकांकडून शोधाशोध सुरू होती.

नातेवाईक सर्वत्र शोध घेत असता त्यांचा मृतदेह ओहोळाच्या पाण्यात आढळून आला होता. याबाबत दिलेल्या माहितीनुसार विजयदुर्ग पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली होती; मात्र ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला, त्या ठिकाणाची पोलिसांनी पाहणी केली असता मोठमोठे खडक, दगड होते. तसेच ओहोळाच्या पाण्याचा वाहता प्रवाह होता; मात्र सूर्यकांत यांच्या डोक्‍यावर झालेल्या जखमांबाबत पोलिस साशंक होते. त्यामुळे पोलिसांचा त्या दृष्टीने तपास सुरू होता. सूर्यकांत यांचे कार्य आटोपल्यावर त्यांच्या पत्नीने त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्‍त केला होता.

याबाबतची तक्रार त्यांनी काल (ता. आठ) विजयदुर्ग पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार विजयदुर्ग पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी आज गावातील संशयितांची कसून चौकशी केली. त्यांमध्ये संशयित भिकाजी गुरव आणि एका ४० वर्षीय महिलेचा समावेश असल्याचे पुढे आले. त्यांना पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. २८ जानेवारीला संशयित भिकाजी व संबंधित महिलेचे अश्‍लील चाळे सुरू असताना सूर्यकांत यांनी पाहिले होते. त्यामुळे आपले अनैतिक संबंध उघड होतील या भीतीने संशयिताने सूर्यकांत यांना कुठल्यातरी हत्याराने मारून ओहोळातील दगडावर पाडून पाण्यात ढकलून दिल्याचे चौकशीत समोर येत आहे.

या कृत्यामध्ये ‘त्या’ महिलेचाही सहभाग असण्याची शक्‍यता आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अपर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयदुर्ग पोलिसांनी सूर्यकांत गुरव यांच्या मृत्यूचा छडा लावला. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. मोरे यांनी विजयदुर्गला भेट देऊन माहिती घेतली. अधिक तपास श्री. चव्हाण करीत आहेत.

Web Title: Sindhudurg News Murder in Pendari

टॅग्स